विजयानगर साम्राज्य

विजयानगर साम्राज्य: दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध साम्राज्य. इ. स. १३३६ मध्ये कर्नाटकातील विद्यमान बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट तालुक्यातील ⇨हंपी (विजयामगर) येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस संगमाचे पुत्र ⇨पहिला हरिहर (कार. १३३६−५६), ⇨पहिला बुक्क (कार. १३५६−७७), मुद्दण, मारप्पा व कंपण या पाच बंधूंनी या राज्याची स्थापना केली. या बंधूंना विद्यारण्य म्हणजे ⇨माधवाचार्य (सु. १२९६−१३८६) स्वामींनी प्रेरणा दिली, अशी वदंता आहे. या साम्राज्याच्या विस्तार दक्षिणोत्तर बेळगावपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम आंध्रपासून गोव्यापर्यंत झाला होता. तथापि विजयानगरचे आधिपत्य मानणाऱ्या राजांच्या प्रदेशांचा विचार केल्यास या साम्राज्याची सत्ता उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि पूर्वेस कटकपर्यंत (ओरिसा राज्य) भिडल्याची दिसते. सुमारे सव्वादोनशे वर्षे विजयानगरच्या सम्राटांनी अधिसत्ता टिकून होती. त्या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे संवर्धन-प्रसार-प्रचार कार्य केले आणि दक्षिणेतील मस्लिम शाह्यांच्या राज्यविस्तारास पायबंद घातला. विजयनगर हंपी, पंपाक्षेत्र, होस्पेट इ. वेगवेगळ्या नावांनीही विजयानगरचा उल्लेख केल्याचे दिसून येते. इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयानगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने दिग्विजय मिळविला. त्याप्रीत्यर्थ पहिल्या बुक्क राजाने ‘विद्यानगर’ या आपल्या नगरीचे नाव बदलून ‘विजयानगर’ असे ठेवले. तथापि स्थानिक लोक हंपी असाच याचा उल्लेख करतात.

ऐतिहासिक साधने: विजयानगरविषयी ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात मिळते. तीत विविध प्रकारची नाणी (सोने, चांदी, तांबे), पुरातत्वीय अवशेष, विपुल ⇨कोरीव लेख तसेच ताम्रपट असून संगम, साळुव आणि तुळव वंशातील राजांची दानपत्रे आणि अज्ञापत्रे, परकीय प्रवाशांचे वृत्तांत वंशावळी व विशेष कार्याचीही विश्वसनीय माहिती मिळते. एक विश्लासार्ह साधन म्हणून या शिला लेखांना विशेष महत्त्व आहे. हे लेखसंग्रह (कॉपर्स ऑफ इन्स्क्रिप्शन) ॲन्युअल रिपोर्ट्‌स ऑफ एपिग्राफिया, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वार्षिक अहवाल, एपिग्राफिया कर्निटिका (खंड ३-१२), म्हैसूर इन्स्क्रिप्शन्स (खंड १ ला), म्हैसूर आर्किऑलॉजिकल रिपोर्ट्‌स, नेल्लोर डिस्ट्रिक्ट इन्स्क्रिंप्शन्स (खंड १−३), पुदुकोट्टईं स्टेट इम्स्किप्शन्स. साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स (खंड ४−६) इत्यादींतून प्रसिद्ध झाले आहेत. यांशिवाय ⇨फिरिश्ता (१५५० ? – १६२३?), निजामुद्दिन व सय्यद अली तबातबा या फार्सी इतिहासकारांच्या अनुक्रमे गुलशन-इ-इन्नावहिनी, तबकास-इ-अकबरी आणि बुर्हान-इ–मआसिर या ग्रंथातून तत्संबंधीची माहिती मिळते. विजयानगर साम्राज्याला निकोले दी, काँ ती, फीगॅरॅदू, बार्बोसा, ⇨अब्दअल्-रझाक (१४१३−८२), पायीश, नूनीश इ. परकीय प्रवाशांनी आपल्या प्रवासवृत्तांतून तसेच पत्रे, दिनदर्शिका व अन्य वृत्तांत यांतून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीसंबंधी माहिती दिलेली आहे, यांशिवाय ⇨आदिलशाही, ⇨ निजामशाही, ⇨कुत्बशाही या शाह्यांतील तवारिखांतून विजयानगरसंबंधी काही महत्त्वाचे उल्लेख व तपशील उपलब्ध होतात.

विजयानगर साम्राज्य-विस्तार (सु. १४८५−१६०५)
विजयानगर साम्राज्य-विस्तार (सु. १४८५−१६०५)

तत्कालीन तेलुगू व संस्कृत साहित्यांतून विजयानगराच्या सांस्कृतीक प्रगतीची कल्पना येते. यांतील, विशेषतः ⇨सायणाचार्य (१३०२-८७) व माधवाचार्य यांच्या ग्रंथांतून, येथील राजांच्या शासनपद्धतीविषयी माहिती मिळते. कंपणाच्या पत्नीने मधुराविजयम् नावाचे काव्य लिहिले. ⇨कृष्णदेवराय (सु. १४८९−१५२९) याने आयुक्तमाल्यदा नावाचे तेलुगू भाषेत प्रबंध-काव्य लिहिले (१५११). वेंकट सेनापती अनंत यांच्या काकुस्थ-विजयम् या ग्रंथातून ऐतिहासिक सामाग्री मिळते. विजयानगराच्या दरबारात पोर्तुगीजांचा राजदूत असे आणि पोर्तुगीजांशी त्यांचे राजनैतिक संबधही होते. त्यामुळे पोर्तुगीज अहवालातून विजयानगरमधील काही घटनांचे तपशील मिळतात.

विजयानगरच्या राजांनी अनेक राजप्रासाद, किल्ले, मंदिरे आणि अन्य वास्तू बांधल्या. त्यापैकी काहींच्या अवशेषांवरून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक दृष्टी आणि वास्तूशिल्पशैली दृग्गोचर होते.

राजकीय स्थिती: तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक उत्तर हिंदुस्थानी दिल्लीच्या सुलतानांच्या अधिसत्तेखाली होता. देवगिरीचे यादव, द्वारसमुद्रचे होयसळ, वरंगळचे काकतीय आणि मदुराईचे पांड्य यांच्यामध्ये दक्षिण हिंदुस्थानची राजसत्ता विभागलेली होती. त्यांत आपसात नेहमीच संघर्ष व लढाया होत ⇨अल्लाउद्दीन खल्जी (कार. १२९६-१३१६) आणि त्याचा सेनापती मलिक काफूर यांच्या फौजांनी देवगिरी (१३०७), वरंगळ (१३१०), द्वारसमुद्र व मदुराई (१३११) अशा चारही हिंदू राजसत्तांचा पराभव केला. परिणामतः दक्षिण हिंदुस्थानातील हिंदू राजाची सत्ता संपुष्टात आली. यानंतर १३२० मध्ये दिल्लीच्या तख्तावर तुघलक घराणे आले.

कंपली हे बेल्लारी, धारवाड, रायचूर, अनंतपूर, शिमोगा व चितळदुर्ग या विद्यमान जिल्ह्यांचे मिळून दक्षिण भारतातील एक स्वतंत्र राज्य होते. ⇨मुहम्मद तुघलकाने १३२६ मधे ते जिंकून तेथील राजपुत्र व सरदार यांना कैद केले आणि इस्लाम धर्माची त्यांना दीक्षा दिली. त्यांत हरिहर व बुक्क हे संगमाचे दोन पुत्र होते. त्यांनी दिल्लीच्या सुलतानाचे दक्षिणेकडील प्रदेशाचे झालेले दुर्लक्ष आणि कंपलीमधील अनागोंदी यांचा फायदा घेऊन स्वधर्म स्वीकारून विजयानगर राज्याची स्थापना केली, असा सर्वसाधारण समज आहे. या संस्थापकांच्या उदयाबद्दल विद्वानांत मतैक्य नाही. काही इतिहासकार संगमाचे हे पुत्र मूळचे कर्नाटकातील होते, असे म्हणतात तर काहींच्या मते ते आंध्रप्रदेशातील असावेत फादर हेरास, बी. ए. सालेतोर व पी. बी. देसाई यांच्या मते ते कर्नाटकातील हिंदू सरदार असून होयसळ तिसरा वीर बल्लाळ याच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी ते लढले . के. ए. नीलकंठ शास्त्री, एन्. व्यंकटरमणय्या आणि वी. सूर्यनारायणराव यांच्या मते पे आंध्र प्रदेशातीलच होते. फार्सी कागदपत्रांतून आणि संस्कृत साधनातून हरिहर, बुक्क व इतर बंधू वरंगळ राज्यांच्या पदरी होते, अशीही माहिती मिळते. काकतीय राजधानीच्या पतनानंतर त्यांनी कंपलीच्या राजाची सेवा पत्करली. दिल्ली सुलतानाच्या फौजंनी कंपलिदेव याचा पराभव करून या संगमपुत्रांना कैद करून नेले आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. त्यांची दक्षिणप्रांतावर अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. या सुमारास विद्यारण्य स्वामींशी त्यांची गाठ पडली. स्वामींच्या प्रभावामुळे त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आणि दिल्ली सुलतानाविरूद्ध बंड पुकारून विजयानगरची स्थापना केली. परंपरागत कथा, मुसलमान इतिहासकारांचे−जिया-उद्दीन बरनी व इसामी आणि तत्कलीन कोरीव लेख यांचा विचार केला असता वरील मताला बहुतेक इतिहासकार पुष्टी देतात.

विजयानगर येथे १३३६ ते १६४६ पर्यंत संगम, साळुव, तुळुत्र व आरवीडु या चार घराण्यांनी राज्य केले तथापि १५६५ च्या ⇨तालिकोटच्या लढाईनंतर विजयानगरचा वैभवकाळ संपला आणि हे साम्राज्य जवळजवळ संपुष्टात आले. या लढाईनंतर विजयानगरची राजधानी होऊन तेथे एक निराळे राजघराणे राज्य करू लागले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...