२७ ऑगस्ट इ.स.१६५६*
*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*२७ ऑगस्ट इ.स.१५३४*
इस्माईल आदिलशहाचा मृत्यू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्याआदिलशाहीचा आदिलशाहीत १४९० पासून १६८६ पर्यंत ९ सुलतान होऊन गेले. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ शहानंतर १५१० मध्ये त्याचा वारस इस्माईल हा विजापूरचा सुलतान बनला. याने १५१० ते १५३४ अशी २४ वर्षे कारभार पहिला. याची बहुतांश कारकीर्द इतर सुलतानाशी लढायांत गेली. इस्माईल आदिलशहा मृत्यू पावला ती तारीख होती २७ ऑगस्ट १५३४.
*२७ ऑगस्ट इ.स.१६५६*
जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेचा घोडा,शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू(त्रिंबकजी,शंकराजी,संभाजी व महादजी)यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महाराजांशी वरकरणी सख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटकेसाठी चोरून मुधोळकर घोरपडेना पत्र लिहिले. पण ही पत्रे महाराजांच्या हाती लागली.चंद्ररावच्या बेईमानीने महाराज संतप्त झाले. त्यातच चंद्रराव कैदेतून पळून गेला,पण दुर्दैवाने तो पकडला गेला. यावेळी मात्र महाराजांनी त्याची गर्दन मारली. चंद्रराव मोरे कैदेतून पळाले.
*२७ ऑगस्ट इ.स.१६७९*
१६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते. आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारूगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली. इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज छत्रपती शिवाजी महाराजांना रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते. कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली. दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला. या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी. मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या. हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टेंबर १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता रवाना केले.
*२७ ऑगस्ट इ.स.१६८०*
छत्रपती संभाजी राजांचे हस्ताक्षरसह दानपत्र
छत्रपती संभाजी राजांना राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आधीच संकल्प केल्याप्रमाणे कुडाळ गावातील एका विद्वान ब्राह्मण श्री. बाकरे यांना एक दानपत्र दिले. हे दान पत्र दिल्याची तारीख २७ ऑगस्ट १६८० असून यात छत्रपती संभाजी राजांनी श्री. बाकरे यांना दहा हजार वराहा [२४ गुंजा वजनाचे शुद्ध सोन्याचे एक अशी १० हजार नाणी] दान म्हणुन दिली. हे दानपत्र संस्कृत भाषेत असून ३०० सें.मी. लांब व २३.५ सें.मी. रुंद आहे. ५० सें.मी. लांबीचा एक असे एकूण ६ कागद आहेत आणि त्याला पाच ठिकाणी जोड आहेत. दानपत्राचा कागद उत्तम जातीचा असून मजबूत आहे. कागदाच्या दोन्ही बाजूने वेलबुट्टी काढलेली असून फुलांची चित्रे उमटवलेली आहेत. यावर संभाजीराजांची मुद्रा असून त्याखाली
II मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज II
II छत्रपते: यदत्रोपरिलेखितं II छं II श्री II
असे लिहिलेले आहे. याचा अर्थ पुढील प्रमाणे "मला, श्रीशिवराजाचा पुत्र श्री शंभूराज छत्रपती याला, यावर (दानपत्रावर) जे लिहिले आहे ते मान्य आहे." या मजकूराचे हस्ताक्षर या दानपत्रातील हस्ताक्षरापेक्षा वेगळ्या वळणाचे असून अनेक इतिहास संशोधकांच्या मते हे हस्ताक्षर छत्रपती संभाजी राजांचे आहे.
*२७ ऑगस्ट इ.स.१६८३*
(भाद्रपद वद्य प्रतिपदा, शके १६०५, रुधिरोद्ररी संवत्सर, वार सोमवार)
गोव्याच्या व्हिसेरेईला छत्रपती संभाजी महाराजांची धास्ती !
गोव्याच्या भूमीत अकबराच्या जहाज बांधणीच्या निमित्ताने आपली माणसे उतरविण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा बेत फसला त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी आता दुसरी युक्ती केली. आपले पाठवलेले हेर व्हाईसरॉय जवळ धाडले आणि मराठी राज्यांतील फोंडा किल्ल्यावर भरपूर खजिना लपविला असून हा किल्ला जिंकल्यास हा खजिना तुमच्या हाती पडेल ही बातमी पोहोचवली, यात छत्रपती संभाजी महाराजांचा हेतू हा की, खजिना घेण्याच्या मोहाला बळी पडून व्हाईसरॉयने गोवे सोडून आपल्या सैन्यासहित फोंड्याच्या दिशेने चाल करावी आणि तोपर्यंत मराठ्यांनी पोर्तुगिजांचा मार्ग अडवून धरत गोवे घ्यावे! अशातच चौलच्या वेड्या मुळे फिरंगी सुद्धा त्रस्त झाले होते. त्यातच छत्रपती संभाजी महाराज गोव्यावर चाल करून येत असल्याच्या वार्ता गोव्यात धडकल्या. गोव्याच्या विजरईने सर्व ख्रिस्ती धर्म मार्तंडाना कळविले की, छत्रपती संभाजी महाराज मोठ्या सैन्यासह गोव्यावर चाल करून येत असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकारार्थ आवश्यक ती मदत सर्वांनी करावी. छत्रपती संभाजी महाराजांचा इतका प्रचंड धसका पोर्तुगिजांनी घेतला होता.
*२७ ऑगस्ट इ.स.१६८५*
उत्तर कोकणातील संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा काही प्रदेश व किल्ले काबीज केले होते. त्यातीलच “ किल्ले जीवधन” आजच्या दिवशी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून परत मिळवला.
*२७ ऑगस्ट इ.स.१६९३*
अपरिचित राजाराम महाराज
राज्याभिषेकानंतरचा काळात शिवछत्रपतींना स्वास्थ्य दायक असायला हवा होता. पण काही हातावर मोजण्या इतके दिवस सोडता दक्षिणदिग्विजय आणि नंतरच्या घडामोडींनी महाराज स्वास्थ्यलाभा पासून वंचितच राहिले. या श्रीमानयोग्याचे अखंड जीवन समर्थांनी म्हणल्या प्रमाणे राज्य साधनेच्या “लगबगीत”च संपले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोनही सुपुत्रांचे जीवनही अतिशय खडतर गेले. शिवकाल आणि शंभूकालाचा तौलनिक अभ्यास करताना संभाजी महाराजांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक चणचण फारशी जाणवत नाही. पण शंभू छत्रपतींच्या हौतात्म्य नंतर संपूर्ण स्वराज्यावर मोगलाई वरवंटा फिरल्याने मराठ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसून येते. या कोंडीचे अधिक भीषण रूप आपल्याला राजाराम महाराजांच्या काळात सहज लक्षात येईल. या भूमीत ना राजधानी, ना तख्त सिंहासन आणि परागंदा झालेला राजा अश्या परिस्थितीत निर्नायकी महाराष्ट्राला तारले ते शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्य अस्मितेने. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंतसचिव या आणि यांच्या सारख्या अनेक लोकांनी स्वराज्याचा हा आर्थिक तोल अतिशय निगुतीने आणि जवाबदारीने सांभाळून ठेवला. सुरवातीला किल्ले झुंजत ठेऊन मुघलांना जेरीस आणायचे, नंतर बोलणी करून मोठ्या रकमा घेऊन किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यायचे आणि एकदा का मुघलांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याची रसदे सह उत्तम व्यवस्था लावली की तोच किल्ला परत मुघलांकडून जिंकून घ्यायचा अशी अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. हे सर्व करत असताना कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थाला अंकुर फुटले नाहीत हे विशेष. याचे एकमेव म्हणजे जिंजी मध्ये असलेल्या राजाराम महाराजांवरील निष्ठा आणि राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्यावर टाकलेला पूर्ण विश्वास.
महाराष्ट्रात हे घडत असताना राजाराम महाराजांनी स्वराज्याला आर्थिक बळ देणारा एक विलक्षण आणि अल्प परिचित व्यवहार केला तो म्हणजे “पाँडेचरीची विक्री”. वर म्हणल्या प्रमाणे कोणतेही राज्य चालवण्यासाठी आर्थिक बळ असणे अत्यंत गरजेचे असते पण हे आर्थिक बळ योग्य वेळेत उभे राहणेही गरजेचे असते. महाराष्ट्रातील संघर्षाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेत असताना १६९०च्या दरम्यान तेगणापट्टणचा किल्ला आणि त्या जवळील कुडलोर हे खेडे विक्रीस काढले होते. या व्यवहारातून त्यांनी स्वराज्यासाठी ५०००० पगोडे इतकी रक्कम उभी केली. कुडलोर आणि तेगणापट्टणचा किल्ला मद्रासच्या इंग्रजांनी मराठ्याकडून विकत घेतला. याच धर्तीवर फ्रेंच आणि डच वसाहती असलेली पाँडेचरी त्यांनी विक्रीस काढली. फ्रेंचांशी मराठ्यांचे असलेले जुने संबंध लक्षात घेता फ्रेंच हा व्यवहार आपल्या बाजूनेच होणार असे गृहीत धरून घासाघीस आणि विलंब करू पहात होते. तसेच फ्रेंचांनी हा व्यवहार डचांशी होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. पण पैश्याची निकड लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी दिनांक २७ ऑगस्ट १६९३ रोजी २५००० पगोडे किमतीला पाँडेचरी डचांना विकत दिली.
वर उल्लेख केलेल्या विक्री व्यवहारांमध्ये राजाराम महाराजांची “स्थिरबुद्धी” अधोरेखित होते. स्वराज्यास ज्यावेळी धनाची आवश्यकता होती त्यावेळी भूमी विकून धन उभे केले आणि काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळवून पुढील योजना ठरवल्या आणि त्या अमलात आणण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण केली. शिवछत्रपतींनी दिग्विजय मोहिमेत दक्षिणेत रोवलेल्या या घट्ट पायांनी आणि राजाराम महाराजांच्या स्थिरबुद्धी दूरदृष्टीने भविष्यात मराठ्यांनी उत्तरेतील थोरल्या मसलती पार पडल्या असे म्हणल्यास काही वावगे ठरू नये.
*२७ ऑगस्ट इ.स.१७२७*
निजामाच्या कुरघुड्या चालू झाल्यावर त्यास तोंड कसे द्यावे याचा विचार करण्यासाठी शाहू महाराजांनी मंत्री मंडळाची बैठक बोलाविली. यावेळी शाहू महाराजांच्या मंत्री मंडळात एक विचार होईना. श्रीपतराव प्रतिनिधीचा पक्ष होता त्याचे म्हणणे निजामाशी समझोता करावा. शाहू महाराजांनी विचार केला की, बाजीराव पेशवा कर्नाटकात गेलेला, तसेच आपली फौजही उत्तर हिंदुस्थानात व कर्नाटकात गेलेली; अशा स्थितीत समझोता करणेच योग्य आणि समझोता करण्याकरिता त्यांनी आपल्या तर्फेप्रतिनिधी व सुमंत या दोघांना निजामाकडे पाठविले. निजामाने बोलणे लाविले की, चौथाई वसुलीकरिता मराठ्यांनी आपले मोकासदार नेमू नयेत. त्यांना नक्त रक्कम मी देतो. त्याप्रमाणे त्यांनी हैद्राबाद प्रांताची चौथाईची रक्कम तीन लाख निजामाकडून घेण्याचे कबूल केले. अशा या विमनस्क स्थितीत शाहू महाराजांनी मराठ्यांचे हैद्राबादवरील वर्चस्व घालविले. सर्व दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या चौथाई वसुलाबद्दल शाहू छत्रपति रोख रकमेचा स्वीकार करण्याच्या मनस्थितीत असताच बाजीराव साताऱ्यास शाहू महाराजांपाशी आले आणि
त्यांनी चौथाई वसुलीचे हक्क सोडल्यास आपल्या सत्तेस कसा उणेपणा येतो हे महाराजास समजाऊन सांगितले. इतक्यात ठरलेल्या रकमेबद्दल निजामाकडून असा निरोप आला की, शाहू महाराज व संभाजी राजे यापैकी छत्रपति कोण हे दोघांनी आपसात ठरविल्याशिवाय रक्कम देता येत नाही. यावरून शाहू महाराजांनी निजामाचा डाव (निजामाने शाहू महाराजांस बुडवून मराठ्यांची सत्ता गुजरात आणि माळवा या प्रांतातून नाहीशी करण्याकरिता संभाजी राजास हाताशी धरले. शाहू महाराजांच्या सैन्यात फितुरी आणित राज्यात धुमाकूळ कसा माजवला या संबंधीचे पत्र सवाई जयसिंगास निजामाने लिहिले होते.) पूर्णपणे ओळखला आणि बाजीरावांस निजामावर चाल करून जाण्यास सांगितले. बाजीरावांनी निजामावर चालून जाण्याकरिता २७ ऑगस्ट १७२७ ला सातारा सोडले.
Comments
Post a Comment