५ नोव्हेंबर १६६७ ला म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांना नामोहरम केले

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ नोव्हेंबर १५५६*
पानिपतची दुसरी लढाई
पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर.
या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी,मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने "सम्राट हेम चंद विक्रमादित्य" असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले.
हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्‍याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान  जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली.
बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गिळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने 'अकबर' हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ नोव्हेंबर १६६७*
छत्रपती शिवाजी महाराजांची पोर्तुगीजांवर कारवाई
छत्रपती शिवरायांनी आरमारी सामर्थ्य वाढविल्यामुळे पोर्तुगिजांना छत्रपती शिवरायांच्या हेतू विषयी संशय वाटू लागला होता. विशेषतः छत्रपती शिवरायांनी सुरत लुटल्यानंतर पोर्तुगिजांना अधिक काळजी वाटू लागली होती. सुरतेची लूट स्वराज्यात आणताना छत्रपती शिवरायांना पोर्तुगिजांनी मदत केली होती, असा निष्कर्ष पोर्तुगीज दप्तरातील पत्र व्यवहारावरून निघतो. छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याला पोर्तुगीज वचकून होते. पण त्याच बरोबर छत्रपती शिवरायांची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याची भितीही त्यांना वाटत होती. म्हणूनच वरकरणी पोर्तुगिजांनी छत्रपती शिवरायांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि, छत्रपती शिवरायांच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे हे दुटप्पी वर्तन महाराज ओळखून होते. कुडाळचे देसाई छत्रपती शिवरायांना विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते. वास्तविक पाहाता कुडाळचा लखम सावंत याचा पराभव करून छत्रपती शिवरायांनी त्याला चांगलाच धडा शिकविला होता. त्याने छत्रपती शिवरायांबरोबर तह करून अभयदान मिळविले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याकडे गेल्यानंतर लखम सावंताने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या. विशेषतः पोर्तुगिजांची फूस असल्यामुळे लखम सावंत छत्रपती शिवरायांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास उद्युक्त झाला. आग्र्याहून परतल्यानंतर लखम सावंतचे उद्योग आणि पोर्तुगिजांच्या कारवाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्या. तेव्हा लखम सावंतला घडा शिकविण्यापेक्षा पोर्तुगिजांनाच धडा शिकवावा असे छत्रपती शिवरायांनी ठरविले. त्याप्रमाणे ५ नोव्हेंबर १६६७ ला म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांना नामोहरम केले. छत्रपती शिवरायांचा प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आमि प्रतिकार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराज थेट गोव्यापर्यंत येऊ शकेल अशी भिती पोर्तुगिजांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवरायांबरोबर तह कला. या तहाप्रमाणे लखम सावंताला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा आणि कुतुबशहानंतर पोर्तुगिजांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ नोव्हेंबर १७२७*
बाजीरावांनी सैन्यासह सप्टेंबरात पुण्याहून निघून पुणतांब्याजवळ गोदावरी उत्तरून जालना, शिंदखेड वर छापेमारी केली. तेव्हा प्रतिकारार्थ निजामाचा सरदार ऐवजखान बाजीरावंस सामोरा आला. त्याचा पराभव ५ नोव्हेंबर इ.स.१७२७ रोजी बाजीरावांनी केला. तिथून पुढे बाजीराव वऱ्हाडातून वायूवेगाने निघाले. वाटेच माहूर, मंगलूर, वासिम हे तालुके त्यांनी जिंकून घेतले. असेच त्वरेने वायव्येकडुन वळून खानदेशात घुसून गुजरात 
कडे पलायन केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ नोव्हेंबर १८१७*
इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी (लहुजीचे वडील) सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४