Posts

Showing posts with the label तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले.

तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती;

तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती; पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते. या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता; पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या; पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला. दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला.