१५ सप्टेंबर १६७५खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १६७५
खांदेरी व इतर ठिकाणी इंग्रजांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन छत्रपती शिवराय व इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" यांची रायगडावर पुन्हा भेट.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १६७८
छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी सनद लिहून दिली.
ही सनद छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना १५ सप्टेंबर १६७८ रोजी अर्पण केल्याचा स्पष्ट उल्लेख सनदेत आहे, सनदेत आजुबाजुची काही गावे सुद्धा इनाम दिल्याचा उल्लेख आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १६७९
मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून खांदेरी बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. मिन्चीन पोचताच ह्युजेसने ताबा मिन्चीन कडे सोपवला व तो लाकुडफाटा व इतर सामान मिळवण्याकरिता काही काळ मुंबईला परतला. ह्या कालावधीत मिन्चीन गस्त सांभाळीत होता परंतु मराठ्यांच्या छोट्या होड्या मोठ्या जहाजास चकवून वल्हवत पुरवठा सुरु ठेवत असल्याचे त्याने कळवले व ह्युजेस सोबत गेलेली शिबाडे त्वरित पाठवावी अशी विनंती त्याने मुंबईला १५ सप्टेंबर रोजी पाठवली. पत्र मिळताच मुंबईकरांनी शिबाडे रवाना केली परंतु ह्युजेस यावेळी आजारी पडल्याने त्याला विश्रांती देवून लेफ्टनंट फ्रांसिस थोर्पला रवाना करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १६८३
शहाआलम दक्षिण कोकणच्या स्वारीवर
आता खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पटावर छत्रपती संभाजी महाराजांचे राजकारण रंगू लागले होते. आरमारात पोर्तुगिजांचा त्रास कमी कसा होईल याचबरोबर पोर्तुगिजांवर आब राखून मुघली सेनेला त्यांचा होणारा दाणागोटा व रसदेचा पुरवठा खंडित झाला तर मुघली सैन्याचे खच्चीकरण होऊन त्याचे सामर्थ्य घटेल व त्रस्त होऊन ते फार काळ स्वराज्यात राहणार नाही या दृष्टीनेच छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगिजांकडे पहात होते. त्यामुळे उत्तरेतील बंदोबस्त करून दक्षिण गोव्याकडे जाण्यापुर्वी मोघली फौजेचा सुगावा लागणे गरजेचे होते. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गोव्यावर चालून जात आहेत अशी बातमी औरंगजेबास लागली तेव्हा त्याने आजच्याच दिवशी शहाआलमला दक्षिण कोकणच्या स्वारीवर पाठविले. त्यावेळी शहाआलम बरोबर इखलासखान, आतशखान, जाननिसारखान हे सरदार होते. राजकारणाच्या पटावर औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराज यांनी सारीपाट उघडला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १६८४
"आपली पातशाही वाढवावी, पठाणांची नेस्तनाबूत करावी, दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हातात राहील ते करावे. उत्तरेतील मुघलांचा हात इकडे शिरकू देऊ नये. "हे दूरदर्शी धोरण छत्रपती शिवाजी महाराज, गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्यात ठरले होते. त्यांच्या निधनानंतर दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाचा शंभुराजेंच्या विरोधात टिकाव लागत नसल्याने त्याने विजापुरवर आक्रमण करायचे ठरवले. त्यामुळे शंभुराजेंनी विजापुरला मदत पाठवली. यासंबंधीची इंग्रजांची नोंद, "मोगल फौजा विजापूरच्या तटाभोवती वेढा देऊन आहेत. गोवळकोंड्याचा राजा, शंभूराजा व अदिलशहा यांचा एक गट झाला आहे. हे त्रिकुट मोगलांशी संगर करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी भांडणाचा निकाल लागेल आणि हे या प्रांताचे धनी होतील. शंभूराजे व पोर्तुगीज यांच्यात भांडण चालूच आहे आणि शंभूराजे फक्त मोगल जाण्याची वाट पाहत आहे. सवड मिळताच तो त्यांचा प्रदेश गिळंकृत करीलच." या पत्रावरून शंभूराजे हे आपल्या पित्याच्या रण नीतीने स्वराज्य चालवत होते हे लक्षात येते. कारवारहून सुरतेला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती १५ सप्टेंबर १६८४.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १७३७
वसईच्या मोहिमेत मराठ्यांचे सुमारे पंचवीस हजार सैन्य गुंतले असल्याचा पोर्तुगीजांचा अंदाज होता. ह्या अफाट सैन्यासमोर आपला निभाव लागणे कठीण आहे, अशी अटकळ जरी पोर्तुगीज लष्करी अधिकाऱ्यानी केली असली तरी पावसाळा सुरू होताच मराठ्यांच्या हालचाली थंडावतील व आपणाला प्रतिकाराची तयारी करण्यास उसंत मिळेल, असे त्याना वाटले होते. परंतु त्यांचा होरा सपशेल चुकला. पोर्तुगीजांना प्रतिकाराची तयारी करण्यास उसंत मिळू न देण्याचा जणू मराठ्यानी चंगच बांधला होता. आणि या धोरणानुसार पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास ९ जून १७३७ या दिवशी मराठ्यानी वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यात चार हजार सैनिकानी भाग घेतला होता. किल्ल्यातील शिबंदी जागरूक असल्याने तिने हा हल्ला परतवून लागला. या हल्ल्यात मराठ्यांचे बरेच सैनिक कामास आले. दुसरा हल्ला पहिल्या हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी दि. १५ सप्टेंबर १७३७ या दिवशी झाला. त्यात आठ हजार सैनिकानी भाग घेतला होता. हाही हल्ला आतून जबरदस्त मारा करून पोर्तुगीजानी परतवून लावला. त्यांच्या अंदाजाप्रमाणे मराठ्यांचे दोन हजार सैनिक ठार आणि पांचशे जखमी झाले. मराठी कागदपत्रांप्रमाणे या हल्ल्यात चारशे पाचशे ठार आणि चारशे पाचशे जखमी झाले. वसईचा वेढा तब्बल दोन वर्षे दीड महिना चालू राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १८१९
प्रतापसिंग महाराजांचे वडील दुसरे शहाजी निवर्तल्यावर प्रतापसिंग महाराजांस छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यांत आला आणि महाराज मातोश्री आईच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार करू लागले. पेशव्यांचे आणि प्रतापसिंग महाराजांचे जमले नाही. गंगाधरशास्रीचा खून झाल्यावर पेशव्यांची घटका भरली असे जबाबदार मराठे व्यक्तींना वाटून त्यांनी इंग्रजांच्या मदतीने आपली सोय लावून घेण्याची सुरवात केली. प्रतापसिंग व माईसाहेब यांनी गुप्तपणे बोलणी लावून आपण इंग्रजांना अनुकूल असल्याचे कळविले. बाजीरावानी इंग्रजांशी इ. स. १८१७ मध्ये युद्ध सुरु केले. तेव्हा छत्रपतींस सातारा किल्ल्यावरुन त्यानि वासोट्यास हलविले. ह्या अगोदरच्या प्रकरणांत बाजीरावाने पुण्याहून पळ काढल्यावर सातारा राजाच्या सर्व कुटुबियांस आपल्या बरोबर घेतले व पुन्हा पळापळीस सुरवात केली. अष्ट्याच्या लढाईत बाजीरावाबरोबर प्रतापसिंह महाराज होते. त्यांना इंग्रजांनी तारीख १९ फेब्रुवारी १८१८ रोजीच्या लढाईनंतर आपल्या छावणीत घेतले. जनरल मन्रोच्या सल्ल्यावरुन एल्फिन्स्टनने “बाजीराव (दुसरे) बंड आहे, त्यास आम्ही दूर केले आहे, बाजीरावास कोणी मामलेदाराने मदत करू नये” असा जाहिरनामा छत्रपतींच्या नांवे काढिला आणि सर्वसामान्य मराठ्यांची भक्ती छत्रपतींकडे आहे हे जाणून इंग्रजांनी प्रतापसिंहाची स्थापना साताऱ्यास केली. सातारा गादीचे पुनरुथ्थान केले. दिनांक १५ सप्टेंबर १८१९ रोजी कंपनी सरकारने राजा प्रतापसिंगाशी तह करून त्यांस १४ पेट्यांचे राज्य दिले. त्यांत नीरा व वारणा ह्या नद्यांमधील भीमा- कृष्णासंगमापावेतो मुलुख आला. राजा प्रतापसिंग यांनी राज्याचा मुलकी कारभार त्यांचे ब्रिटीश सल्लागार कॅप्टन ग्रँट डफ यांच्या सल्ल्याने करावयाचे असे ठरविले. अशा रितीने छत्रपतींचे राजे केले. प्रतापसिंह राजाने परकीय सत्तेशी पत्रव्यवहार न करणे, नेमून दिलेल्या शिबदीपेक्षा शिबंदी न वाढवणे आणि इंग्रजी सरकारशी एकनिष्ठ रहाणे अशा अटी त्यांस घालून दिल्या. कॅप्टन ग्रँट डफ हा प्रतापसिंह महाराजांपेक्षा साडेतीन वर्षांनी मोठा होता. तीन वर्षे साताऱ्यास एजंट म्हणून राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१५ सप्टेंबर १९४८
भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment