पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रावणात केस का कापू नये किंवा दाढी का करू नये?
श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराची पूजा-आराधना केली जाते. श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात आणि श्रावणाच्या महिनाभरात अनेक गोष्टी पाळतात. जसे की मांसाहार न करणे, केस न कापणे किंवा दाढी न करणे इत्यादी.
पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रावणात केस का कापू नये किंवा दाढी का करू नये? यामागे आध्यात्मिक कारण असू शकते. अनेकांना असे वाटेल; पण यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
वैज्ञानिक कारण
जुन्या काळापासून श्रावण महिन्यात केस कापू नये, असे सांगितले जाते. पूर्वी केस कापायला चांगली उपकरणे नसायची आणि उपलब्ध उपकरणे लोह धातूपासून बनवलेली असायची. त्या काळात वीज नसल्यामुळे अशा उपकरणांपासून दुखापत होण्याची भीती जास्त असायची.
त्यात श्रावण महिन्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीतीही असायची आणि जर एखादी दुखापत झाली, तर या महिन्यात जास्त ऊन नसल्यामुळे जखम लवकर भरायची नाही. त्यामुळे डोके आणि चेहऱ्यावर कोणतीही जखम होऊ नये म्हणून श्रावणात केस कापू नये, असे म्हटले जायचे.
श्रावणात केस न कापण्यामागे आजही आध्यात्मिक कारण असल्याचे समजले जाते. तसेच अनेक लोक या महिन्यात नखेही कापत नाहीत, मांसाहार करीत नाहीत. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे अनेकांना या गोष्टी करणे योग्य वाटत नाही.
Comments
Post a Comment