दाभाडे घराणे
दाभाड्यांचा मूळपुरुष येसाजी हा तळेगाव (दाभाडे) (तालुके मावळ जिल्हा पुणे) येथील रहिवासी व मुकदम होता.
दाभाडे क्षत्रिय असून यांचें गोत्र शांडिल्य व देवक कळंबाचें आहे.
येसाजी हा शिवाजीमहाराजांचा हुजर्या होता. महाराज आग्र्यास गेले असतां येसाजीनें इकडे राजकुटुंबाची सेवा केली. येसाजीचा थोरला मुलगा खंडेराव होय.
राजाराम छत्रपती हे जिंजीस जातांना येसाजीसह खंडेराव हा त्यांच्याबरोबर गेला होता. जिंजीस राजाराम यांनां संभाजी हा पुत्र झाला, तेव्हां त्यांनीं येसाजीस तळेगांव, इंदुरी, धामणें आणि उरसें हीं गांवें इनाम करून दिलीं.
राजाराम हे जिंजीहून परत येत असतां मागें जनान्याच्या बंदोबस्तास येसाजी यास ठेवलें होतें. त्यानें मोठ्या युक्तीनें जनानखाना किल्ल्यांतून काढून अनेक संकटांतून पन्हाळ्यास आल्यावर येसाजी मेला. राजाराम हे जिंजीस जात असतां मोंगल मागें लागला होता. तेव्हा (खंडेरावाचा धाकटा भाऊ) शिवाजीनें त्याला पाठीवर घेऊन दौड मारली असता त्याची छाती फुटून व रक्ताच्या गुळण्या होऊन तो मेला होता.
पन्हाळ्यास आल्यावर छत्रपतींनीं खंडेरावास सेनाधुरंधर हें पद देऊन गुजराथ व बागलाणकडे मुलुखगिरीवर पाठविलें आणि वस्त्रें व पोषाख देऊन निशाण आणि जरीपटका हवालीं केला. शिवाय जुन्नर, पुणें व हरिश्चंद्र या तीन प्रांतांची व अकोले आणि जावळें या महालांची सरपाटिलकी (दर शेंकडा २ रु.) व चाकण परगण्यांतील आणि पारनेर परगण्यांतील १६४ गांवांची सरदेशमुखी दिली.
शाहुछत्रपती सुटून आल्यानंतर खंडेराव ताराबाईला सोडून त्यांनां जाऊन मिळाला. मध्यंतरी चंद्रसेनानें खंडेरावास ताराबाईकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. पुढें १७१७ त खंडेरावास सेनापतीचें पद शाहुछत्रपतीनें दिलें, तें पुढें त्याच्या कुटुंबांत कायम झालें. याच वेळीं दिल्लीच्या बादशहानें दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्ध उठण्यास शाहूमहाराजांस कळविलें असतां, त्यांनी तें काम खंडेरावावर सोंपविलें. त्यानें खानदेश गुजराथवर स्वार्या करून हुसेनचा रस्ता अडविला, तेव्हां त्यानें झुल्फिकारबेग यास त्याच्यावर पाठविलें. खंडेरावानें त्याची सारी फौज (झुल्फिकारसुद्धां) अडचणींत गांठून कापून काढली. तेव्हां हुसेननें आपले दिवाण मोहकमसिंग व चंद्रसेन जाधव यांनां रवाना केलें. त्यांची लढाई नगरजवळ झाली व पुढें खंडेरावानें निंबाळकर व सोमवंशी यांच्या मदतीनें मोंगलांचा पुरता मोड केला. यापुढें खंडेरावानें गुजराथ काठेवाडकडे मराठी अंमल बसवावा अशा हुकूम छत्रपतींनीं त्याला केला व श्रावणमासची दक्षिणा आणि कोटिलिंगार्चन विधी सेनापतीनें करावा असें ठरविलें (१७१७) पुढें सय्यद बंधूंच्या मदतीस जी मंडळी दिल्लीस गेली तींत खंडेराव हा सेनापती म्हणून गेला होता (१७१९).
दिल्लीहून परत आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांनीं जी सरंजामी पद्धत निर्माण केली, तींत खंडेरावास खानदेश देऊन गुजराथ काबीज केल्यास तीहि जहागीर देऊन टाकूं म्हणून त्याला आश्वासन दिलें. सय्यदांचा हस्तक अलमअल्ली व निजाम यांच्यांत (१७२०) बाळापूरची जी लढाई झाली, तींत सय्यदांच्या विनंतीवरून खंडेरावास लढण्यासाठीं म्हणून छत्रपतींनीं पाठविलें होतें. यानंतर फत्तेसिंग भोसल्यांच्या अधिपत्याखालीं कर्नाटकांत (१७२५-२६) झालेल्या स्वारींत खंडेराव हा हजर होता. बाळाजी विश्वनाथ व खंडेराव यांचें एकमत असे. त्यामुळें बाळाजीपंतांनीं ठरविलेल्या राज्यव्यवस्थेस अमलांत आणण्याचें लष्करी काम खंडेराव करी. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राहून तो खानदेश, वर्हाड व गुजराथ या तिन्ही प्रांतावर नजर ठेवी. यापुढें तो वृद्ध झाल्यामुळें त्याचा मुलगा त्रिंबकराव मोहिमेवर निघूं लागला. खंडेरावाने वसई ते सुरतपर्यंतचे कोंकण काबीज केलें होतें. त्याच्याबद्दल `बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते’ असा उल्लेख आहे (शाहु म. बखर). शाहूछत्रपतींची मर्जी त्याच्यावर पुष्कळ होती. तो एकदा पोटशुळानें आजारी पडला असतां महाराजांनीं त्याचा समाचार मुद्दाम घेतला होता. थोरले बाजीराव यांच्या वेळीं खंडेराव वृद्ध झाल्यानें व खुद्द श्रीमंतांनीं सेनानायकाचें काम हातीं घेतल्यानें त्याची विशेषशी हकीकत आढळत नाहीं. कदाचित खंडेराव मत्सरानें अलिप्त राहिला असावा. मात्र त्याबद्दल शाहुमहाराजांनीं त्याला समजुतीचीं पत्रें अनेकदां पाठविलीं होतीं. अखेर १७२९ त खंडेराव मूतखड्याच्या विकारानें मरण पावला. इतिहासप्रसिद्ध उमाबाई दाभाडे ही याची बायको होय. याला त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव असे तीन पुत्र होते.
संदर्भ :-
[शाहुमहाराज रोजनिशी; शाहु म. बखर; दाभाडे घराण्याचा इतिहास; मराठी रियासत. म. वि. इति. संग्रह. पेशवे दफ्तर. ले. २३].
Comments
Post a Comment