१९ सप्टेंबर १६७९खांदेरी बेटावर इंग्रजाची मराठ्यांशी पुन्हा भर समुद्रात चकमक उडाली, यात इंग्रज लेफ्टनंट "फ्रांसिस थोर्प" हा अधिकारी मारला गेला आणि मराठ्यांनी पुन्हा "खांदेरी"वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १६६१
कोकणातील बंदरे विजापूरच्या आदिलशहाच्या अधिसत्तेखाली होती. पोर्तुगिजांनी १५ डिसेंबर १६३८ ला विजापूरकरांशी तह केला होता. या तहनाम्यास एकंदर बारा कलमे आहेत. अकराव्या कलमान्वये विजापूरकर व पोर्तुगीज यांच्यामध्ये असे ठरले होते की जहाजे, गलबते व होड्या राजेसाहेबांच्या शाही बंदरातून सफर करतील त्यांस पोर्तुगिजांनी मलबारी व इतर यांच्यापासून संरक्षण दिले पाहिजे व त्यास सोबत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत आणि ज्या अर्थी पोर्तुगिजांना या तहनाम्याचे पालन करणे अपरिहार्य होते, त्या अर्थी पोर्तुगिजांनी राजेसाहेबांच्या जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने अभय दिले व चाच्यांच्या भीतीने विजापूरकरांना सवलत म्हणून आपली जहाजे त्यांच्या प्रदेशात पाठविण्याचे सोडून दिले. विजापूरकर व शिवाजी महाराज यांच्यामध्ये तद्नंतर झालेल्या शांतता करारानुसार (१९ सप्टेंबर १६६१) पोर्तुगिजांचे समुद्रमार्गे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांना मुक्त वाट द्यावी असे ठरले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १६७९
खांदेरी बेटावर इंग्रजाची मराठ्यांशी पुन्हा भर समुद्रात चकमक उडाली, यात इंग्रज लेफ्टनंट "फ्रांसिस थोर्प" हा अधिकारी मारला गेला आणि मराठ्यांनी पुन्हा "खांदेरी"वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १६७९
मुंबई इंग्रजांनी दि. २१ नोव्हेंबर १६७० रोजी लंडनला पाठविलेल्या पत्रांत, मराठ्यांचा नौदलाध्यक्ष सारंग असून त्यास दर्यासारंग असे सामान्यतः म्हणण्यात येते असे म्हटले आहे. १९ सप्टेंबर १६७९ रोजी मुंबईहून पाठविलेल्या पत्रात नमूद केले की, कल्याणला शिवाजी महाराजांनी एका साध्या अशा नौदलाची कोनशिला बसविली. या कामात त्याने पोर्तुगिजांची मदत घेतली. जहाज बांधणीत तरबेज असलेल्या पोर्तुगीज कारागिरांच्या मार्गदर्शनाखाली लढाऊ जहाजे बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पोर्तुगीज जहाज बांधणीकराच्या हाताखाली तीनशे चाळीस पोर्तुगीज व इतर कामगार काम करीत होते. १६५६ साली शिवाजीचे नाविक दल हे इतके विस्तृत झाले की, त्यामुळे पोर्तुगीज धास्तावून गेले आणि पोर्तुगीज व्हाइसरॉयने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या एका पत्रांत असे लिहिले आहे की, शिवाजी महाराजांनी वसई जिल्ह्यात आता भिवंडी, कल्याण व पनवेल या बंदरात लढाऊ जहाजे बांधण्यास सुरुवात केली. अमात्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांच्या मते नौदल हे मराठा राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. सागरी सार्वभौमत्व हे शिवाजी महाराजांच्या नौदलाचे मुख्य लक्ष्य किंवा ध्येय होते. इ.स. १६५७ व १६५९ च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी आपले नौदलातील पहिल्या जहाजाचे सुकाणू कल्याणच्या खाडीत चालू केले होते. पुढील दोन वर्षात या प्रवेशाच्या कमकुवतपणाने शिवाजी महाराजांचे लक्ष वेधून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १६८३
छत्रपती संभाजीराजेनी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या चौल वर हल्ला केला होता. या हल्ल्याने पोर्तुगीजांचे जबरदस्त नुकसान झाले होते. मराठ्यांचा हा वेढा उठवण्यासाठी आणि मुघलांनी कोकण ताब्यात घेण्यापूर्वी आपण तो जिंकण्यासाठी गोव्याचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि आलव्होर याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे ठरवले. आपण फोड्यावर हाला केला तर मराठे चौल वरून माघार घेतील असा त्याचा समज होता. त्यापूर्वी त्याने गोव्यातील जनतेला कळवले की संभाजीराजे मोठ्या सैन्यानिशी गोव्यावर हल्ला करणार आहेत. विजरईने असाही आदेश काढला की साष्ट,बारदेश आणि गोव्यातील लोकांनी एकत्र जमून नदी ओलांडून मराठी मुलखातील गावावर हल्ला करून लूट आणि जाळपोळ करावी. पण पावसामुळे हे त्यांना साध्य झाले नाही. सप्टेंबर महिन्यात फोंडयाला वेढा घालण्यासाठी त्याने तयारी सुरू केली. विजरईच्या आज्ञेनुसार २ बोटी भरून ३ ते ४ हजर माणसे त्याच्याकडे आली, पण यातील फक्त जवळपास १५० सैनिक होते तर बाकीच्या स्त्रिया व मुले होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १६९०
झुल्फिकार खानाजवळ एवढा अवाढव्य गड जिंकून घेण्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या व भरपूर दारूगोळाही नव्हता. त्याने १९ सप्टेंबर १६९० त मद्रास इंग्रजाकडे २०० मण दारूगोळा आणि ५०० पायदळाची मागणी केली. कालांतराने ५०० मण दारू पावडर व दारूगोळे ५००पायदळ आणि ३० तोफजाणकार यांची मागणी केली. नोव्हेंबर ९० मध्ये झुल्फिकार खानाने फ्रेंच कंपनीकेडेही दारूगोळा आणि युरोपियन सैनिकांची मागणी केली. इंग्रज कंपनी व फ्रेंच कंपनीतील सुमारे १०० सैनिक मोगलांच्या मोठ्या पगाराला भाळून जिंजीच्या वेढ्यांत सामील होण्यासाठी मोगलांच्याकडे गेले. अशा रीतीने झुल्फिकार खानाने छावणी मजबूत केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १७०२
खेळण्याहून औरंगजेब १७ जून रोजी निघाल्यावर चोवीस दिवसांनी औरंगजेब आणि त्याचे सैन्य मोठ्या कष्टाने ओढ्या पार झाले. खेळण्याहून चाळीस कोसांचा रस्ता अडतीस दिवसांत आक्रमून मोगल सैन्य १७ जुलै १७०२ ला पन्हाळा येथे पोहोचले. तशाच हालअपेष्टा सोशीत सैन्य वडगाव (पन्हाळ्याच्या पूर्वेस तेरा मैलांवर) येथे ३० जुलै १७०२ ला पोहोचले. तेथे १ महिना ८ दिवस औरंगजेबने
मुक्काम केला आणि सैन्याला विश्रांती दिली. त्यानंतर बादशहाने बहादूरगडला लष्करासह जाण्याचे ठरविले. त्याकरता पाण्याने तुडुंब भरलेली कृष्णा नदी पार करावयाची होती. हा विचार लष्करांतील लोकांस समजताच त्यांना धडकी भरली. लष्कराने नऊ कोसांचा प्रवास सोळा टप्प्यात पूर्ण केला. १९ सप्टेंबर १७०२ ह्या दिवशी लष्कर कृष्णेच्या काठावर पोहोचले. नदीचे उतारही सापडेनात. नदीवर थोड्याशा नावा होत्या. त्याही जुन्या आणि मोडलेल्या. भांडखोर नावाडी आणि बेमुर्वत जुलूम करणारी माणसे लोकांना नदी पार करताना सर्वस्व काढून घेण्यास टपून बसलेली असत. अशा स्थितीत काहींनी
नदी पोहून जाण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरल्यामुळे आणि नाव बुडाल्यामुळे कित्येक माणसे नदीत
बुडाली. अशी हर प्रकारची संकटे सहन करून ते मोगल सैन्य बहादूरगडला नोव्हेंबर १७०२ ला पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १७२६
खंडो बल्लाळ चिटणीस यांचा मृत्यू – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१९ सप्टेंबर १८१५
त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रज अधिकारी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने कैदेत ठेवले...
त्रिंबकजी डेंगळे हे एक उत्तम कारभारी आणि प्रशासक होते. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर
गेल्या पंधरा वर्षात असा उत्तम कारभारी पेशव्यांना मिळालेले नव्हते. नानांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त, कडवेपणा आणि मुख्यतः दौलतीचे हीत हे सारे गुण जसेच्या तसे त्रिंबकजींत पुरेपूर उतरले होते. बाजीरावांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याकरिता गुप्त हालचाली करून एक वर्षानंतर त्रिंबकजी डेंगळे इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या त्या कडक बंदोबस्तातून अलगद निसटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १८१८
'भीमा-कोरेगाव'चे युद्ध
जून १८१८ रोजी एल्फिन्स्टनने कलकत्त्याला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती. १९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले. एल्फिन्स्टनला ह्या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले. त्याला अशीही सूचना आली की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ सप्टेंबर १८४४
१८४४ चा गडकरी उठाव
उठावाची पहीली ठिणगी ही जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकर्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकर्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली. दारूगोळा जमा केला. व ते प्रतिकाराचे तयारीत होते.
यावेळ पोलिटिकल एजंट रीव्हीज् याने गडकरी लोकांस शरण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यास गडकर्यांनी दाद दिली नाही. उलट बोलणी करणेस पाठवलेल्या लोकांस गडावर डांबून ठेवले. ही योजना फसलेमुळे रीव्हजने गडकरी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला व जे गडकरी शरण येतील त्यांना अभय मिळेल आणि त्यांचे तक्रारींचा विचार केला जाईल असे सांगूनही पाहीले. परतुं या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही.
यानंतर मात्र रीव्हजकडे गडावर हल्ला करणेशिवाय पर्याय उरला नाही. यासाठी रीव्हजने १९ सप्टेंबर १८४४ रोजी मद्रास कडील फौजेतील १२०० सैनिकांची तुकडी गडावर पाठविली. त्यांचेजवळ ४ तोफा व दारूगोळा होता. सामनगड आकाराने जरी लहान किल्ला असला तरी तटबंदीनेयुक्त बळकट होता. त्यामुळे गड सहजासहजी हाती पडणे शक्य नव्हते. गडावर देखील लढण्याची तयारी होती. त्यांचेजवळ ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदुकबारदार आणि इतर २०० सैनिक होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment