१३ सप्टेंबर १६६२छत्रपती शिवरायांनी निळोपंतांची मुजुमदार म्हणुन नेमणुक केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १५९४
सागराच्या कुशीतला कोरलाई
सन १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. १३ सप्टेंबर १५९४ च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ ऑगस्ट १६३८
दुर्गादास राठोडचा जन्म
(मृत्यू २२ नोव्हेंबर १७१८)
औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली.
जसवंतसिंगाच्या मृत्यूनंतर (१६७८) जन्मलेला त्याचा मुलगा अजितसिंग याला गादी मिळू नये व जोधपूरचे राज्य खालसा करावे, म्हणून औरंगजेबाने नाना तऱ्हेची कुटिल कारस्थाने रचली परंतु दुर्गादासाने मोठ्या चातुर्याने व धैर्यान अजितसिंगाला औरंगजेबाच्या तावडीतून वाचविले व वाढविले. १६८१ मध्ये राजपूतांच्या सहकार्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाविरुद्ध बंड केले, तेव्हा मोगलांच्या पाठलागातून अकबराला वाचविण्यासाठी दुर्गादास त्याला दक्षिणेत संभाजीच्या आश्रयास घेऊन गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १६६२
छत्रपती शिवरायांनी निळोपंतांची मुजुमदार म्हणुन नेमणुक केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १६७५
खामगावकर भोसल्यांच्या घराण्याची काही कागदपत्रे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शिवचरित्र साहित्यखंड -२ मध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यात बकाजी फर्जंद यास खामगावची  पाटीलकी दिल्याचा उल्लेख दि. १३ सप्टेंबर १६७५, १८ सप्टेंबर १६७५ या तारखांच्या पत्रांमध्ये आढळतो. 'बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतबारी फर्जंद याच्या पिताने साहेबाचेये कस्तमशागत केली आहे. व बकाजीही साहेबकामावरील कस्तमशागत बहुत करीतो याकरिता साहेब यावरील मेहेरबान आहेती. मेहेरबानीने बकसीसही पावतो. याउपरी बहुतच मेहेरबानीने साहेबाच्या मनी जाले की यास यक काम करुन द्यावे म्हणून त्यावरुन मौजे खामगाव बु|| ता|| का|| मावळ येथील पाटीलकी.... बकाजी फर्जंद यास वतन महरमत केले असे. पाटीलकीचे काम घेत जाणे. पाटीलकीचा मजहर बकाजीस करुन देणे.'

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १७७७
छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई यांचा नातू व दुसरे शिवाजीराजे यांचे पुत्र रामराजे दुसरे हे सातारा गादीचे वारस म्हणून आले. त्यांस मूलबाळ नव्हते. छत्रपतीची गादी त्यामागून नागपूरकर भोसले घराण्याकडे जावी
म्हणून हेस्टिंग्ज मुधोजी भोसल्यास फितवीत होता. बापू, नानांना जेव्हा हा हेस्टिंग्जचा डाव समजला तेव्हा त्यांनी मुधोजीबाबांचे चिरंजीव व भोसले गादीचे वारस रघोजी यास पुण्यास आणून त्यांची मदत ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरिता मिळविली. वास्तविक नागपूरकर भोसले यांना मराठी संघराज्यातून फोडण्याचे काम इंग्रज लोक लॉर्ड क्लाईव्ह पासून १७६६ पर्यंत करीत होते. ह्याच वेळी वाईकर भोसल्यांचा मुलगा विठोजी भोसले यास रामराजांच्या मांडीवर दिनांक १३ सप्टेंबर १७७७ रोजी दत्तक देऊन त्याचे नाव दुसरे शाहू असे ठेविले. छत्रपती रामराजा ९ डिसेंबर १७७७ रोजी कालवश झाले. त्या अगोदर दत्तक विधी झालेला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १६७९
मराठ्यांना आव्हान देण्यासाठी इंग्रजांच्या सैन्याची आणखी एक तुकडी खांदेरीत दाखल झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १६८०
१३ सप्टेंबर इ. स. १६८०, रोजीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या एका पत्रात त्या प्रांतातील कुडाळचा देशाधिकारी गनोराम यांना व पाटगावचे मौनी बाबा गोसावी हे ईश्वर पुरूष असून त्यांचे शिष्य तुरूतगिरी यांना पालखीचा मान पूर्वीपासून होता. भोई, वाजंत्री यांच्या तजविजेसाठी सालाना २५, पंचवीस होन वाजंत्रीसाठी, व भोईस १००, शंभर होन देण्याचा छत्रपती संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी आदेश दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १७२०
१३ सप्टेंबर १७२० मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्याखाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज हि लढाऊ जहाजे घेरीयाच्या (विजयदुर्ग) स्वारीवर निघाली. मिस्त वॉल्टर ब्राऊनला सर्व फौजांच्या कमांडर-इन-चीफची पदवी देऊन त्याला ‍अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला होता. 
लंडन हे ४० तोफांचे चांडोस हे ४० तोफांचे, व्हिक्टोरिया २६ तोफांचे रिव्हेंज १८ तोफांचे डिफायन्स हे १६ तोफांचे आणि पेल्हाम हे १६ तोफांचे अशी लढाऊ जहाजे आरमारात होती. 
पण एवढी मोहिमेची जय्यत तयारी केली असूनही या काफिल्याने विशे मर्दुमकी गाजविली नाही.
ब्राऊन याने आपले काही सैनिक किल्ल्यावर उतरवले, पुष्कळशी प्राणहानी केली. किल्ल्यावर सतत अग्नीवर्षाव केला. पण किल्ल्यातूनहि तितक्याच जोराचा प्रतिकार झाला कान्होजींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.अन स्वतःला अजिंक्यच राखले. 
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १९२९
भगतसिंग यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या ६३ व्या दिवशी भारतीय क्रांतिकारक जितेंद्र नाथ दास याचा उपासमारीने मृत्यू.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ सप्टेंबर १९४८

हैदराबाद विलीनीकरणासाठी भारतीय सेनेचे ऑपरेशन पोलो-  भारतीय सैन्याची हैदराबादवर चढाई.
निजामाच्या असफिया घराण्याची राजवट १७२४ ते १९४८ पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती.भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते.
हैदराबाद राज्याचे एकूण १६ जिल्हे होते. त्यात आंध्राचे ८, मराठवाड्याचे ५ व कर्नाटकाचे ३ जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैदराबाद संस्थान होते. 

भारतातून ब्रिटिश राज्यकर्ते निघून गेल्यावर इथल्या ज्या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन व्हायला नकार दिला, त्यांत हैदराबादचे निजाम मीर उस्मानअली खान हे अहमहमिकेने होते. पाकिस्तानचे निर्माते बॅ. जीना यांच्या चिथावणीने त्यांनी भारत सरकारला धूप न घालण्याचेच धोरण अवलंबिले होते. याचदरम्यान हैदराबाद संस्थानात कासिम रझवीने इत्तेहाद मुस्लमीन म्हणजेच आजची "एमआयएम" या संघटनेची सूत्रे हाती घेऊन मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवण्याचे आणि त्यांची दहशत निर्माण करून लुटालूट, जाळपोळ आणि खूनबाजीचे सत्र आरंभले. निजामी राजवटीतील हिंदू जनतेवरील रझाकारांचे वाढते अत्याचार फार काळ मुकाटपणे पाहणे भारत सरकारला शक्य नव्हते. भारत सरकारलाही आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल गेली. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणार्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुध्द ऑपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८च्या ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ऑपरेशन पोलोची तयारी सुरु झाली.

हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. या कारवाईचे मुख्य संचालक लेफ्टनंट-जनरल महाराज राजेंद्रसिंहजी हे होते, तर मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट जंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला. १३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई सुरु झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. १४ सप्टेंबरला औरंगाबाद ताब्यात आले व तेथे प्रथमच नभोवाणीवर राष्ट्रगीत म्हटले गेले. त्याचबरोबर दौलताबाद आणि जालनाही मुक्त केले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी सर्वप्रथम जे.एन. चौधरी सैन्यानिशी हैदराबादला पोचले. काळाची पावले ओळखता न आल्याने म्हणा, किंवा ती जाणून घेण्याची इच्छाच नसल्याने म्हणा, निजामाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा हेका कायम ठेवला. तशीच वेळ आली तर ब्रिटिश आणि पाकिस्तान आपल्या  मदतीला धावून येतील अशी आशा त्यांना वाटत होती. पण ती आशा शेवटी फ़ोलच ठरली, कोणीही मदतीला आले नाही. चहुबाजूंनी होणार्‍या प्रखर हल्ल्यामुळे निजाम टिकू शकला नाही. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद संस्थान मुक्त झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४