आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १६५६*
छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला
२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे.
मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १६६५*
किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १६८७*
गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग कर्नाटक प्रांतात होता तो जिंकण्यासाठी कासीमखान या सरदाराला मोठे सैन्य देऊन रवाना केले होते. हे सैन्य एप्रिल १६८७ च्या सुमारास कर्नाटकात पोहोचले. त्यांनी तुमकुर, चिकनहळ्ळी, चंद्रगिरी व पेनुगोडा ही म्हैसूर राज्यातील शहरे जिकली व पुढे ते बेंगलोर पर्यंत गेले. कर्नाटकातील बरेचसे गड मुघलांनी घेतले होते. शिवाय पुलीकत आणि सॅन थोमा येथील सुभेदार मुघलांना शरण गेले होते. कासीमाखनाच्या नेतृत्वाखाली जिंजी आणि त्याभोवतालचा प्रदेश जिंकण्यासाठी मुघल सैन्य आगेकूच करत होते. मुघल सैन्याची दुसरी एक तुकडी मच्छलीपट्टणमच्या आसपास गेली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १७०४*
सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे सैनिक म्हणून नोकरीस आलेल्या कान्होजी आंग्रे यांनी आपल्या स्वभावाने सर्वांशी जवळीक निर्माण केली. पुढे त्यांनी कुलाब्याचे आरमार प्रमुख सिधोजी गुजर यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर कान्होजी आंग्रे दुय्यम सरखेल म्हणून नियुक्त झाले. त्यांनी आपली दूरदृष्टी आणि पराक्रमाच्या जोरावर कोकणपट्टीवर मुघल आणि सिद्दीशी टक्कर देत आपले आरमार बळकट करण्यास सुरुवात केली. आपले आरमार इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या तोडीचे बनवण्यासाठी त्यांनी नवीन लढाऊ जहाज बांधणे, बंदुकीच्या नळ्या आणि दारू तयार करणे सुरू केले. कान्होजी जवळ यावेळी १६ ते ३० तोफा असलेली १० गुराब आणि ४ ते १० तोफांची ५० गलबते होती. सण १७०४ च्या नोव्हेंबर महिन्यात कान्होजीनी आपली ७ जहाजे पेणच्या नदीत नांगरून ठेवली होती. त्यांनी कोणतीही हालचाल न करता इंग्रजांचे मुंबई बेट आणि मुख्य भूमी यातील दळणवळण तुटले होते. आपले आरमार काय करू शकते हे त्यांनी इंग्रजांना जाणवून दिले होते. कान्होजी आंग्रे यांनी पेणच्या नदीत आपली जहाजे नांगरून ठेवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १७१८*
दुर्गादास राठोडचा मृत्यू 
(जन्म - १३ ऑगस्ट १६३८)
औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली.
जसवंतसिंगाच्या मृत्यूनंतर (१६७८) जन्मलेला त्याचा मुलगा अजितसिंग याला गादी मिळू नये व जोधपूरचे राज्य खालसा करावे, म्हणून औरंगजेबाने नाना तऱ्हेची कुटिल कारस्थाने रचली परंतु दुर्गादासाने मोठ्या चातुर्याने व धैर्यान अजितसिंगाला औरंगजेबाच्या तावडीतून वाचविले व वाढविले. १६८१ मध्ये राजपूतांच्या सहकार्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाविरुद्ध बंड केले, तेव्हा मोगलांच्या पाठलागातून अकबराला वाचविण्यासाठी दुर्गादास त्याला दक्षिणेत संभाजीच्या आश्रयास घेऊन गेला. १६८७ साली अकबर इराणला गेल्यानंतर त्याच्या दोन मुलांना घेऊन दुर्गादास जोधपूरला गेला. त्याने व अजितसिंग यांनी गेलेला मुलूख परत मिळविण्यासाठी मोगलांविरुद्ध लढा सुरू केला. अकबराची मुले ताब्यात मिळविण्यासाठी मोगलांनी १६९४ साली दुर्गादासाशी तह केला. अजितसिंगाला औरंगजेबाने क्षमा करून त्याला जालोर, सांचोर, सिवाना हे परगणे आणि दुर्गादासाला ३,००० ची मनसबदारी दिल्यानंतरच १६९८ मध्ये दुर्गादासाने मुले स्वाधीन केली. १७०२ मध्ये दुर्गादासाने अजितसिंगाच्या सहकार्याने मोगलांविरुद्ध पुन्हा बंड केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही. १७०४ मध्ये औरंगजेबाने दुर्गादासाला क्षमा करून त्याला गुजरातमध्ये त्याचे पूर्वीचे पद दिले. १७०९ साली दुर्गादासाने अजितसिंगाला जिद्दीने जोधपूरची गादी मिळवून दिली पण पुढे अजितसिंग दुर्गादासाचे उपकार विसरला आणि त्याने त्यास आपल्या राज्यातून हाकलून दिले. अजितसिंगासाठी इतकी वर्षे झटून शेवटच्या काळात त्याला उदयपूरच्या महाराण्याकडे नोकरी करावी लागली. त्याचे चारित्र्य शुद्ध व कर्तृत्व मोठे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १७५०*
रामराजे आपल्याला जुमानत नाहीत, आपल्या आज्ञेत वागत नाहीत म्हटल्यावर ताराबाईंनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी वेगळीच योजना आखली. २२ नोव्हेंबर १७५० रोजी रामराजे यांना चंपाषष्टीनिमित्त पुजेला व भोजनाला किल्ल्यावर बोलावले. रामराजे यांनी किल्ल्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांच्या सल्लागारांनी दिला, पण छत्रपतींनी तो मानला नाही. निमंत्रणाप्रमाणे ते किल्ल्यावर गेले आणि तेथील कार्यक्रम आटोपून परतू लागले असता त्यांना रोखून धरण्यात आले. दारे लावून घेण्यात आली. छत्रपती रामराजांना ताराबाईंनी बंदिस्त केले आणि सर्व कारभार आपल्या हाती घेतला. रामराजे अटकेत होते त्या काळात ताराबाईंनी त्यांना निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पण घडलेल्या घटना इतक्या चमत्कारीक होत्या कि रामराजेंच्या मनात ताराबाईंच्या विषयी प्रेम किंवा विश्वास वाटत नव्हता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ नोव्हेंबर १७६०*
पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोनाचे दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेचे मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. २२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी अफगानी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४