शिंदे घराण्याचा इतिहास

शिंदे घराणे 

 


शिंदे घराण्याचा इतिहास
श्रीरामवरदायिनी ही शिंदे घराण्याची कुलस्वामिनी आहे. इ.स. १५१०/१२ चे दरम्यान ज्यावेळी रामाजीराव रविराव शिंदे हे कोकण प्रांती बहामनीकडुन स्वारीवर आले त्यावेळी एका साधुपुरषाने त्यांस श्रीरामवरदायिनीची मूर्ती आपले झोळीतून काढून दिली व हीला तुझी ‘कुलस्वामिनी’ मान, ही तुला स्वारीत यश देईल असे सांगितले त्याप्रमाणे ते वागले व श्रीनेही त्यांस यश दिले.
अंजनवेल दाभोळ तर्फे चिपळूण देहायतिवरे बांदरी दसपटी कुडाळ तथा दादर गावी वैतरणेच्या तिरी श्रीरामवरदायिनी मंदिराचा जीर्णोध्दार (इ.स. १८५०) दसपटी शिंदे मोकाशी व कदम मोकाशी यांनी कुलदैवताची रुपी घडवून प्राण प्रतिष्ठा केली आहे. पूर्वकाळापासून न्यायनिवाडे झाले आहेत. मजरे दादर हे श्रीचे करिता इनाम मोकासा इ.स. १५२०/२२ चे दरम्यान दसपटीकर यांस दिले असून त्यानंतर शिवछत्रपती, संभाजीराजे, महाराणा ताराबाई, शाहू छत्रपती यांनी श्रींच्या सनदा रुजू करुन दिल्या आहेत. श्रीचे मंदीरासमोर झोलाई, मानाई, त्रिंबकी अशी तीन देवस्थाने आहेत.
शिंदे घराण्याचे ऐतिहासिक अस्तित्व
महाराष्ट्रात इ.स.पूर्वी ६०० च्या सुमारास आर्यांनी वस्ती केली. याच काळातील हरी वंशात नाशिक, कोल्हापूर आणि वनवाशी ही तीन राज्ये यदूच्या नाग स्त्रियांपासून झालेल्या पुत्रांनी स्थापिली असे वर्णन आहे. मराठे क्षत्रिय महाराष्ट्रात प्रथम आले ते चंद्रवंशी यादव होते, हे नागकन्यकांपासून उत्पन्न झालेले असले तरी मनुस्मृती पूर्व कालातील पितृसावण्र्याच्या नियमानुसार क्षत्रीय वंशाचेच होते. तात्पर्य, महाराष्ट्रात प्रथम वसाहत करणारे भोज, राष्ट्रकुट यादव हे क्षत्रियच होत. शिंदे घराणे सूर्यवंशी शेष शाखेतील होते. इ.स.११०० पूर्वी ब्राम्हण व क्षत्रिय अशी एकच जात होती. राजतरंगिणी इ.स.११५० मध्ये लिहिली गेली. तीमध्ये ९६ कुळांचे यादीत अनेक रजपूत कुळे आहेत. परंतु अनेक कुळे नागवंशियांची आहेत. उत्तरेकडील रजपूत व महाराष्ट्रातील मराठे यांच्या परस्पर विवाह होत. कारण ते दोघेही आर्यच होते. शिंदे घराण्याचे गुर गौत्र कौडण्य. विदर्भात कौंडिण्यपूर नामक शहर आहे. तेथे कौण्डण्यऋषी वास करीत असत.
नागवंशात मुख्य कुळ शिंद्याचे, बंदानिचे चाळुक्यांचे वेळेस ते सेंद्रक म्हणून प्रसिध्द होते, दुसरा पुलकेसीचा मामा सेनानंदराज यांचा सातव्या शतकातला शिलालेख प्रसिध्द आहे. उत्तर चाळुक्यांचे वेळेस शिंदे हे दोन-तीन राजकुलांत प्रसिध्द होते. राजधानी भोगावती हल्लीचे सिंध-हैद्राबादमध्ये सिंधु तीरावर होती. शिंदे प्रथम कर्नाटकात राज्य करीत होते. दुर्गशक्ती व इतर राजे लक्ष्मेश्वर देवळांतील शिलालेखात सांगितलेले सेंद्रक आणि नंतरचे शिंदे हे एकच कुळ होय. शिंदे कुळ चालुक्यांचे बरोबरीचे होते. त्याचेशी त्यांचा निकटवर्ती संबध झालेला आहे. कर्नाटकाचे शिंदे व कराडचे शिंदे अशा दोन शाखांचे शिलालेख उपलब्ध आहेत. शिंध्यांचा संबंध प्रारंभापासून कदंब कुळाशी झालेला आहे. कदंबांनी आपली नामोत्पत्ती एका कदंबाच्या झाडामुळे पहिल्या वंशधरापासून मानली. पहिले वंशधर शिंदे यांचे लग्न कदंब राजघराण्याशी झाल्याचे वर्णन आहे. (एपी. इंडि. ३सदर) शिंध्यांच्या मुद्रेत नागाबरोबर सूर्य दाखविला जातो तेव्हा ते मुळचे सुर्यवंशीय क्षत्रीय असावेत असे अनुमान निघतो. शिंद्यांच्या देवकांत समुद्रवेल आहे, त्यावरुन सिंधमधून समुद्रमार्गे ते कोंकणात आले असावेत. सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वशृत असे मध्यभारत कालीन घराणे आहे. ते मुळच सिंध पंजाब प्रांताचे राजे होते. पुढे तापीच्या दक्षिणतिरी खानदेशी वसाहती केल्या. सेंद्रक घराण्यातील भिल्लशक्ती व जयशक्ती यांचे पूर्वकालीन ताम्रपट आजतागायत त्यांच्या स्मृती करीत आहेत. शिंध्यांच्या कुळस्वामी कोल्हापूरजवळ ज्योतिबा वाडी येथे असून रत्नागिरीस देऊळ आहे. त्याची प्रत्येक चैत्र्यात जत्रा भरते. सेंद्रक घराण्यात दसपटीचे शिंदे, कुडाळकर शिंदे, तोरगळकर शिंदे, वेसरीकर शिंदे, घेडवाडकर शिंदे, कान्होर खंडकर शिंदे ही घराणी उदयास आली. कर्नाटकांत सेंद्रक घराण्याचे कुळस्वामी साळुबाई सोमय्या म्हणजे शिव पार्वती भवानी, केदार महालक्ष्मी अशी घराण्याचे कुलदैवत असल्याने इ.स.१७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी मुळ देवळाच्या ठिकाणी नवे देऊळ बांधले असा आहे शिंदे घराण्याचा थोडक्यात इतिहास.
दसपटी शिंदे वंशजाचे वाटप
रामाजीराव शिंदे रविराव यांसी प्रथम पत्नी पासून सोमाजीराव (पेंढांबे) उपरान्त जहाले आणि सिधोजीराव द्वितीया पत्नी पासून जहाले. सोमाजीरावांची आई कांदाटकर चंद्रराव मोरे कन्या होती आणि तिसरे रघुनाथराव यांची आई गिरवीकर पाटील कन्या होती. वडीलकीचे वडीली कामकार्जे मुख्य पेढांब्याकडे होत आली. ते प्रमाणे नांदणूक वशंपरंपरेने होत गेली. मूळगांवकरांचे विद्येमाने बहुत काळ चालत आले.
सोमाजीराव यांस कांदाटकर मोरे कन्ये पोटी बाळाजीराव झाले व दुसरी स्त्री गुणयजी आवा होती (आवा-बाई हे सन्मान दर्शक चिन्ह नांवापुढे लावण्याची कर्नाटकी पध्दत विजापूर अमदानीतील आहे.) तिचे पोटी पुत्र सरजोजीराव जहाले. त्यांस दोन गांवे दिली, दळवटणे व मोरवणें, सोमाजीरावानी आपला देह मोरवणी ठेवीला, (देव रहाटीत समाधी आहे) बाळाजीराव यांची थोरली स्त्री चंदरराव मोरे कन्या व धाकटी देउडकर सावंत यांची होती. धाकटे स्त्रीस पुत्र दोघे अगोदर झाले, त्यांची नावे थोरला तानाजीराव व धाकटा सिधोजीराव (त्याने सुखाईचे देवरहाटी मुहगांवी चिरेंबदी घरवंद बांधिला) उपरांत थोरली स्त्री प्रसूत जहाली, तो पुत्र जहाला त्याचे नांव सोमाजीराव जहाले, उपरांत बाळाजीराव यांस देव आज्ञा होवून मृत्यु पावले. त्यांची थोरली स्त्री अगोदरच मृत्यू पावली होती. तानाजीराव यांस स्त्री देवूडकर सावंत यांची होती. पुढे काही एक दिवसी तानाजीराव व सिधोजीराव यांस बुध्दी खोटी आठवली. की सोमाजीस मारुन टाकावें, हे वर्तमान सोमाजीस श्रुत जहाले, तेव्हां ते निघून मौजे नांदिवसे येथे जावून श्रीमहादेव शंभूस्थान तेथें जाऊन राहिले. पेढांब्यास येईना, तेव्हा मातोश्री निघून तेथे श्रीमहादेवास सावत्र मुलाजवळ गेली व ती पण तिकडेच राहिली तेव्हा तानाजीराव व सिधोजीराव यांस कठीण पडलें की, मातोश्री आपली, तिकडे सावत्र भावाकडेच राहिली (आणि आम्ही बुध्दी केली ती तिला समजली.) हे ठीक झाले नाही, आतां काय करावें. तेंव्हा दोघे निघून नांदिवशास गेले आणि आईच्या चरणावर मस्तक ठेवून समजविते झाले की, आम्ही पुढे चुकणार नाही. तेव्हा मातोश्रीने सांगितले की, तुम्ही वेगळे होऊन रहावे, म्हणून मातोश्री आईने वाटप करुन दिले.
तेव्हा सोमाजीराव कायमचाच नांदिवशास राहिला व तानाजीराव व सिधोजीराव पेढांब्यास आले. तानाजीरावास बाजीराव व सिधोजीरावांस यशवंतराव असे दोन पुत्र जहाले. ते मोठे पराक्रमी बलवान निपजले. त्यांनी वतन संपादून हक्क हक्कवारी कानुकवाईत मुळगांवकरी संभाळीते झाले, सोनाजीराव शिरगांवचे वस्तीत गेले व सरजीराव यांस मोरवणे गांवी वतन करुन दिले. तो पावेतो सर्व समाइक चालंले पुढे सर्वजण जिवेभावे नांदु लागले.
पेढांबकर तानाजीराव बीन हिरोजीराव यांस कांदोसकर श्री सयाजी त्यांस पुत्र शिवाजीराव व शंकरराव व दुसरीस सुभानराव, शिवाजीराव यांस स्त्री म्हालूंगकर मोरे कन्या गंगयजी शंकरराव यांस स्त्री दळवी यांची, त्यांस पुत्र बाजी व गुणाजी आणि शिवाजी वडील बंधू. शिवाजीचे पोटी तानाजीराव जहाले तानाजीरावांस स्त्री मालगुंडकर साळवी यांची वेगळी होती. तिचे नांव सावित्री त्यांस पुत्र शिवाजी त्यांस स्त्रीया दोघी. पहिली पालशेतक विचारे यांची व दुसरी अडरेकर कदम यांची, आतां शंकरराव यांसी पुत्र तीन बाळाजीराव यांस स्त्री कुभळेकर दळवी यांची, दुसरी कलबुसकर चव्हाणांची तिचे पोटी पुत्र तीन १ भगवंतराव २ लक्ष्मणराव ३ खंडेराव जहाले.
रामाजीरावांनी खासा स्वारीत मोरवणे भिंताड मुक्कामी संगमावरी वाडा बांधिला आणि पाया बांधून तोफा डागिल्या तेथेंच रामाजीराव राहिले आणि सिधोजीराव मुळगांव वाडीस गांवठणी गेले त्यांस गांव वाटणाी व मजरे दोन त्यांस पुत्र सागोजीराव, नागजीरावांस पुत्र तीन, पहिल्या पत्नी पासून तानाजीराव व दशरथराव आणि दुसऱ्या स्त्री पासून अचलोजीराव
१. तानाजीराव २. दशरथराव ३. अचलोजीराव
१. कोळकेवाडी १. ओवळी २. कादवड
२. कान्हे २. पिंपळीखुर्द २. आकले
३. अलोरे ३. शिकीवली ३. जुनावेर्ड
४ नागावें देवीगांव श्री सुखाईस इनामत करुन श्री पूजा अर्चा चालविली येणे प्रमाणे वाटप होवून जे ते आपापले वतनावारी वस्ती करुन नांदू लागले.
दसपटीच्या मोकास इनाम सनदेतील आदिकारक्षेत्र
दसपटील : दस, पट्टी उकर, वसुली हक्काची बाब, म्हणजे दहा टक्क्यांची बाब किंवा दहा टक्क्यांची वसुली असा अर्थबोध होतो. यावरुन शिंदेराव व कदमराव यांस मिळालेल्या २८ गावांचे इनाम सनदेतील दहा टक्क्यांचा कर असे मानले जाते.
जे काळी २८ गांव इनाम मोकास मिळाला ते काली शिंदेराव (रामाजीराव) यांचे सोईरे कदमराव जीवाचे सरदार होते. त्यानीही मोठी कामकाजे केली व नावलौकिक संपदीता. ते थोर सरदार होते. कष्ट, मेहनत बहूत केली. आपले जीवाची आशा पादशाही चाकरीत धरली नाही. एखत्यारीचे जाणून शिंदेराव मोकाशी यांनी आपले इनाम, मोकासा, खोती देहाय तिवरे बांदर पैकी सातगाव मोकासा खोती आपले चालणुकी प्रमाणे करुन हे वडील वतनपत्रे करुन देवविलि. त्याप्रमाणे सरदार कदमराव मोकाशी खोत देहाय तिवरे बांदर गांवात आपले वंश्परंपरेने अनुभवित झाले. येणे प्रमाणे शिंदेराव व कदमराव एकविचारे देहाय दरोबस्त तिवरे बांदरमध्ये नांदत आले.
अव्वल रामाजीराव शिंदे रजपूत व दुर्गोजीराव कदम सरदार उपराव हुजूर पादशहा, तक्त विजापूर, इदलशाही (आदिलशाहीन्याही बादशाही) अक्षय देवे इनाम, मोकासा देहाय तिवरे बांदर देह अठ्ठावीस शिंदेराऊ मोकाशी व कदमराऊ मोकासी यांसी पादशहा अदीलशहाने इनाम मोकासा करुन दिले. पैकी मौजे सात व मजरा एक, कदमराऊ यांसी दिले. शिंदेराऊ मोकाशी खोत निसबत कदमराऊ मोकासी खोत देहाय तिवरे बांदरी गाव रयतवारीने मालकी हक्क हक्कहारी उपभोगणे विषयी शिक्का मोर्तब निशी पादशहा मेहरनिसी करुन दिले ते येणे प्रमाणे.
खुद्द रामाजीराव शिंदे रजपूत मोकासी खोत देहाय निसबत दुर्गोजीराव कदम मोकाशी, खोत इनामदार यांस :-
शिंदेराव खोत मोकाशी निसबत कदमराव खोत मोकाशी
१. मौजे पेंढाबे २. मौजे खडपोली
३. मौजे कळकवणे ४. मौजे कोळकवाडी
५.मौजे शिरगांव ६. मौजे नांदिवसे
७. मौजे कादवड ८. मौजे मोरवणे
९. मौजे खेर्डी १०. मौजे दळवटणे
११. मौजे पिपळी बु.।। १२. मौजे ओवळी
१३. मौजे तिवरे १४. मौजे रिकटोळी
१५. मौजे पिंपळी खुर्द १६. मौजे वालोटी
१७. मौजे कुंभार्ली १८. मौजे मजरे दादर
१९. मौजे स्वयंदेव (तक्त श्रींचे साठी) २०. मौजे नागावे
२१. मौजे दिवानवाडी १. मौजे टेरव
२. मौजे अडरे ३. मौजे अनारी
४. मौजे कापसाळ ५. मौजे धामणवणे
६. मौजे बेहळे (भेले) ७. मौजे मुंढे
बारराव मारिल्यावर मुलखांत आपआपला अंमल बसविला. मग पादशाहीवतन सोमाजीराव व सिधोजीराव आणि बंधू रघूनाथराव व दुर्गोजीराव कदम वगैरे सरदार मंडळी यांसी उस्तवारीने करुन दिले. कसबे कुंभार्ली मुक्कामी २८ गांवचे २८ शिलालेख करुनी मंडळाचे देवळी बैसविले आणि सोनपात्री कुंभार्ली घाटी व तिवरे घाटी ध्वज लावोनी चौकी बैसविली आणि राबतली ठाणी ठेवोनी दरोबस्त अंमल बैसविली. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...