रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी.

 रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी... या भूमीतच दक्ष राजाची कन्या सतीने भगवान शिवशंकरास वर म्हणुन प्राप्त केले. दक्ष राजाने आयोजित केलेल्या विश्वशांती यज्ञास उपस्थित राहण्यासाठी आलेले ब्रम्हदेव व सकल देव गण याच भुमीतील तीर्थक्षेत्र ब्रम्हपुरी येथे मुक्कामास होते. येथेच भगवान शिवशंकर कुंभेश्वराच्या रूपाने प्रकट झाले होते. म्हणुनच अदिलशाहीपुर्वी या नगरीस “कुमठे कुंभेश्वराचे” या नावाने ओळखले जात होते. या कुंभेश्वराचे व त्याच्या रक्षणासाठी उभ्या असणार्‍या भैरोबाचे मंदीर आजही जागृत देवस्थाने म्हणुन प्रसिध्द आहेत.
 अशाप्रकारे अनादिकालापासून देवादिकांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या या भुमीत शिवछत्रपतींच्या आदर्शांपासून दूर जाणार्‍या पेशव्यांनाही अनेकवेळा हरवणार्‍या शौर्यधुरंधर, रणमर्द, श्रीमंत सरदार फत्तेसिंह माने यांनी आदिमाया महिषासुरमर्दिनीचे व मान्यांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीचे रूप असलेल्या, दक्षिण भारतात मुळ ठाण असणार्‍या श्री. चौंडेश्वरी देवीची मुर्ती घोडयावरून ‘भाळवणी’ येथून आणुन या नगरीत स्थापन केली ते आर्इ जगदंबेचा अंश असलेले श्री चौंडेश्वरीचे जागृत मंदीर आजही या नगरीच्या ऎतिहासीक वारसाची साक्ष देत आहेत. 
 असा प्राचीन गौरवशाली इतिहास लाभलेल्या या नगरीत वास करणार्‍या ब्रम्हवृंद, साधुसंत व नगरवासीयांचे (शास्त्रानुसार अशुभ समजल्या जाणार्‍या दक्षिण दिशेकडुन येणार्‍या)  संकटांपासुन रक्षण व्हावे या भावनेतून दक्षिणाभिमुखी संकटमोचन हनुमान मंदिराची स्थापना केल्याचे आढळून येते. हे देवस्थान जागृत व रोकडा रोकडी नवसाला पावणारे असल्यानेही त्यास “रोकडेश्वर” म्हणुन ओळखले जाते अशी वंदता आहे.
 रहिमतपूर नगरी ही पुर्वीचे कुमठेकुंभेश्वर व त्याच्या अठरा कोसातील पंधरा वाडयांनी एकत्रीत बांधलेली देवभुमी; येथे असंख्य साधुसंत साधनेस व वास्तव्यास होते. अशाच आदिलशाहीतील पराक्रमी सरदार रणदुल्लाखानास येथील मीरा सय्यद उर्फ बाबा प्यारे निरंजन यांच्या पवित्र दर्शनाने ईश्वरी कृपा (रेहमत) प्राप्त झाली, ईश्वरी कृपेची अनुभूती झालेल्या रणदुल्लाखानाने हिंसेचा मार्ग सोडून सरदार म्हणुन असलेली त्याची जबाबदारी बादशहाच्या परवानगीने व पुढील कालावधीत निरंजन बाबांचे शिष्य म्हणुन मौजे कुमठे येथे वास्तव्य करून राहीला. अशा प्रकारे रणदुल्लाखानावर परमेश्वराची कृपा (रेहमत) झाली म्हणुन रणदुल्लाखानाने संत निरंजन बाबा उर्फ मीरा हुसैनी सययद यांच्या शिष्याकडुन संपुर्ण नगरीचा आराखडा तयार करून घेतला व रहिमतपूर या नावाने “परमेश्वरी कृपा असणारे” नगर या अर्थाने नगर वसवले. या नगरीचा आराखडा सारीपाटाच्या रचनेसारखा आहे. या आराखडयातील नगरीचा रक्षणकर्ता म्हणुन रोकडेश्वरास असलेले मानाचे स्थान पाहिल्यास रोकडेश्वराचे महात्म्य व त्याच्या ईश्वरी शक्तीची प्रचिती येते. नगराच्या उत्तर बाजुने दक्षिण दिशेकडे दृष्टी असलेल्या या संकटमोचन रोकडेश्वर मंदीराची रचना अप्रतिम आहे; मंदीरासमोरच प्रशस्त प्रांगण, प्रांगणाच्या दक्षिणेस मधोमध पवित्र मानला जाणारा पिंपळ वृक्ष, त्यास दगडी पार (बैठक) व तेथुन अगदी सरळ रेषेत दक्षिणेकडे दूरपर्यंत नगराची हद्द संपे पर्यंत प्रशस्त प्रमुख मार्ग. या मार्गाच्या दोन्ही बाजुस जो दगडी जोत्यावरील घरे व घरासमोर ऐटबाज प्रशस्त अंगण अशी रचना, हा नगरातील मुख्य बाजारपेठ मार्ग आजही शहराचा मुख्य मार्ग म्हणुनच ओळखला जातो या मुख्य मार्गाच्या पुर्व व पश्चिम दिशेस आतील भागातील वसाहतीतुन निघणारे मार्ग उत्तरेकडे येवुन श्री रोकडेश्वर मंदीराच्या प्रागंणात श्री रोकडेश्वर चरणी नतमस्तक होवुन विलीन होतात. यावरून त्या काळातील प्रगत नगरआराखडयांची व त्यामध्ये श्री रोकडेश्वर मंदीरास असणार्‍या मानाच्या स्थानाची कल्पना येते या सोबतच नगरातील सर्व विभागातुन येणारे मार्ग उत्तरेकडे येवुन श्री रोकडेश्वर मंदीरापाशी येतात याचाच अर्थ श्रीमंत रोकडेश्वर दर्शन सर्व नगरवासीयांना सुलभपणे व्हावे हा दृष्टीकोन समोर ठेवुनच नगराचा आराखडा केला असल्याचे प्रकर्शाने जाणवते.
 यासोबतच रोकडेश्वराच्या पायर्‍या पासुन सुरू होणारा नगराचा मुख्य मार्ग नगराच्या दक्षिण हददीपर्यंत अगदी सरळ आहे. आजही स्वच्छ वातावरण असताना रोकडेश्वर मंदीरा समोरून दक्षिणेकडे पाहील्यास कमंडलु नदीच्या दक्षिणेपर्यंतचा मार्ग व परिसर स्पष्ट दिसतो. म्हणजेच श्रीमंत रोकडेश्वर दक्षिणेकडुन येणार्‍या संकटावर लक्ष ठेवुन त्यापासुन नगरवासीयांचे रक्षणास व कल्याणास सज्ज असल्याचे दिसते.
 आदिलशाहीच्या काळात रहिमतपूर हे महत्वाची प्रसिध्द व गजबजलेली व्यापारी बाजारपेठ होती, त्यामुळे या नगराकडे अमाप श्रीमंती व वैभव प्राप्त होते या जागृत हनुमान मंदीरामुळेच येथील वैभव व रोकड टिकुन असल्याच्या धारणेनेच  हा दक्षिणमुखी हनुमान श्रीमंत रोकडेश्वर म्हणुन ओळखले जातो. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...