२२ जुलै १६८३पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायबंध घालण्यासाठी मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ८००० सैन्यासह उत्तर कोकणात रेवदंड्यावर पुन्हा स्वारी केली व चौलच्या किल्ल्याला वेढा घातला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १६५७
मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १६६६
सत्पुरुष कवींद्र परमानंदांचा सत्कार
आग्रा कैदेत असताना थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या हवेलीच्या बागेत परमानंदांची यथोचित पूजा केली. त्यांना एक हत्ती व हौबासह एक हत्तीण, दोन उत्तम घोडे व वस्त्रालंकार दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले चाळीस स्वार त्यांच्या बरोबर दिले; आपल्याजवळील मौल्यवान कापड चोपड बांधून राजियांनी कवींद्रापाशी दिले. कवींद्राना परवाना मिळालेला होता. त्याप्रमाणे ते राजांचा निरोप घेऊन निघाले.  व आग्रा शहराच्या पश्चिमेकडे सुमारे २३ मैलांवर असलेल्या फत्तेपूर-शिक्री या गावी पोहचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १६७८
किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल
२५ मे १६७७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला वेढला. किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता. त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली. परंतू त्या हबशाने ती धुडकावून लावली. तो कोट होता देखील तसाच कडक, बेलाख.
सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन - येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते. तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.
जिंजीचा ताबा कुत्बशाहास न दिल्याने तो नाराज झाला व राजांच्या मदतीला दिलेले सैन्य माघारी गेले वेळप्रसंगी अपेक्षित अशी तोफखान्याची मदत न मिळाल्याने किल्ल्याला वेढा देऊन आतील किल्लेदारास जेरीस आणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, आणि म्हणूनच राजेंनी नरहर रुद्र या अधिकाऱ्यास २ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ देऊन हा वेढा दिला. व राजे शेरखान लोदिच्या समाचारास पुढे निघून गेले.
वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते. कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४ महिने, ६ महिने वर्षे दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग पडले.
मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला १४ महिने कसबसा किल्ला लढवून अब्दुलखान पुरा वैतागला होता. मराठ्यांच्या चिवटपणाची चव त्याने चाखली. अखेरीस किल्ल्यात साथीचा रोग पसरला. विजापूरहून देखील. मदत मिळेना. त्यामुळे रघुनाथपंतांकडून ५० हजार होन घेऊन अब्दुल्लाखानाने वेल्लोरचा किल्ला त्यांना देऊन टाकला. शके १६००, कालयुक्त संवत्सरात श्रावण शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच दि. २२ जुलै१६७८ वेल्लोरचा बलदंड गड स्वराज्यात दाखल झाला. यावेळी राजे रायगडी होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १६८२
निळो मोरेश्वर या मराठी सरदाराने चौलवर दुसरा हल्ला चढवला. परंतु पोर्तुगीज तोफखान्याविरुद्ध तो अयशस्वी झाला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १६८३
पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायबंध घालण्यासाठी मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ८००० सैन्यासह उत्तर कोकणात रेवदंड्यावर पुन्हा स्वारी केली व चौलच्या किल्ल्याला वेढा घातला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १७३२
धार संस्थानचा उगम झाला
धार संस्थान ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४,६०८ किमी. लोकसंख्या सु. २,५०,००० (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १६·५ लाख. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. अनेक लढायांतून मर्दुमकी गाजवणारा याचा पुत्र यशवंतराव पानिपतला कामी आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १७४२
विश्वासराव पेशवेंचा जन्म
विश्वासराव हे नानासाहेब पेशव्यांचे पुत्र व थोरल्या बाजीरावांचे नातू होत. त्यांच्या जन्मदिनी तिथी होती 'शके १६६४, श्रावण शुद्ध २, दुदुंभिनाम संवत्सर'. त्यादिवशी गुरूवार असुन नानासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई यांच्या पोटी हा पुत्र जन्माला आला. नानासाहेबांचा हा पहिलाच मुलगा. यामुळे सर्वात जास्त आनंद राधाबाईंना झाला कारण, त्यांना पणतु झाला होता. बारशाच्या वेळी नाव काय ठेवायचे असे विचारल्यावर राधाबाईंनी सांगितले 'विश्वास'. पुत्राचे कोडकौतुक करण्यासाठी नानासाहेब काही दिवस पुण्यातच थांबले. याच सुमारास नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई दक्षिणकाशी रामेश्वराच्या यात्रेसाठी निघाल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १७८५
पोर्तुगीजाना नगरहवेलीत उत्पन्नासाठी ७२ गावे
पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख जानोजी धुळप यानी पोर्तुगीजांचे ‘सांतान' नावाचे 'फ्रिगेट' पकडून विजयदुर्गला नेल्याचा उल्लेख आढळतो. हे फ्रिगेट सुस्थितीत पोर्तुगीजांच्या हातास लागले नाही. धुळपानी त्याच्या तोफा आणि इतर उपयुक्त सामान काढून घेऊन फक्त त्याचा सांगाडा तेवढा पोर्तुगीजांच्या हवाली केला. परंतु सांगाडा मिळाल्याने पोर्तुगीजांचे समाधान झाले नाही. त्यानी पुणे दरबाराकडे त्याची नुकसान भरपायी मागितली. पुणे दरबाराने ६६४५४ रुपये, ३००० रुपयांचे लाकूड व बारा हजार रुपये उत्पन्नाची गावे नुकसान भरपायीदाखल देऊ केली. दि. ११ जानेवारी १७८० या दिवशी पुणे दरबार आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सांतान युद्धनौकेच्या नुकसान भरपायीबाबत करार झाला. तदनुसार पोर्तुगीजाना नगरहवेलीत बारा हजार रुपये उत्पन्नाची ७२ गावे मिळाली. त्यांचा ताबा पोर्तुगीजानी अनुक्रमे दि. १० जून १७८३ व दि. २२ जुलै १७८५ रोजी घेतला. स. १७८५ साली पोर्तुगीज आणि पुणे दरबार यांच्यामध्ये जो करार झाला त्यात नगरहवेलीतील हिंदूना धर्मस्वातंत्र्य असावे, गोहत्त्येस बंदी, हिंदूंच्या परंपरागत चालीरितींचे व देवालयांचे संरक्षण वगैरे अटींचा समावेश होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १८४४
१८४४ चा गडकरी उठाव
उठावाची पहीली ठिणगी ही २२ जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकऱ्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकऱ्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली. दारूगोळा जमा केला. व ते प्रतिकाराचे तयारीत होते.
यावेळ पोलिटिकल एजंट रीव्हीज् याने गडकरी लोकांस शरण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यास गडकऱ्यांनी दाद दिली नाही. उलट बोलणी करणेस पाठवलेल्या लोकांस गडावर डांबून ठेवले. ही योजना फसलेमुळे रीव्हजने गडकरी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला व जे गडकरी शरण येतील त्यांना अभय मिळेल आणि त्यांचे तक्रारींचा विचार केला जाईल असे सांगूनही पाहीले. परतुं या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ जुलै १८५७
इ.स. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - झाशीची राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या
इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, 
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४