२६ सप्टेंबर १६८९छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याहून जिंजीकडे रवाना झाले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ सप्टेंबर १६७३
छत्रपती शिवरायांनी श्यामजी नाईक यांना सिद्दी मसूदशी बोलणी करण्यासाठी पाठवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ सप्टेंबर १६७७
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील महसूर, मदुरा, रामनाड, त्रिचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी-छोटी राज्ये होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ सप्टेंबर १६८४
सुरतकरांचे लंडनला पत्र
सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजानी तिथल्या रहिवाश्यांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्लस राजाने मुंबई बेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजविन ची नेमणूक केली गेली. अधिकार मिळताच केजविनने मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून तह केला आणि सिद्दीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला. केजविन ने या तहाची माहिती लंडनला कळवली होती, यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुरतकरांनी लंडनला लिहून पाठवले की, "मुंबईच्या बंडखोराकडून संभाजीकडे गेलेल्या कॅ. गॅरीच्या कामाची आम्हाला कारवारकडून काहीच बातमी मिळाली नाही. परंतु संभाजीराजांनी त्यास झिडकारून लावला असून हा कारभार महागात पडला आहे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ सप्टेंबर १६८९
छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याहून जिंजीकडे रवाना झाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला. रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकरोहन केले. पुढील धोका ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यासह रायगड सोडून मुघलांना हुलकावणी देत प्रतापगड मार्गे पन्हाळगडावर आले. पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला. मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यावर लढण्यासाठी राजाराम महाराजानी जिंजीला जायचे ठरवले. त्यानुसार वेषांतर करून मानसिंग मोरे, प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत, निळो व बहीरो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम, खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यासह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री जिंजीकडे रवाना झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ सप्टेंबर १७५९
पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी
पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते.
पेशवे दफ्तर खंड २३ पत्र ९९
श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत.
पेशवे दफ्तर खंड २३ पत्र १००
श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment