शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन*.त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे मधील लेख. *मुत्सद्दी शहाजीराजे भोसले*

*शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन*.
त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे मधील लेख.
           *मुत्सद्दी शहाजीराजे भोसले* 
*शहाजीराजे भोसले यांचा जन्म मालोजी भोसले आणि त्यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) यांचे पोटी वेरूळ इथे १६मार्च १५९४ रोजी झाला.मात्र त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगर जवळील शहाशरीफ पीराला नवस बोलला होता,त्याप्रमाणे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली*.
*कालांतराने सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या कन्या जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा विवाह डिसेंबर १६०५ मध्ये झाला*.
*लखुजीराव जाधव व मालोजीराजे हे दोघेही व्याही निजामशाहीत सरदार होते.त्यांना सहा अपत्ये झाली.त्यांपैकी संभाजी व स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली.संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत (१६५४) मरण पावले.तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींराजेंच्या आणखी दोन पत्नी होत्या.शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले.त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले*.
*मालोजीराजे निजामशाहीच्या नोकरीतील एक मातब्बर सरदार होते.तसेच त्यांच्याकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इ.गावांची पाटीलकी होती.१६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मालोजीराजे मारले गेले.तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ (इनाम-जहागीर )त्यांच्या मुलांना दिला.मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले.पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर (१६२३) शहाजी स्वतःच जहागिरीचा कारभार पाहू लागले.वर्ष १६२४ मध्ये शहाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून मोगल व आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत मोठा पराक्रम केला व ते नावारूपाला आले.मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले.त्यानंतर निजामशाहीतील सरदार मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांत मतभेद झाले व शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले.परंतु १६२७ मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले.निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मोगलांकडे गेले.मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार दिली.परंतु वर्ष १६३२ मधे शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडविण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांना सोडून विजापूरकरांशी मैत्रीचा तह करून निजामशाही खानदानातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून संगमनेर जवळील पेमगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली व दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतच प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता.मात्र तीन वर्षांनी मोंगलानी पुन्हा हल्ला केला व यावेळी मुर्तझा मोंगलांच्या हाती लागला व शाजीराजेना तह करणे भाग पडले.या तहांप्रमाणे मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल असे ठरले व शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. त्यांनी तामिळी भागातील नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते.कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले.त्यांनी सर्व हिंदू संस्थानिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला*.
*शहाजीराजांना बंगळूरव आसपासचा प्रदेश खूपच भावला.त्यांनी तेथे राहूनच थोरले चिरंजीव संभाजीराजे यांचे सहाय्याने दक्षिणेतील राज्ये आदिलशाहीत आणली,मात्र तेथील राजांचे राजेपण अबाधित ठेऊन मांडलिक केले व आपलेसे केले व येथेचे शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेची जणू मुहूर्तमेढच रोवली. शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली.शिवाजीराजांचे दिमतीला दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख यांना पुण्यात पाठवले आले.मातोश्री जिजाउंच्या प्रेरणेने बालवयातच शिवाजीराजेनी बालसवंगडी गोळा करून स्वराज्य संकल्पनेस चालना दिली.त्यांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस असावी या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले व २५ जुलै १६४८ रोजी साखळदंडांनी बांधून विजापुर दरबारात हजर करण्यात आले. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे कळविले व या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. हा प्रयत्न यशस्वी ठरला व शहाजीराजांची दि.१६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. ह्या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजींना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले.सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपविण्यात आला*. 
*कालांतराने वर्ष १६६१ ते १६६२ दरम्यान शहाजीराजे पुणे जहागिरीत आले व काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला.आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून त्यांना आनंद झाला.काही काळानंतर ते पुन्हा कर्नाटकातील आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी शिमोग्याजवळ होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी येथे बांधली*.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४