४ जुलै १६७२"छत्रपती शिवराय" आणि "छत्रसाल बुंदेला" यांची भेट.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १६५०
४ जुलै १६५० च्या चौलच्या पोर्तुगीज टपालपत्रात अफजलखानाला चौलचा मोकासा मिळाला असून त्याने तिथली सर्व हिंदू मंदिरे पाडल्याचा उल्लेख आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १६६९
महाराजांनी सर्जेराव जेधे (बाजी) यांस फटकारले. आवश्यक तिथे जिजाऊसाहेब व महाराज फटकारायलाही मागे पुढे पाहत नव्हते. कान्होजी नाईक जेधे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे पुत्र वाटणीसाठी आपसांत भांडू लागले. कान्होजींनी करून ठेवलेल्या मृत्यु- पत्रानुसार वर्तावे असे महाराजांनी सर्वांना समजावून सांगितले. पण बाजी जेधे यांचे समाधान होईना. त्यामुळे त्यांचे भावांशी मधून मधून खटके उडत. इ.स.१६६९ पावसाळ्यात पेरणीच्या ऐनवेळी बाजी जेधे यांनी सिवजी जेधे यांच्या विरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. तेव्हा त्याचा कांगावा लक्षात घेऊन महाराजांनी बाजी सर्जेराव जेधे याला चांगलेच फटकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १६७२
"छत्रपती शिवराय" आणि "छत्रसाल बुंदेला" यांची भेट.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १७१९
श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई राजधानीत दाखल...
तब्बल २९ वर्षांच्या कैदेतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी महाराणी येसूबाई यांची दिल्लीला जाऊन, मोठ्या अक्कलहुशारीने राजकारण लढवून सुटका केली.
४ जुलै १७१९ रोजी त्यांचे सातारा येथे आगमन झाले होते.
एकोणतीस वर्षे !
एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले.
अस म्हणतात की एखादा महापराक्रमी योद्धा हा लाखात एक असतो, पण त्याची पत्नी नक्कीच दहा लाखात एक असते. तिचं हृदय कशाचं असत हे तिलाच ठाऊक.
येसूबाई स्वराज्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय ६० वर्ष होते.
जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या, गृहकलह तसेच राजकीय संघर्षात होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या दुर्दैवी महाराणी म्हणजे महाराणी येसूबाई.
मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करण्यात येसूबाईंची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती.
संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर येसूबाईं तब्बल २९ वर्ष, ८ महिने अन १९ दिवस मुघलांच्या कैदेत होत्या. एकटेपणाने कशी काढली असतील त्यांनी एवढी वर्ष.
माहेरावर फितुरीचा कलंक,
पतीची चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून दुर्दैवी हत्या अन स्वतः सलग तीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत.
एवढे दुःख तर द्रौपदीच्या वाट्याला सुद्धा आले नाही.
दुर्दैवाने हे आम्हाला कधी शिकवलेच नाही वा कोणी सांगितले नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
‘श्री सखी राज्ञी जयती’ महाराणी येसूबाईसाहेबांना माझं शत शत नमन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १७१९
शाहूमहाराजांनी साताऱ्याच्या अदालत राजवाड्यात मोठा दरबार भरवला. हा दरबार दिल्ली स्वारीच्या मानपानाचा होता. दरबारात सेनापती मानसिंग मोरे, शंकराजीपंत सचिव, श्रीपतराव परशुरामपंत प्रतिनिधी, नारोराम शेणवी वाकेनवीस, आनंदराव रघुनाथ सुमंत, चिमणाजी दामोदर मोघे, अंबाजीपंत पुरंदरे, नाथाजी धुमाळ, नारो गंगाधर मुजुमदार, खंडेराव दाभाडे, पिलाजीराव गायकवाड, बाजीराव बल्लाळ (बाळाजीपंतांचा मुलगा), शंकराजी मल्हार, उदाजी पवार इ. अनेक मानकरी रांगेने उभे होते. दिल्लीच्या स्वारीनिमित्ये प्रत्येकाचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर खुद्द शाहू छत्रपतींनी स्वहस्ते बाळाजी विश्वनाथांचा भव्य सत्कार केला. त्यांना मानाची वस्त्रे दिली. बाळाजीपंतांच्याच थोरल्या मसलतीमुळे स्वराज्याच्या अन् चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्या होत्या. पण शाहू छत्रपतींना याहूनही आनंद झाला होता, तो म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी येसूबाईची सुटका करवली होती. आईच्या सुटकेपुढे चौथाईच्या सनदांचे काय मोल? म्हणूनच शाहूमहाराजांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना पाच महालांचे सरदेशमुखीचे वतन स्वतः पेश केले. त्याचबरोबर दिल्लीत चकमकीत मारल्या गेलेल्या बाळाजी महादेव भानूंच्या कुटुंबाला सांत्वनाप्रीत्यर्थ मौजे वाकसई हा गाव इनाम दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १७२९
स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.
सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १८१८
कॅप्टन स्वानस्टन ह्याने चांदोर येथे त्रिंबकजींना अटक केली
ईस्ट इंडिया कंपनीने भारतात संपूर्णपणे हातपाय पसरायच्या आधी तिला टक्कर द्यायच्या प्रयत्नात असणारा एक महत्त्वाचा माणूस म्हणजे त्रिंबकजी डेंगळे. 
दुसऱ्या बाजीरावसाहेबांची छुपी मदत घेऊन त्रिंबकजीने जो चौफेर धुमाकूळ घातला त्याने ईस्ट इंडिया कंपनी अतिशय त्रस्त होऊन गेलेली होती. आजच्या पोस्टमध्ये 'लंडन गॅझेट' मध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेले त्रिंबकजींवरचे निवडक रिपोर्ट्स पाहूया :
७ एप्रिल १८१७: त्रिंबकजीला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत!
२३ एप्रिल १८१७: त्रिंबकजीची फक्त ७० माणसे मारल्याबद्दल कर्नल स्मिथ स्वतःची पाठ थोपटून घेतो!
२६ मे १८१७: ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे दुसरे बाजीराव ह्यांच्याकडून त्रिंबकजीच्या निषेधाचा जाहीरनामा काढून घेतला. कंपनीने रायगड, सिंहगड, आणि पुरंदरचा ताबापण घेतला. (हा नावापुरताच ताबा ठरला कारण पुढे पुन्हा इंग्रजांना हे किल्ले जिंकून घ्यावे लागले!)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १९०२
स्वामी विवेकानंदांनी जगाचा निरोप घेतला
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ साली बंगालमध्ये झाला. मूळचे बंगालचेअसले तरीही कट्टर हिंदू विचारवंत असलेल्या स्वामीजींनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांचे संदेश आणि विचार देशा-परदेशात पोहचवण्याचे काम केले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी या कार्याला सुरूवात केली. ४ जुलै या दिवशी त्यांनी समाधी घेऊन या जगाचा निरोप घेतला. रामकृष्णांच्या सहवासात असलेल्या स्वामी विवेकानंदांमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली आणि यामधूनच रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

४ जुलै १९९९
लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४