महाराजा सयाजीराव आणि पाली भाषा*
*महाराजा सयाजीराव आणि पाली भाषा*
*- दिनेश पाटील, वारणानगर*
Dinesh Patil
(९६२३८५८१०४)
पाली भाषा ही मगध राज्याची लोकभाषा होती. तिला मागधी असेही म्हणत. ती इंडो-आर्यन भाषा गटात मोडते. ती मुळची भारतीय उपखंडातील भाषा आहे. बौद्ध धर्मशास्त्राची भाषा असल्यामुळे ती जगभर मोठ्या प्रमाणात अभ्यासली जाते. या भाषेबाबतचा सर्वात प्राचीन पुरातत्वीय पुरावा ब्रह्मदेशातील प्यु (Pyu) शहरात सापडलेल्या शिलालेखात आढळतो. व्युत्पत्तीशास्त्रानुसार पाली या शब्दाचा अर्थ *‘ओळ किंवा सर्वसामान्य तत्व’* असा होतो. ख्रिस्तपूर्व ७ व्या शतकात उत्तर भारतातील लोक दैनंदिन जीवनात पाली भाषेचा उपयोग करत. पुढे संपूर्ण भारतात पाली भाषा वापरली जाऊ लागली. सुमारे १ हजार वर्षे पाली ही साहित्याची भाषा म्हणून ओळखली जात होती. इंग्लंड देशापेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या मध्ययुगीन कोसला साम्राज्याची राजधानी सावत्थी येथील न्यायालयात पाली भाषा वापरली जात असे. कोसला साम्राज्यात जन्मलेल्या गौतम बुद्धांनी धार्मिक सुधारणा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पाली भाषेची निवड केली. आपल्या साम्राज्यात आधीपासूनच लोकांमध्ये रुजलेल्या पाली भाषेचा कौशल्याने उपयोग करत गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनी बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला.
ब्रिटानिका एनसायक्लोपिडियाच्या मते, *“मार्टिन लुथर किंग यांच्या धार्मिक सुधारणांमध्ये जर्मन भाषेने जी भूमिका बजावली तीच भूमिका बौद्ध धर्माच्या प्रसारात पाली भाषेने बजावली.”* बुद्धाच्या काळात पाली भाषा ही बुद्धाच्या धर्मशास्त्राची भाषा होती. बुद्धाने संस्कृत भाषेला विरोध करून तिची जागा पाली भाषेला दिली होती. बुद्धाचा उपदेश पाली भाषेतून मौखिक स्वरूपात इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात भारतातून श्रीलंकेत गेला. पुढे इ. स. पूर्व पहिल्या शतकात तो पाली भाषेत लिहिला गेला.
आयर्लंडमधील ब्रिटीश वसाहतीचे सचिव ट्युमर यांनी १८३७ मध्ये प्रकाशित केलेला *‘Mahazamsa or Great Chronicle of Ceylon’* हा ग्रंथ कोणत्याही युरोपियन व्यक्तीने संपादित केलेला पाली भाषेतील पहिला ग्रंथ होता. त्याच दरम्यान जेम्स प्रिन्सेप नावाचे संशोधक उत्तर भारतातील पुरातन शिलालेख, विशेषतः ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकातील अशोककालीन शिलालेख, वाचण्याचा प्रयत्न करत होते. शिलालेखांच्या ऐतिहासिक माहितीबरोबरच शिलालेखातील शब्दांचे प्रकार आणि व्याकरणीय उत्पत्ती समजून घेण्यासाठी प्रिन्सेप यांना ट्युमरच्या ग्रंथाचा प्रचंड उपयोग झाला. या ग्रंथाच्या आधारे शिलालेखांचे वाचन करताना त्यावरील अक्षरे ही पाली भाषेची अक्षरे असून हे सर्व शिलालेख पाली भाषेतील असल्याचा निष्कर्ष प्रिन्सेप यांनी काढला. प्रिन्सेप यांनी केलेले शिलालेखांचे विश्लेषण बहुतांश प्रमाणात अचूक असल्याने अन्य युरोपियन अभ्यासकांनीदेखील आपल्या संशोधनात मोठ्या प्रमाणावर ट्युमर यांच्या ग्रंथाचा उपयोग करण्यास सुरुवात केली.
*‘The Great Chronicle’* या ग्रंथाचे लेखक महानाम यांच्या मते, बुद्धघोष यांनी केवळ सिंहली भाषेत उपलब्ध असणाऱ्या ग्रंथांचे पाली भाषेत भाषांतर केले. या ग्रंथानुसार पाली ही मगध राज्यात बोलली जाणारी भाषा असली तरी तिला शब्दशः मगध राज्याची भाषा म्हणता येणार नाही. परंतु कोसला आणि मगध राज्याचा राजा अशोक याच्या न्यायालयात पाली ही भाषा न्यायालयीन कामकाजाची भाषा होती. म्हणूनच सदर लेखक पाली भाषेला बौद्ध धर्मातील न्यायदानाची भाषा असा पाली भाषेचा दर्जा निश्चित करतो. कारण त्याच्या मते बौद्ध धर्मशास्त्रीय ग्रंथांच्या रचनेपुर्वी पाली भाषेच्या अस्तित्वाबाबतचे थेट पुरावे सापडत नाहीत.
ओट्टो फ्रॅन्क्स हा लेखक त्याच्या १९०२ मध्ये प्रकाशित *‘Pali and Sanskrit’* या ग्रंथात म्हणतो, ‘इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात पूर्ण उत्तर भारतात ही भाषा बोलली जात होती.’ पाली भाषेतील धर्मविषयक ग्रंथ तीन भागात विभागलेले आहेत. हे तीन भाग पिठके म्हणून ओळखले जातात. त्यापैकी विनयपिठक हे पहिले होय. हे पिठक आदेशांच्या अंमलबजावणीबाबतचे आहे. दुसरे सुत्तपिठक विचारधारेबाबतचे आहे. तर तिसरे अभिधम्मपिठक विचारधारा ज्या मानसशास्त्रीय व्यवस्थेवर आधारलेली आहे तिचे विश्लेषण करते. ही तिन्ही पिठके कलकत्याच्या पाली टेक्स्ट सोसायटीने मूळ पाली भाषेत प्रकाशित केली आहेत.
सयाजीरावांचा भाषा विषयक दृष्टीकोन
सयाजीरावांचा भाषा विषयक दृष्टीकोन हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कारण सयाजीरावांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील कोणत्याही भाषेकडे तुच्छतेने किंवा आप-पर भावाने पाहत नव्हते. याचे कारण भाषेकडे ते ज्ञान प्राप्तीचे साधन म्हणून पाहत होते. त्याचबरोबर धर्माप्रमाणे भाषेच्या तौलनिक अभ्यासाचे महत्व सयाजीरावांनी जेवढे ओळखले होते तेवढे आज अखेर इतर कोणत्याही प्रशासकाने ओळखले नाही. महाराजांनी संस्कृत, पाली, अर्धमागधी यासारख्या प्राचीन आणि महत्वाच्या भाषांमधील ग्रंथांचे संवर्धन आणि अनुवाद हे काम राज्यकारभार हाती घेतल्यानंतर लगेचच सुरु केले होते.
आपल्या प्रजेची गुजराती भाषा आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये इंग्रजीबरोबर देशी भाषेतील ग्रंथ अनुवादित करून मातृभाषेला ज्ञानभाषा म्हणून सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आजही पथदर्शक आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सयाजीरावांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. परंतु सर्व अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करणे शक्य नसल्याने निरनिराळ्या शिक्षकांनी, अभ्यासकांनी व तज्ज्ञ गृहस्थांनी आपापल्या विषयावर सोपे आणि परिपूर्ण ग्रंथ लिहून परभाषेवरील अवलंबित्व दूर करण्याचे आवाहन सयाजीरावांनी केले.
मराठीमध्ये स्वतंत्र अभ्यास संशोधन करून लेखन करणारे लेखक फारच कमी असल्यामुळे जगातील आधुनिक ज्ञान आपल्या प्रजेला मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणून महाराज भाषांतराकडे पहात होते. १८८७ मध्ये महाराज जेव्हा पहिल्या परदेशवारीवर युरोपला गेले तेव्हा त्यांनी युरोपातून कॅसलचा *‘Dictionary of Cookery’* हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवाणांना दिले. मनिलाल द्विवेदी यांनी या योजनेअंतर्गतच पाटण येथील प्रसिद्ध जैन भांडारातील २१ ग्रंथांचे संशोधनात्मक भाषांतर केले होते.
लोकसाहित्यावरील मराठीतील पहिले पुस्तक म्हणजे आर. ए. एन्थोवेन यांच्या *‘The Folklore of Bombay’* या ग्रंथाचा गोविंद मंगेश कालेलकर यांनी केलेला *‘लौकिक दंतकथा’* हा मराठी अनुवाद सयाजीसाहित्य मालेत १९३४ मध्ये प्रकाशित करण्यात आला. प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून १९०३ मध्ये भिकाचार्य ऐनापुरे यांच्याकडून *‘प्रायश्चित्तमयूख’* हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर तयार करवून प्रकाशित केले. हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्मसाक्षरता अभियानाचा उत्तम नमूना आहे.
१८८७ मध्येच महाराजांनी प्राच्यविद्या संस्थेच्या पायाभरणीला सुरुवात केली. प्रारंभीस ही संस्था बडोद्यातील मध्यवर्ती वाचनालयातील संस्कृत विभाग म्हणूनच कार्यरत होती. पुढे १९१५ मध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यासाठी सयाजीरावांनी *‘गायकवाड ओरिएन्टल सिरिज’* या महत्वपूर्ण संशोधनात्मक ग्रंथमालेची सुरुवात केली. प्राच्यविद्येसंदर्भातील कामाची व्याप्ती विचारात घेऊन १ सप्टेंबर १९२७ रोजी *‘बडोदा प्राच्यविद्या मंदिर’* या स्वतंत्र दर्जा असणाऱ्या संस्थेची स्थापना सयाजीराव महाराजांनी केली.
या प्राच्यविद्या संस्थेने बौद्ध धर्मावरील मूळ ग्रंथ प्रकाशित केले होते. महाराजांनी मराठीमध्ये बौद्ध धर्मावरील १७ ग्रंथ १९३६ पूर्वी म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयापूर्वी प्रकाशित केले होते. सयाजीरावांनी दामोदर यंदेंना ग्रंथ प्रकाशनात बौद्ध धर्मावरील मराठी ग्रंथांना अग्रक्रम देण्याची सूचना केली होती. १९२४ पासूनच बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने मुळ बौद्ध ग्रंथांच्या पुनर्मुद्रनाचे काम सुरु केले. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने प्रकाशित केलेल्या या ग्रंथांची संख्या १३ भरते.
१ सप्टेंबर १९२७ रोजी बडोद्यात प्राच्यविद्या संस्थेची स्थापना करण्यात आली. सामान्य प्रजेला ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून उत्तम ग्रंथांचे गुजराती व मराठीत भाषांतर करण्याचे काम सुरू झाले. या संस्थेत हस्तलिखितांचा संग्रह, छापील किंवा प्रकाशित पुस्तके, समिक्षित आवृत्ती विभाग, भाषांतर विभाग असे एकूण चार विभाग होते. भाषांतर विभागांतर्गत हिंदू धर्मासोबतच जैन, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माची पुस्तके मराठी, गुजराती, हिंदीमध्ये भाषांतर करून धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला.
मराठीतील आद्य शिवचरित्रकार कृष्णराव अर्जुन केळूसकर हे सयाजीरावांच्या प्रेरणेनेच लेखक झाले. महाराजांनी मॅक्स मुल्लरने भाषांतरीत केलेल्या *‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’* या मालेत प्रकाशित झालेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी केळूसकरांवर सोपवली. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेतर लेखक ठरतात. १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे प्रकाशन महाराजा सयाजीरावांनी केले होते. म्हणूनच मराठीतील एक महत्वाचे प्रकाशक बाबा भांड म्हणतात, *“सयाजीराव महाराजांएवढा मोठा प्रकाशक गेल्या शतकात झाला नाही.”*
बौद्ध धर्म
१८९८ पूर्वीच सयाजीरावांचा बुद्धाशी चांगला परिचय होता याचा भक्कम पुरावा केळूसकरांच्या आत्मचरित्रात मिळतो. केळूसकरलिखित बुद्धचरित्र वाचून बौद्ध धर्म स्वीकारलेले मुंबईचे ए. एल. नायर आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात सयाजीराव महाराजांचे असणारे योगदान अधोरेखित करताना म्हणतात, *“माझे महाराजांबद्दलचे कौतुक अधिक तीव्र करणारी बाब म्हणजे भारतात बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होण्याअगोदर महाराजांनी भगवान बुद्धामध्ये अतिशय उच्च प्रतीची रुची दाखविली. तसेच बुद्धाबद्दल अतीव प्रेम व्यक्त केले.”* विशेष म्हणजे २ मे १९३१ ला मुंबई येथील डॉ. नायर यांच्या बुद्ध विहाराचे उद्घाटनसुद्धा सयाजीरावांच्याच हस्ते झाले होते. सयाजीराव महाराजांनी त्यांच्या अभ्यासिकेत अभ्यासाच्या टेबलावर बुद्धांची मूर्ती ठेवली होती.
३० डिसेंबर १९३७ रोजी कलकत्ता येथे केलेल्या, बेंगाल बुद्धिस्ट असोसिएशनच्या स्वागतपर भाषणात सयाजीरावांनी मांडलेले विचार त्यांच्या बुद्ध प्रसाराप्रतीच्या तळमळीची साक्ष देतात. या भाषणाच्या अखेरीस सयाजीराव म्हणतात, *“आपल्या संस्थेचे प्रचारक आमच्या संस्थानाकडे आपण पाठविल्यास मी त्यांचा यथायोग्य परामर्श घेईन आणि बौद्ध धर्माची खरी तत्त्वे जनतेत पसरावी म्हणून मला शक्य असेल ते सर्व प्रकारचे साहाय्य त्यांना देईन.”*
३१ डिसेंबर १९१० रोजी सयाजीराव महाराजांनी बडोद्यातील ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसविला. या पुतळ्याच्या चबुतर्यावर बौद्ध धर्माची तत्वे कोरलेली होती. हा आधुनिक भारतातील बुद्धाचा पहिला पुतळा होता. बडोदा संस्थानात संस्थानातर्फे अधिकृतरित्या बुद्धजयंती साजरी केली जात होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठीच्या ग्रंथखरेदीसाठी बाबासाहेब सिद्धार्थ कॉलेजच्या ग्रंथपालांना बडोद्याला पाठवत असल्याचे संदर्भ त्यांच्या चरित्रात सापडतात.
धर्मानंद आणि सयाजीराव यांच्या १९०६ पासूनच्या नात्याचा धागा बौद्ध धर्म हाच होता. १९०८ ते १९११ अशी तीन वर्षे बौद्ध धर्मविषयक ग्रंथलेखन करण्यासाठी आणि महाराष्ट्रात बौद्ध धर्म व पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी महाराजांनी धर्मानंद कोसंबींना दरमहा ५० रुपयाची शिष्यवृत्ती दिली होती. पुढे १९५६ मधील बाबासाहेबांचे धर्मांतरसुद्धा या पार्श्वभूमीवर आपल्याला विचारात घ्यावे लागेल. १९०९ मध्ये धर्मानंदांनी बडोद्यात बौद्ध धर्मावर ५ भाषणे दिली. त्यातील ३ भाषणे ‘बुद्ध, धम्म आणि संघ’ या नावाने छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात आज उपलब्ध आहेत. या पुस्तकाच्या छपाईसाठी सयाजीरावांनी ५०० रु. ची मदत केली. १९१० मध्ये कोसंबींना अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात प्रा.वॉरन यांच्या बौद्ध धर्मातील *‘विशुद्धी मार्ग’* या ग्रंथावरील संशोधनात सहकार्य करण्यासाठी बोलविण्यात आले होते. महाराजा सयाजीरावांची परवानगी घेऊन ते १९१० मध्ये हार्वर्ड विद्यापीठात गेले.
सयाजीरावांनी प्रकाशित केलेले बौद्ध धर्मासंदर्भातील ग्रंथ:
१) दीघनिकाय भाग-१ : चिंतामण वैजनाथ राजवाडे, (१९१८)
२) जातकांतील निवडक गोष्टी, प्रथमार्ध : चिंतामण विनायक जोशी, (१९३०)
३) दीघनिकाय भाग २ रा : चिंतामण वैजनाथ राजवाडे, (१९३२)
४) बौध्दधर्म अर्थात धर्मचिकित्सा : रामचंद्र नारायण पाटकर, (१९३२)
५) भगवान बुध्दचरित्र व धर्मसार संग्रह : रामराव मार्तंड भांबुरकर, (१९३४)
६) बुद्धकालीन भारतीय समाज : ना.गो. कालेलकर, (१९३६)
७) Samarangana- Sutradhara (1924-25)
८) Sadhanamala Vol. I - (Ed.) Benoytosh Bhattacahrya (1925)
९) Sadhanamala Vol.II - (Ed.) Benoytosh Bhattacahrya (1928)
१०) Asoka (Gaikwad Lectures) - Radhakumund Mookerji
११) Two Vajrayana Works - (Ed.) Benoytosh Bhattacahrya (1929
१२) Tantrarahasya - (Ed.) Dr. R. Shamashatry (1930)
१३) Pre-Dinnaga Buddhist Texts on Logic from Chinese Sources – Guiseppe Tucci (1930)
१४) Guhyasamaj Tantra - (Ed.) Benoytosh Bhattacahrya (1931)
१५) Tattvasangraha of Santaraksita in two volume (1937-1939)
१६) Law of Vivada Cintamani (1943)
१७) Nispannayogavali - (Ed.) Benoytosh Bhattacahrya (1949)
१८) A Buddhist Bibliography
१९) Universities In Ancient India: D. J Apate.
पाली भाषा आणि भारतातील विद्यापीठ शिक्षण
भारतातील बौद्ध धर्माच्या अभ्यासाचा पहिला संस्थात्मक प्रयत्न म्हणजे १८९२ मध्ये कलकत्ता येथे स्थापन झालेली ‘द बुद्धिस्ट टेक्स्ट सोसायटी’ ही संस्था होय. या संस्थेने बौद्ध धर्माचा अभ्यास, प्रसार आणि महत्वाचे म्हणजे पाली भाषेचे पुनरुज्जीवन हे काम हाती घेतले. परंतु विद्यापीठ शिक्षणात पाली भाषेचा समावेश १९०७ मध्ये कलकत्ता विद्यापीठात झाला. हा अभ्यासक्रम म्हणजे एम. ए पाली होय. यानंतर मुंबई विद्यापीठाशी सलग्न असणारा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये धर्मानंद कोसंबी यांच्या नेतृत्वाखाली १९१२ मध्ये एम. ए पाली हा अभ्यासक्रम सुरु झाला. तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये १९४० मध्ये युगल किशोर बिर्ला यांच्या आर्थिक पाठबळाने संस्कृत विभागात पाली भाषेचा अभ्यास सुरु झाला. हे सर्व प्रयत्न पदव्युत्तर म्हणजे एम. ए स्तरावरचे होते.
या पार्श्वभूमीवर १९१५ मध्ये बडोदा कॉलेजमध्ये पदवी स्तरावर तर १९३० मध्ये हायस्कूल स्तरावर पाली भाषेच्या शिक्षणाला सुरुवात झाली. म्हणजेच भारतात पदवी व हायस्कूल स्तरावर पाली भाषेचा समावेश करणारे सयाजीराव हे बहुदा पहिले ठरतात. कलकत्ता, मुंबई आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यासारख्या ब्रिटीश भारतातील महत्वाच्या विद्यापीठांच्या प्रयत्नांची आपण जेव्हा सयाजीरावांच्या कामाशी तुलना करतो तेव्हा पुन्हा एकदा पाली भाषा आणि बौद्ध धर्म यांच्या पुनरुज्जीवनातील सयाजीरावांचे क्रांतिकारक योगदान अधोरेखित होते.
पाली भाषा आणि महाराजा सयाजीराव
महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बौद्ध धर्म आणि पालीभाषा यांना दिलेला राजाश्रय समजून घेणे महत्वाचे आहे. कारण आधुनिक भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणारे सयाजीराव हे पहिले प्रशासक आहेत. विशेष म्हणजे आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय आपण बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे त्यांना देत आलो. परंतु बाबासाहेबांच्या धर्मांतरागोदर ५० वर्षे सयाजीरावांनी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य अतिशय मुलभूतपणे आणि व्यापक प्रमाणात हाती घेतले होते. हे कार्य महाराजांनी स्वत:च्या व्यासंगातून बौद्ध धर्म समजून घेवून सुरु केले होते हे महत्वाचे आहे. पाली भाषेतील ग्रंथांचे संवर्धन आणि अनुवाद हा त्यातील सर्वात मुलभूत टप्पा होता. पाली भाषेचा इतिहास आणि महत्व यांची चर्चा आपण सुरुवातीलाच केली आहे. याचे कारण हेच आहे कि बौद्ध धर्माचे मूळ तत्वज्ञान आणि पाली भाषा यांच्यातील नाते स्पष्ट व्हावे आणि सयाजीरावांच्या बौद्ध धर्माबाबतच्या दृष्टीकोनाची व्याप्ती अधोरेखित व्हावी.
१९१२ मध्ये धर्मानंद कोसंबी अमेरिकेहून परतले व त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. विशेष म्हणजे ही नोकरी कोसंबींना मिळवून देण्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोठा वाटा होता. महाराजांनी महाराष्ट्रात बौद्ध धर्म प्रसारासाठी बाबासाहेबांच्या धर्मांतरापूर्वी ५० वर्षे साहाय्य करून चांगली सुरुवात केली होती असे म्हणता येईल. यावेळी कोसंबींनी सयाजीरावांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्याची विनंती केली. महाराजांनी कोसंबींची ही विनंती मान्य करून दरमहा १५ रुपयांच्या दोन आणि १० रुपयांच्या दोन अशा चार शिष्यवृत्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू केल्या. या चार शिष्यवृत्या १९१२ ते १९१८ या कालावधीत कोसंबी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरीत असेपर्यंत सुरु होत्या. विशेष म्हणजे मुंबई प्रांतातील पाली भाषा शिकवले जाणारे हे एकमेव कॉलेज होते. मुंबई प्रांतात पाली भाषेसाठी शिष्यवृत्ती सुरु करणारे सयाजीराव पहिले प्रशासक ठरतात.
महाराजांनी १९१५ मध्ये बडोदा कॉलेज व १९३० पासून बडोदा हायस्कूलमध्ये सुद्धा पाली भाषा शिकवण्याची व्यवस्था केली. कोसंबींचे फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी चिंतामण वैजनाथ राजवाडे हे बडोदा कॉलेजमध्ये पाली भाषेचे पहिले प्राध्यापक होते. त्यांनी बौद्ध धर्मावरील दोन पुस्तकांचे बडोदा संस्थानसाठी मराठी भाषांतर केले होते. १९१५ मध्ये महाराजांनी चिंतामण वैजनाथ राजवाडे यांना *‘दीघनिकाय’* या पाली भाषेतील महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्याचे आदेश दिले. महाराजांच्या या आज्ञेवरून प्राध्यापक राजवाडे यांनी *‘दीघनिकाय’* या बौद्ध ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून तीन भागात प्रसिद्ध केले. यातील पहिला भाग १९१८ मध्ये प्रकाशित झाला. सयाजीरावांनी पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे मराठी अनुवाद अग्रक्रमाने प्रकाशित करण्याची सूचना दामोदर सावळाराम यंदे यांना १९१५ पूर्वीच दिली होती. यावरून मूळ बौद्ध तत्वज्ञान समजून घेण्यासाठी पाली भाषा किती महत्वाची आहे याचे महाराजांचे भान अधोरेखित होते.
पाली भाषेच्या संवर्धनामागे सयाजीरावांची भूमिका महाराष्ट्राला परिचित नाही. पाली भाषेतील बौद्ध साहित्य बुद्धाच्या समतावादी तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी महत्वाचे आहे हे ओळखणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. बडोद्याच्या सेन्ट्रल लायब्ररीमध्ये बौद्ध धर्मावरील जगातील सर्वोत्तम ग्रंथ उपलब्ध होते. आजही जगातील महत्वाच्या परंतु दुर्मिळ ग्रंथांच्या शोधात महाराष्ट्रातील अनेक विद्वान बडोदावारी करत असतात.
बडोद्याची *‘द गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड फिलॉसॉफी’* ग्रंथमाला
बौद्ध तत्वज्ञानाचा वैयक्तिक जीवनात स्वीकार करणारे ते आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. पाली भाषेतील बौद्ध वाड्मयाचे मराठी भाषांतर, प्राचीन बौद्ध ग्रंथांचे संपादन-प्रकाशन यासाठी महाराजांनी जेवढे योगदान दिले तेवढे अन्य कोणत्याही भारतीय प्रशासकाने आधुनिक काळात दिलेले नाही. सयाजीरावांनी १९१८ मध्ये *‘द गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड फिलॉसॉफी’* ही ग्रंथमाला सुरु केली.
या मालेच्या घोषणेतच *‘सहिष्णू भूमिकेतून आणि अलौकीक बुद्धिमत्तेच्या व्यासंगातून लिहिलेले ग्रंथच या मालेसाठी स्वीकारले जातील’* अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. या मालेत एकूण १७ ग्रंथ समाविष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांवरील ग्रंथांबरोबर तुलनात्मक धर्म अभ्यास आणि नीतिशास्त्र या विषयांचाही त्यात अंतर्भाव होता. तुलनात्मक धर्म अभ्यासावरील ही जगातील पहिली आणि आजअखेरची एकमेव ग्रंथमाला आहे. या मालेत एकूण १७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. हा प्रत्येक ग्रंथ ३००-४०० पानांचा आहे. म्हणजेच सुमारे ७ हजार छापील पानांचा मजकूर या अध्यासनाने प्रकाशित केला.
या मालेत प्रकाशित झालेल्या *‘अ बुद्धिस्ट बिब्लिओग्राफी’* या दोन खंडातील ग्रंथात जगभर बौद्ध धर्माबाबत झालेल्या संशोधनाची सूची एकत्रित करण्यात आली. पहिल्या खंडात संस्कृत, युरोपियन भाषांबरोबरच पाली भाषेतील बौद्ध साहित्याची चर्चा करण्यात आली आहे. या ग्रंथाच्या दुसर्या खंडात यूरोपियन भाषेतील भारतीयांचे बौद्ध वाड्मय, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जावा, कंबोडिया, हिमालयीन पट्ट्यातील, तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, चीन, कोरिया, जपान इ. १३ देशातील बौद्ध वाड्मयाचा आढावा घेणारी सूची देण्यात आली आहे. भारतातील अशा प्रकारचा बहुधा हा पहिला ग्रंथ असावा. हा ग्रंथ बुद्धाच्या जगभरातल्या स्वीकाराच्या शोधाचा एक अद्वितीय प्रयत्न आहे.
Comments
Post a Comment