५ सप्टेंबर १६६१छत्रपती शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १६५९
युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, निंबाळकर घराण्याची लेक सौभाग्यवती, स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा आज स्मृतिदिन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १६६१
छत्रपती शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १६६५
छत्रपती संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १६६५
शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये मिर्झा राजा जयसिंग याच्याबरोबर तह करून आपले २३ किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले. त्यानंतर, जून १६६५ मध्ये त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रातील काही भागाचा संक्षिप्त अनुवाद असा आहे:
“हा गुन्हेगार आणि पापी मनुष्य सर्व प्रकारच्या शिक्षेला पात्र आहे…. तो आशा करतो की क्षमा करणाऱ्या आपणाकडून या सेवकाला जीवदान दिले जाईल आणि त्याचे गुन्हे माफ करणारे बादशाही फर्मान सादर केले जाईल….”
त्यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पाठविलेल्या ५ सप्टेंबर १६६५ या तारखेच्या फर्मानातील सुरुवातीचा काही भाग असा आहे:
"तू अत्यंत लीनतेने आणि दुर्बलता व पश्चात्ताप व्यक्त करून लिहिलेला अर्ज मी वाचला. बादशाही सिंहासनाची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त करण्याच्या इच्छेने तू मिर्झा राजा जयसिंग यांच्याकडे कसा आलास याचे वर्णन त्या अर्जात तू केले आहेस आणि तुझ्या गुन्ह्यांबद्दल आमच्याकडे क्षमायाचना केली आहेस."

यावर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे पत्र पाठविले भागाचा संक्षिप्त अनुवाद असा आहे:
"आयुष्य अर्पिणारा क्षुद्रतम सेवक शिवा लिहितो की: ... त्याचे गुन्हे माफ होण्यास व दोष झाकले जाण्यास हा पापी व दुष्कर्मी मनुष्य पात्र नव्हता तरी बादशाहांच्या कृपेने त्याला नवीन जीवन आणि अकल्पनीय सन्मान प्राप्त झाला आहे...."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १६७६
छत्रपती शिवाजी महाराजांनीही रयतेची राज्यव्यवस्था ही गोम अगोदरच ओळखली होती. शेती नि शेतकरी टिकावा म्हणून त्यांनी सक्त ताकीद दिली होती सरदार, जहागीरदारांना. ५ सप्टेंबर १६७६ रोजीचे रयतेच्या राजाचे एक पत्र प्रशासनावर कशी जरब असावी याचे उत्तम उदाहरण आहे. कोकणातील प्रभावळीचे सुभेदार रामजी अनंत यांना महाराजांनी पत्र लिहून शेतकर्‍यांची काळजी वाहण्याचा हुकूम दिला. प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. शेती करायला प्रोत्साहन द्यावे. ज्यांच्याकडे शेती नाही, बैल नाही त्यांना बारदाणा पुरवावा. हीच सेवा केली तरी राज्याच्या खजिन्यात भर पडेल असे समजावे असा मांदियाळ मजकूर पत्रात आहे. दूरदृष्टी व रयतेच्या भल्याची तळमळ यातून दिसते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १७९५
ऐतिहासिक शिंदे छत्री
एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला.  १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४) मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १८१५
इ. स. १८१५ च्या आषाढ महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाजीराव पेशवे पंढरपूरला गेले. त्यांनी गंगाधरशास्त्री पटवर्धनांनाही आग्रह केल्यामुळे त्रिंबकजी डेंगळे आणि शास्त्रीबुवा पंढरपूरला गेले. यावेळेस पंढरपुरात प्रचंड गर्दी होती. दि. १० जुलै १८१५ या दिवशी रात्रीच्या वेळेस मंदिरात कीर्तन ऐकून पुन्हा मुक्कामावर जात असतानाच मंदिराजवळच्या एका बोळात काही अज्ञात मारेकरी घालून शास्त्रीबुवांचा खून करण्यात आला. शास्रीबुवांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी ही इंग्रजांची, पर्यायाने एलफिन्स्टनची असल्यानेच त्याने ताबडतोब पेशव्यांकडे चौकशी अन् तपास करण्याची मागणी केली आणि पेशव्यांचा तपास पूर्ण व्हायच्या आतच 'शास्त्रीबुवांच्या खुनाच्या वेळी त्रिंबकजी तिथे होता' असा आरोप करून एलफिन्स्टनने त्रिंबकजी डेंगळ्यांच्याच अटकेची मागणी केली. एलफिन्स्टनच्या या सर्व चाली त्रिंबकजी आणि बाजीराव (दुसरे) पेशव्यांनी पुरेपूर ओळखल्या होत्या. परंतु एलफिन्स्टन अगदी हट्टालाच पेटला आणि त्रिंबकजीच्या अटकेच्या कारणावरून इंग्रजी पलटण पुण्यात घुसवणार हे पाहताच त्रिंबकजी डेंगळे स्वतःहून एलफिन्स्टनच्या अधीन झाले. त्याआधी दि. ५ सप्टेंबर १८१५ या दिवशी बाजीराव पेशव्यांनीच त्रिंबकजींना सातारा प्रांतातील वसंतगड किल्ल्यावर कैदेत ठेवले (दिखावा केला!) परंतु तैनाती फौजेचा अधिकारी कॅ. फोर्ड आणि
एलफिन्स्टन या दोघांनीही 'त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करा' असा हट्टच धरल्याने दि. १९ सप्टेंबर १८१५ या दिवशी त्रिंबकजीला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले. इंग्रजांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठाण्याच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ सप्टेंबर १८३९
छत्रपती प्रतापसिंह महाराजांविरुद्ध स्थानिक कारस्थानी लोकांनी इंग्रज अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपनी सरकारकडे तक्रारी केल्या. तसेच स्वतः प्रतापसिंह महाराजांची स्वतःच्या आपल्या हाताखालील जहागीरदार लोकांविषयीची आपण स्वामी असल्याची-भूमिका इंग्रजांना मान्य नव्हती. प्रतापसिंह च्या राज्यात ब्राह्मणांवर जुलूम होतो, आपला धर्म बुडतो अशी हाकाटी बाळाजी पंत नातुने सरकारात केली होती. कंपनी सरकारने गुप्त आयोग नेमून चौकशी करून राजा दोषी असल्याचा अहवाल दिला. प्रतापसिंह महाराजांनी १८३८ मध्ये आपली बाजू मांडण्यास सय्यद मीर अफजल अली या वकिलास पाठवले,१८३९ मध्ये राजे शिर्के, चिटकोजी सुर्वे, भगवंतराव चिटणीस ही मंडळी पण लंडनला गेली, कागद पुराव्यानिशी इंग्रजीत त्यांनी आपली बाजू कंपनी सरकारपुढे मांडली, पण काही उपयोग झाला नाही. ५ सप्टेंबर १८३९ ला छत्रपत प्रतापसिंह महाराजांना कंपनी सरकारने पदच्युत केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४