आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *१९ जून इ.स.१६२६*
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*
*१९ जून इ.स.१६२६*
बहामनी शासकाच्या वजीर निजाम मलिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलीवर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलीवर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो.
*१९ जुन इ.स.१६३६*
शहाजहान बादशहाचा गुलाम अलीवर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिन्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण- नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:-
शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद्रा) राजदेहरे, कोलेर (लोकघेर) कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, आणि किल्ले रामसेज मात्र नंतर महाराजांनी इ.स. १६७०, १६७१, १६७२ या कालावधीत वरिल सर्व किल्ले स्वराज्यात आणले.
*१९ जुन इ.स.१६५९*
वसईचा पोर्तुगीज कॅप्टन लिहितो, ‘ शिवाजी राजांकडे भिवंडी, कल्याण व पेठा येथे २० संग्विसेशचे आरमार दंड्याच्या सिद्दीशी युध्द करण्याकरीता म्हणून आहे..दंड्याबरोबरच त्यांच्या
(शिवाजीराजांचा) दुसरा काही गुप्त हेतू असू शकेल आणि तो साष्टी बेटाला अत्यंत घातक होईल.
*१९ जुन इ.स.१६७६*
महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंदू करून घेतले.
नेतोजी पालकर (मुहम्मद कुलीखान) १० वर्षे काबूलकडे राहिल्यानंतरही नेतोजीराव महाराजांना (स्वराज्याला) विसरू शकले नाहीत. त्यांचे मन सदैव दक्षिणेकडेच धाव घेई. महाराजांकडे परत जाण्याकरिता अनुकूल संधीची वाट ते पहात होते. अखेर तशी संधी त्यांना मे इ.स.१६७६ मिळाली. दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे दक्षिणेची कामगिरी सोपविली गेली. आणि एक दिवस नेतोजीराव महाराजांकडे पळून गेले. महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावरच होता. नेतोजीराव स्वराज्यात परत आल्याचे पाहून महाराजांना अवर्णनीय आनंद झाला. मुहम्मद कुलीखान यांचे "नेतोजी पालकर" मध्ये विधिवत रुपांतर झाले. महाराजांनी त्यांना शास्त्रविधिनुसार पुन्हा हिंदु करून घेतले. महाराजांनी नेतोजीरावांना स्वधर्मात घेऊन सक्तीच्या धर्मांतराला अतिशय चोख उत्तर दिले.
*१९ जून इ.स.१६७७*
छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारिवर हल्ला.
*१९ जुन इ.स.१६८३*
औरंगजेब बादशहाची मनःस्थिती अतिशय विचलित!
औरंगजेब बादशहाची मनःस्थिती अतिशय विचलित झाली होती. याबद्दलचे सुरतकर इंग्रजांचे बोलके "मोगल (पातशहा) अद्यापि येथून हालला नाही. परंतु वदंता अशी आहे की, तो दिल्लीस जाण्याच्या विचारात आहे व छत्रपती संभाजी महाराज यांवरील लढाईची सुत्रे आपले अधिकाऱ्यांकडे सोपविणार आहे. तो अतिशय चिडखोर झाला आहे. त्याच्या मनाची अस्थिरता अतिशय वाढत आहे. त्यामुळे त्याचे सरदार त्याच्यावर नाराज आहेत. जर त्याचे आयुष्य लवकरच संपले नाही तर ते त्याला फार दिवस जगु देणार नाहीत.आम्हाला मात्र भितिदायक वातावरणात रहावे लागत आहे. मात्र औरंगजेब बादशहास मराठे सैन्याने हैराण केले होते हे खरे आहे.
*१९ जून इ.स.१७४३*
शाहू छत्रपतींच्या दरबारात स. १७२४ मध्ये श्रीपतराव प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. “मराठ्यांनी प्रथम दक्षिण दिग्वजय करावा दक्षिणेत आपली सत्ता प्रस्थापून दक्षिण ताब्यात आणावी आणि मग उत्तरेकडे जावे.” प्रतिनिधीचे कोणीही ऐकले नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यास हिंदु पतपादशाहीचा झेंडा हिमालयापर्यंत घेऊन जाण्यास मुभा दिली. कर्नाटक मामला फत्तेसिंग भोसले याजवर सोंपविला. फत्तेसिंगानी १७२५-२६ मध्ये एक स्वारी कर्नाटकात नेली. दुसरी स्वारी चिंत्रदुर्गची बाजीराव पेशव्यांनी नेली. स. १७३९ मध्ये रघोजी भोसले व फत्तेसिंग या उभयतांनी कर्नाटकावर चाल करून तेथील नबाबास मारीले व तंजावरचा राजा प्रतापसिंग यास अभय दिले. ह्यावेळी रघुजीचा संबंध फ्रेंच सेनापती डुमासशी आला. बाळाजी बाजीराव यांस पेशवाई पद दिल्यावर छत्रपतीनी पेशवे पदासाठी झुंजणाऱ्या बाबुजी नाईकास कर्नाटक मामला दिला. वास्तविक कर्नाटक सुभा, विजापूर, भागानगर आणि तुंगभद्रा व रामेश्वर मधील सर्व प्रदेश हा राजाच्या खाजगी कडचा. त्या सर्व प्रदेशात मुलूखगिरी करण्याचा हक्क बाबुजी नाईक बारामतीकर यांस शाहू महाराजांनी तारीख १९ जून १७४३ च्या हुकूमान्वये दिला. ह्या मोबदल्यात बाबुजी नाईकानी दरसाली महाराजास ७ लाख रुपये द्यावयाचे असून शिवाय ५ लाख रुपये खंडणी तंजावर राजाकडून घेऊन द्यावयाची असे बा. नाईकांनी कबूल केले होते. कर्नाटक क्षेत्र आपल्यास मिळाल्यावर बाबूजी नाईकांनी कर्नाटकात दोन स्वाऱ्या केल्या.
*१९ जून इ.स.१८८२*
छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले. जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी म्हणुन महादेव वा. बर्वे याची नेमणुक केली. बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी धूर्त व्यक्ती होता. त्याने स्वजातीचे शंभरच्यावर लोक प्रशासनात घुसवले. त्याने इंग्रजांच्या मदतीने कटकारस्थानाला सुरवात केली. महाराजांना वेड लागले अशी अफवा बर्वे पसरवू लागला. महाराज एकटेच लढत होते त्यांनी हार मानली नव्हती. इंग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतात बंदीस्त केले नंतर १९ जून १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणे मार्गाने अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर हलवले किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात ठेवले. कोणीही ओळखीचा चेहरा दिसणार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली. महाराजावर मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता. आडदांड सोल्जर ग्रीन याची महाराजांचा अंगरक्षक म्हणुन नेमणुक केली.
*१९ जून इ.स.१७९४*
शके १७१६ च्या ज्येष्ठ व ७ रोजी पेशवाईंतील प्रसिद्ध मुत्सद्दी हरिपंत फडके याचे निधन झालें.
*१९ जून इ.स.१९१७*
शेवटची वेल सुकली !
शके १८३९ च्या ज्येष्ठ व ३० रोजी दुस-या बाजीरावाची मुलगी कुसुमावती ( बयाबाई आपटे) वयाच्या सत्तराव्या वर्षी काशी येथें निधन पावली.
Comments
Post a Comment