*१३ मे इ.स.१६७०*मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविषेश*

*१३ मे इ.स.१६५९*
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले.

*१३ मे इ.स.१६६६*
(वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)
रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात!
     कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती.

*१३ मे इ.स.१६७०*
मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

*१३ मे इ.स.१६७१*
महाराजांचे एक पत्र :
"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी क लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा."
वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते.

*१३ मे इ.स.१६७४*
इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून  हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते.

*१३ मे इ.स.१६७७*
(वैशाख वद्य सप्तमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार रविवार)
मराठ्यांनी जिंजी काबीज केली.
       किल्ले जिंजीचे शिवकालीन नाव चंदी तत्कालीन जिंजीचा सरदार नासीर मुहंमद याने महाराजांच्या हल्ल्यानंतर फारसा प्रतिकार न करता हा किल्ला महाराजांनी जिंकला. महाराजांना या किल्ल्यामुळे दक्षिणेत एक सुरक्षित आणि बळकट ठाणे निर्माण झाले. रायाजी नलगे याला किल्ल्याची हवालदारी तर तिमाजी केशव यांना किल्ल्याची सबनिशी दिली. काही फेरफार व इमारती बांधण्यासाठी रुद्राजी साळवी यांना या कामी नेमले. महाराजांना जिंजी काबीज झाल्याची बातमी मिळाली आणि पुढील काही दिवसातच महाराज जिंजीस रवाना झाले.

*१३ मे इ.स.१६८१*
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार)
किल्ले औरंगजेब बादशहाकडे अनेक सरदारांचे खोटे अर्ज!
     खान बहादुराचा अर्ज डाक चौकीने दरबारात आला. त्यात त्याने लिहिले होते की, "गनिमांची फौज औरंगाबादच्या भोवतालचा प्रदेश लुटण्यासाठी आली होती म्हणून खानजान, मुजफ्फरखान, रणमस्तखान, दाऊदखान वगैरे बादशाही सरदार स्वार होऊन तेथे पोहोचले. तर्फेची लढाई झाली. बादशाही सुदैवाने त्यांनी शत्रूंचे १५०० लोक मारले व अनेकांना जखमी केले. शत्रूने पळ काढला. बादशाही फत्ते झाली". ."औरंगजेब बादशहाचा दुसरा सरदार अनुपसिंग हाडा याने अब्दुल रहिमखान यास कळविले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगाबादेस झालेल्या लढाईत अत्यंत कष्ट घेतले आहेत. हुजूरास त्याचा पुर्ण अर्ज देत आहे, कृपेची आशा करतो. खान जहानबहादूर याने त्याचे ५०० जात ५००, पाचशे स्वार कमी केले होते. त्याच्या वाढीबाबत तजवीज केली आहे. असा अब्दुल रहिमखानाने बादशहाकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात आली. आशा आशयाची बढाई मारणारी पत्रे, खोटा आशय असणारी पत्रे लिहून, पाठवून बादशाही कृपा होण्यास लाळघोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते, म्हणूनच औरंगजेब मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवू शकला नाही.

*१३ मे इ.स.१६९९*
१३ मे १६९९ ला हरकाऱ्याकडून बादशहास समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला. तेथील देशमुखाने ७ दिवस गढी लढविली. शेवटी धनाजीन जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याजकडून ४० हजार रुपये चौथ म्हणून घेतले. हे बादशहास कळताच त्याने चीनकुलीजखान बहादूर यांस धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवाच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला.

*१३ मे इ.स.१८०३*
१३ मे १८०३ रोजी सर ऑर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना (दुसरे) 'हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहाद्दर' अशी उपाधी बहाल करून पुन्हा पेशव्यांच्या मसनदीवर बसवले.

*१३  मे इ.स.१८१८*
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...