२३ डिसेंबर इ.स.१६७०*छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.
*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*२३ डिसेंबर इ.स.१५३४*
बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त करून, हिन्दु पूजा व उत्सवांना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यांनी मोहिम सुरू केली.
*२३ डिसेंबर इ.स.१६७०*
छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.१६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. 'मराठे बर्हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकार्यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्हाणपूरच्या रोखाने निघाला परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गतीने अहिवंतकडे वाटचाल सुरू केली परंतु रस्त्यातच मराठ्यांनी अहिवंत किल्ला जिंकून घेतल्याचे त्याला समजले प्रत्यक्ष लढा न होता अहिवंत मराठ्यांकडे जावा, एवढेच नव्हे तर दाऊदखान या महत्वाच्या प्रसंगी बेसावध असावा ही गोष्ट औरंगजेबाला खपण्यासारखी नव्हती.
*२३ डिसेंबर इ.स.१६७७*
करारानुसार विजापूर घेण्यासाठी सिद्दी मसाऊदने हालचाली सूरु केल्या. पण हिरापूर येथे बहलोलखान पठाणाने २३ डिसेंबर १६७७ मध्ये अखेरचा श्वास घेतला. लगोलग बहलोलचा हस्तक जमशिदखान पठाण याने विजापूरवरती आपला जम बसवला. व मसाऊदला निरोप पाठवला की सहा लक्ष होन मिळाले तरच कुठलाही प्रतिकार न करता विजापूरचा किल्ला ताब्यात देईन. सिद्दी मसाउदकडे इतका पैसा नव्हता, कुत्बशहाने जमशिदखानावरती अविश्वास दाखवून पैश्यांची मदत करण्यास नकार दिला. लढाई करणे परवडणारे नव्हते. मसाऊद गुपचूप बसला. इकडे विजापूरात पगार हवाय म्हणून पठाण जमशिदखानाचा जीव खाऊ लागले. तो सहा लक्ष होनांवरती विसंबून होता. विचित्र कोंडि महाराजांनी हेरली. जमशिदखानाने आता महाराजांशी बोलणे सुरु केले. महाराजांनी स्वत: सहा लक्ष होन देण्याचे कबूल केले व ते त्वरीत विजापूरकडे निघाले. हि बातमी समजताच सिद्दी मसाऊदच्या पोटात खड्डा पडला. त्यानेही विजापुरकडे धाव घेतली. पण लढून विजापुर काबीज होणार नाहि हे त्याने ओळखले. मग त्याने एक कपटनीती वापरायची ठरवली. त्याने स्वत:च्या मृत्यूची हूल उठवली. व आपल्या हाता खालचे ४ हजार सैनिक जमशिद खानाकडे नोकरीची मागणी करण्यासाठी पाठवले. आमचा नेता मेला, आम्हाला रोजीरोटी द्या म्हणून ते जमशिदखान पठाणाकडे गेले. आता जमशिदखान महाराज सहा लक्ष होन देणार या भरवश्यावरती होता. त्याने हे नवे सैन्य देखिल विजापूरात दाखल करुन घेतले. मात्र दोन दिवसांत योग्य संधी हेरुन त्यांनी जमशिदखानाला अटक केली. विजापुरचे दरवाजे सिद्दी मसाऊदला उघडे झाले. जिवंत मसाऊद विजापुरात शिरला. हि बातमी कळताच आता पुढे जाण्यात हशील नाही हे ओळखून महाराज पन्हाळ्यावरती परतले. विजापूर जिंकून दक्षीणेत दुपटिने प्रबळ होण्याची नामी संधी मात्र गेली.
*२३ डिसेंबर इ.स.१६८३*
(पौष शुद्ध चतुर्थी शके १६०४ दुदुंभी संवत्सर वार शनिवार)
छत्रपती संभाजीराजे गोवा मोहिमेतून किल्ले रायगडाकडे!
जुवे बेटावर पोर्तुगिजांच्या मानहानीकारक पराभवानंतर छत्रपती संभाजी महाराज आपल्या सैन्यासह पोर्तुगिजांच्या साष्टी व बारदेश या भागात गेले व तिथे प्रचंड धुमाकूळ घातला. याच सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या हेरखात्याने बातमी आणली की, शहाबुद्दीनखान हा कोकणात उतरणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी निर्णय घेतला की, शहाबुद्दीनखानाशी स्वतः लढावे व सध्याची जुवे मोहीम ही कवी कलशाला चालवायला देऊन इतर सैन्य घेऊन शहाबुद्दीनखानाचा समाचार घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज रायगडाकडे निघाले.
*२३ डिसेंबर इ.स.१७८८*
महादजीने २३ डिसेंबर १७८८ या दिवशी नाना फडणीसांना कळवले की, ‘गुलाम कादर याने बादशहाची बेकैद आणखी हरामखोरी केली. त्याचा नतीजा त्यास तसाच देऊन जिवंत धरून पारिपत्य करावे याकरिता फौजेने, पैक्याने आणि मेहनतीने जितके प्रयत्न होते तेवढे केले. त्याचे सार्थक श्रीमंताचे प्रतापे होऊन गुलाम यास जिवंत धरला.’
गुलाम कादर शामलीजवळ मराठी सैन्याच्या हातात जिवंत सापडला. पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली. नाझीर खोजा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या. गुलामाची आई पंजाबात पळू पाहात होती, तिला पकडण्यास रायाजी आणि अलीबहादर गेले. घोसगड मराठी फौजांनी जिंकला आणि तोफा डागून जमीनदोस्त केला. गुलामाकडून जिनसांच्या याद्या करून घेण्यात आल्या. लूट जप्त करण्यात आली. गुलामाचे डोळे काढून बादशहाकडे पाठवण्यात आले. ३ मार्च या दिवशी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला. बादशाह शाहआलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. खर्च काढून इतर लूट महादजीने दिल्लीला पाठवली. मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता.
Comments
Post a Comment