२४ सप्टेंबर १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६५६
स्वराज्यात सुपे हा परगणा होता. हा शहाजीराजांच्या जहागिरीतच होता मात्र तो त्यांनी त्यांचे शालक (पत्नी तुकाबाईंचे सख्खे बंधू) संभाजी मोहिते यांच्या ताब्यात दिला होता. मोहिते तिथे गढीत रहात होते. या मोहित्यांची एक मुलगी अण्णुबाई हिचे लग्न व्यंकोजीराजांशी तर, मोहिते घराण्यातीलच (बहुधा संभाजी मोहित्यांचीच मुलगी) सोयराबाई यांचे लग्न शिवाजीराजांशी झाले होते. त्यामुळे मोहित्यांचे भोसले घराण्याशी मोठे नातेसंबंध होते.
मात्र हे मोहितेमामा कारभार योग्य पद्धतीने करत नव्हते. लाच घेणे, दुसर्याचे वतन हिसकावून घेणे वगैरै प्रकार ते करत होते. शहाजीराजे व शिवााजीराजांनाही ते जुमानत नव्हते. एकदा शिवाजीराजांनी पत्र पाठवून त्यांना आज्ञा केली की, 'पागा  घेऊन पुणे मुक्कामी येणे!' मात्र मोहित्यांनी या पत्राचे उत्तर पाठवले नाही उलट, पत्र घेऊन आलेल्या जासूदाला उर्मटपणे म्हणाले, 'शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत... काही आपले पायाकडे पाहून करावे!'
संभाजी मोहिते काही केल्या जुमानत नाहीत हे शिवाजीराजांना समजले. स्वराज्यात असा जुलमी, भ्रष्टाचारी वतनदार असणे योग्य नव्हते. भले तो नातेवाईक का असेना. शिवाय परचक्र आले असता असे वतनदार फितुर होण्याची शक्यता असते. म्हणून मग शिवाजीराजांनी सुप्यावर हल्ला केला व तिथली मोहित्यांची गढी ताब्यात घेतली. तिथे फारसे सैन्य नसल्याने प्रतिकार झालाच नाही. गढीत महाराजांना द्रव्य, कापडचोपड, वस्तू व पागेतील ३०० घोडे हस्तगत झाले. मोहितेमामांना कैद करून महाराजांनी कर्नाटकात शहाजीराजांकडे पाठवले. तिथीने तो दिवस होता शके १५७८, अश्विन वद्य १, म्हणजेच बुधवार दि. २४ सप्टेंबर १६५६.
महाराजांनी सुप्याचा ताबा स्वराज्यातील दुसर्‍या लोकांकडे दिला व संभाजी मोहित्यांनी ज्यांच्यावर अन्याय केला होता त्यांच्यासाठी चारच दिवसांनी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी गोतसभा भरवून त्यांना योग्य तो न्याय दिला.
अर्थात असे असले तरी मोहित्यांचे संबंध पुढेही भोसल्यांशी कायम राहिले. एवढेच काय तर त्या घराण्यातील हंबीरराव मोहिते हे पुढे स्वराज्याचे सेनापती होते. स्वराज्याच्या कामात शिवाजीराजे नातीगोती न पाहता कारवाई करत असत, न्याय देत असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे सुपे प्रकरण.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६७१
छत्रपती शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर
१६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६७४
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६७९
मिन्चीनच्या पत्राला २४ सप्टेंबर रोजी उत्तर आले व मुंबईकरांनी कळवले की दौलतखानाच्या अधिपत्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मोठे आरमार खांदेरीच्या रोखाने येत असल्याची खबर हेरांकरवी मिळाली आहे तरी तूर्त सार्जंट फुलरच्या नेतृत्वाखाली आम्ही १ मचवा व सुमार १५ सैनिक पाठवत आहोत त्यांना गस्तीचा ताबा देवून आपण त्वरीत डागडुजी व नौकांच्या देखभाली करिता परत यावे. फुलर सोबत मुंबईहून जखमींना घेवून गेलेले शिबाडही परत आले होते. सार्जंट फुलरच्या ताब्यात गस्त देवून मिन्चीन मुंबईला परतला. मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६९०
छत्रपती संभाजीराजे हे ११ मार्च १६८९ रोजी गेले.
मराठा रीयासतीवर शोककळा पसरली. काही काळ मराठ्यांचा निर्घृण पाडावच झाला. मराठ्यांचे अनेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकारजमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजाना देशमुख, देशकुलकर्णी, मोकदम व इतरांची वतने परत करावी लागली. अशा वेळी आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र "छत्रपती राजाराम महाराज" यांनी स्वराज्याची सुत्रे हातात घेऊन खंबीरपणे लढा दिला. स्वराज्य सावरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती आणि ते सर्व शक्य झाले ते वीर मराठा सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारख्या महापराक्रमी मावळ्यांच्या योगदानामुळे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १६९०
नागोजी मानेचा पिता रतनोजी माने हा पराक्रमी व राजकारणी होता. हा १६८५ ला मोगलांस मिळाला. औरंगजेबने त्यास म्हसवड परगण्यात १३ लक्ष ५० हजार दामांची जहागीर दिली. तसेच त्यास म्हसवडची ठाणेदारीही दिली होती.  इ.स. १६९० च्या सुरवातीस हणमंतराव निंबाळकर, सटवोजी निंबाळकर व इतर काही सरदार मोगलांकडून पारखे होऊन महाराष्ट्र राज्यात चाकरीस आले. २४ सप्टेंबर १६९० रोजी कसबा नांदगज, परगणे कडेकळीत हा मराठ्यांनी लुटला व एक लक्ष रुपयांची लूट घेतली. इ. स. १६९१ च्या एप्रिलमध्ये झुल्फिकारखानाच्या सैन्यांत दुष्काळ पडला. मराठ्यांनी मोगलांची रसद तोडली. भीम सक्सेना म्हणतो, “झुल्फिकारखानाबरोबर असलेले अनेक दख्खनी मनसबदार त्याला सोडून छत्रपती राजाराम महाराजांना  मिळाले.”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १७०९
"छत्रपती शाहू महाराज मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडले, त्यांनी मराठे सरदारास आज्ञा केली, बादशाहने सरदेशमुखी वतन आम्हास बहाल केले आहे, तुम्ही उत्तर प्रांतातून त्याचा वसूल आणा, चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही "खजिने लुटून" भरपाई करून घ्या." हे आदेश मोगलांनी नोंदविलेले आहेत व ते उत्तरेशी संबंधित आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १८४४
१८४४ चा गडकरी उठाव - इंग्रज फौजांचा सामानगडावर हल्ला
उठावाची पहीली ठिणगी ही जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकर्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकर्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली. दारूगोळा जमा केला. व ते प्रतिकाराचे तयारीत होते.
यावेळ पोलिटिकल एजंट रीव्हीज् याने गडकरी लोकांस शरण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यास गडकर्यांनी दाद दिली नाही. उलट बोलणी करणेस पाठवलेल्या लोकांस गडावर डांबून ठेवले. ही योजना फसलेमुळे रीव्हजने गडकरी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला व जे गडकरी शरण येतील त्यांना अभय मिळेल आणि त्यांचे तक्रारींचा विचार केला जाईल असे सांगूनही पाहीले. परतुं या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही. 
यानंतर मात्र रीव्हजकडे गडावर हल्ला करणेशिवाय पर्याय उरला नाही. यासाठी रीव्हजने १९ सप्टेंबर १८४४ रोजी मद्रास कडील फौजेतील १२०० सैनिकांची तुकडी गडावर पाठविली. त्यांचेजवळ ४ तोफा व दारूगोळा होता.  सामनगड आकाराने जरी लहान किल्ला असला तरी तटबंदीनेयुक्त बळकट होता. त्यामुळे गड सहजासहजी हाती पडणे शक्य नव्हते. गडावर देखील लढण्याची तयारी होती. त्यांचेजवळ ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदुकबारदार आणि इतर २०० सैनिक होते.
इंग्रजी फौजेने २४ सप्टेंबर १८४४ रोजी गडावर हल्ला केला. हा हल्ला परतून लावण्यात आला. त्यामुळे इंग्रजी फौजेने गडास वेढा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १८६१
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म
या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ सप्टेंबर १८७३
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४