तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती;
तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती; पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते.
या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता; पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या; पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला.
दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला. अशा रीतीने राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया घातला. त्याच्या काळी ⇨वेरूळ येथील कैलास लेणे खोदण्यात आले. कृष्ण सु. ७७३ मध्ये निधन पावला असावा.
कृष्णानंतर त्याचा मुलगा दुसरा गोविंद (कार. ७७३–८०) गादीवर आला. पण त्याच्या काळी सर्व सत्ता त्याचा धाकटा भाऊ ध्रुव याच्या हाती होती. शेवटी ध्रुवाने त्याला पदच्युत करून सु. ७८० मध्ये गादी बळकावली.
नंतर ध्रुवाने गोविंदाच्या पक्षाचे गंग आणि पल्लव राजे यांचा पराभव करून गंग राजपुत्र शिवमार याला बंदिवान केले आणि गंगवाडी खालसा केली. पुढे त्याने उत्तर भारतात स्वारी करून दोआबापर्यंत आक्रमण केले. गुर्जर प्रतीहार नृपती वत्सराज याला राजपुतान्यात पिटाळून लावले आणि बंगालच्या पालनृपती धर्मपाल याचा दोआबात पराभव केला. तेव्हापासून गंगा व यमुना नद्यांची चिन्हे राष्ट्रकुटांच्या ध्वजावर झळकू लागली.
ध्रुवानंतर ⇨तिसरा गोविंद (सु. कार. ७९३–८१४) हा गादीवर आला. हा आपल्या पित्यापेक्षा जास्त पराक्रमी निघाला. त्याने आपल्या स्तंभ नामक वडील भावाचा आणि त्याच्या पक्षाच्या व बंदीतून मुक्त झाल्यावर उलटलेल्या गंग राजाचा पराभव केला. गंगाला पुन्हा बंदीत टाकले, पण स्तंभाला पुन्हा गंगवाडीचा अधिपती नेमले. नंतर त्याने आपल्या पित्याप्रमाणे उत्तर भारतात स्वारी केली. तीत त्याने वत्सराजाचा पुत्र द्वितीय नागभट याचा पराजय केला. पालनृपती धर्मपाल आपला हस्तक कनौजचा अधिपती चक्रायुध याच्यासह त्याला शरण आला. नंतर गोविंदाने हिमालयापर्यंत स्वारी केली.
परत नर्मदातीरी आल्यावर त्याने तिच्या काठाने जाऊन मालक. डाहल (चेदि), ओड्रक (ओरिसा) इ. देश जिंकून पावसाळ्यात श्रीभवन (गुजरातेतील सारमोण) येथे मुक्काम केला. तेथे त्याचा मुलगा ⇨पहिला अमोघवर्ष इ.स. ७९९ मध्ये जन्मला. गोविंद नंतर मयूरखंडीला परत आला. तेथे काही काळ राहून त्याने दक्षिणच्या दिग्विजयाची तयारी केली आणि तुंगभद्रेच्या तीरी हेलापूर येथे तळ दिला. तेथून त्याने गंग, पल्लव, पांड्य आणि केरळ देशांवर स्वाऱ्या करून तेथील राजांचा पराभव केला. त्यांना आपले स्वामित्व स्वीकारावयास भाग पाडले. त्याने वेंगीचा पूर्वचालुक्य दुसरा विजयादित्य याचा पराभव करून त्याचा धाकटा भाऊ भीम याला गादीवर बसविले. अशा रीतीने हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले.
तिसऱ्या गोविंदानंतर त्याचा पुत्र पहिला अमोघवर्ष (कार. ८१४–८०) गादीवर आला. त्यावेळी तो पंधरा-सोळा वर्षांचा होता. अमोघवर्षाच्या कारकीर्दीत अनेक बंडे झाली. पूर्वचालुक्य विजयादित्याने आपली गादी परत मिळविली. गंगांनी राष्ट्रकुटांना गंगवाडीतून हाकलून लावले. गुजरातेत तिसऱ्या गोविंदाने स्थापिलेल्या राष्ट्रकूट शाखेनेही स्वातंत्र्य पुकारले. अमोघवर्षाने शेवटी यांपैकी बहुतेकांना काबूत आणले; पण या बंडाळ्यांमुळे त्याच्या राज्याला शांतता लाभू शकली नाही.
अमोघवर्षाच्या काळी विद्येला उत्तेजन मिळाले. त्याने स्वतः कविराजमार्ग नामक साहित्यशास्त्रीय ग्रंथ कन्नड भाषेत लिहिला. त्या भाषेतील आद्य ग्रंथांत त्याची गणना होते. त्याचा प्रश्नोत्तरमालिका नामक दुसऱ्या ग्रंथावरून तसेच कोरीव लेखांतील उल्लेखावरून तो मधून मधून आपल्या युवराजावर राज्यकारभार सोपवून धार्मिक चिंतनाकरिता मठात जाऊन राहत असे, असे दिसते. त्याने एकदा मोठ्या साथीच्या निवारणाकरिता आपल्या हाताचे बोट कापून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीस अर्पण केल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे. तसेच त्याच्या दरबारी अनेक जैन कवींनी आपले ग्रंथ रचल्याचे उल्लेख आहेत. जिनसेनाचे आदिपुराण, महावीराचार्याचे गणित-सारसंग्रह वगैरे ग्रंथ त्याच्या कारकीर्दीत रचले
Comments
Post a Comment