बारव स्थापत्य

बारव स्थापत्य :- भाग एक

अगदी प्रारंभिक काळात लेण्यांच्या निर्मिती बरोबर "पाणीयपोढी" किंवा "पाणपाठी" म्हणजे पिण्याचे पाणी साठविण्याची टाकी आणि "न्हानकोढी" म्हणजे स्नानासाठी व अन्य उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी विविध आकाराच्या टाक्या खांदण्यात आल्या. किल्ल्याची निर्मिती होत असताना सर्वप्रथम निश्चित जलस्रोताचा शोध घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टाक्या व कूप तयार केल्याचं दिसतात. गोदावरी, कृष्णा, मांजरा, चंद्रभागा अशा नद्यांच्या परिसरात ज्याठिकाणी वसाहती निर्माण झाल्या तेथे प्रामुख्याने घाट बांधण्यात आले. निसर्गत उपलब्ध नदीच्या काठाचा योग्य उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने अशा वैशिष्ट्यपूर्ण घाटांची निर्मिती सातवाहन काळापासून होत असावी, अन्य स्थानांवर नगर वसवताना मात्र भूगर्भातील जलाशयाचा शोध घेऊन विविध प्रकारचे आड, विहिरी, बारव व पोखरणी यांची निर्मिती करण्यात आली. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर सारख्या जंबू द्विपावर जाणीवपूर्वक अनेक तीर्थ व पुष्करणी यांची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये लोणार  येथे उल्कापातातून निर्माण झालेल्या विवराच्या परिसरात अनेक बारवांची निर्मिती करण्यात आली. विविध राजवटीतील प्रमुख स्थाने व तीर्थक्षेत्रे उदा, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ आंढा नागनाथ, माहूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी अनेक कुंड, कल्लाळ यांची निर्मिती झाली. या स्थानावरील जनसमुहाची पाण्याची गरज भागविण्याच्या दृष्टीने अशा वास्तूंची निर्मिती होत असतानाच पुण्यप्राप्तीविषयक संकल्पनाही जनमाणसात रुजविली गेली. 

एका मोठ्या बारवेच्या बांधकामासाठी घ्यावे लागणारे परिश्रम हे एका मंदिर संकुलाची उभारणी करता येईल एवढे असत. बारवेच्या संदर्भामध्ये त्यांचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने अनेक लोककथा रूढ झाल्याचे विविध स्थल महात्म्यातून दिसते व पौराणिक संदर्भही याला पुष्टी देतात. बारव निर्मितीचे तंत्र आणि त्यांचे आकार-प्रकार याविषयी प्राचीन ग्रंथातून उल्लेख आढळतात. 

नगररचनेचा विचार करता बारवेला स्वतंत्र असे स्थान होते. ज्या गावात मध्यभाग सखल व इतर भाग उंच आहे, ज्या गावात मध्यभागी बारव आहे आणि तेथील घरांची रचना वर्तुळाकार आहे अशा वस्तीला 'उत्तन मल्लकाकार' असे संबोधले जाई. बारव निर्मितीची प्रेरणा स्मृतीग्रंथ व पुराणांनी सतत दिली आहे. बारव स्थापत्याच्या विकासाबरोबरच त्यातील देवताविषयक संकल्पनाही स्पष्ट होत गेल्या. कंधार येथील राष्ट्रकूटकालीन विहिरीमध्ये देवता ठेवण्यासाठी रिक्त जाग मुद्दाम ठेवली असली तरी देवकोष्ठ बांधलेले नाही. सप्तमातृका किंवा नागदेवता यांची विहिरीलगत स्थापना करणे येथपासून अष्टदिक्पाल तसेच विष्णूच्या चोवीस रूपांची स्थापना बारवेत करणे यासारख्या बाबींचा विकास झाला. जागजी (जिल्हा उस्मानाबाद), पिंगळी (जिल्हा परभणी) याठिकाणी अशा मूर्तीची स्थापना झाली. ईडोळी (जिल्हा जालना) येथे एकादशरुद्रमूर्तीची स्थापना करण्यात आली, तर लोणार येथील बारवेत आज मूर्ती नसल्या तरी तेथे असलेल्या देवकोष्ठावरून एकूण 31 देवतांची स्थापना झाली असावी असे दिसते.

मध्ययुगीन बारवेंच्या संदर्भामध्ये शेषशाही विष्णूमूर्ती ही प्रमुख देवता असल्याचे स्पष्ट होते. गुजरातमधील अनहिलवाह-पाटण जवळील 'राणीकी बाव' याठिकाणी एकूण सात मजली विहीर साळुंकी वंशाने निर्माण केली, ज्यात 250 पेक्षा अधिक देवतामूर्ती होत्या. एवढी मोठी बारव महाराष्ट्रात आढळत नाही. असे असले तरी सिंदखेडराजा येथील पुतळा बारव ही महाराष्ट्र मधील मोठी आहे. 

बारव निर्मिती जरी अशोकाने सुरू केली असली तरी भारतात मोठया प्रमाणात निर्माण केले ते चालुक्यांनी. त्यानी बारव निर्मितीला एक वेगळे स्थान प्रदान केले. विविध पद्धतीच्या अलंकारिक पध्दतीने बांधलेल्या बारव आजही उपलब्ध आहेत. 

महाराष्ट्रातील बारवांची वर्गवारी अनेकप्रकारे केली जाऊ शकते. उदा. त्यांचे रूढ नाव, त्यांचे विधान, त्यांचा उपयोग, त्यातील देवकूलीकांची संख्या इ. बारवांचे स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य, त्यांचे विधान व प्रवेश (मुख) ह्या अनुसार 

1) कुंड:

कुंड म्हणजे तीर्थस्थानाच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेला मोठ्या आकाराचा हौद यांचा आकार साधारणतः 2 ते 3 मीटर खोल व 10 मीटर चौरस रुंद असा आढळतो. तेर (जिल्हा उस्मानाबाद) येथे राज्य पुरातत्व विभागाने केलेल्या साफसफाईच्या वेळी आढळलेले कुंड हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कुंड असून ते विटानी बांधलेले आहे. 8.30 चौ. मी. आकाराच्या या कुंडाची तळापासून उंची 2.70 मी. आहे व 90 सें. मी. चा एक टप्पा असे तीन टप्पे यात आहेत. इ. स. च्या पहिल्या शतकातील सातवाहन काळातील हे कुंड आहे, तर विदर्भातील मांढळ (जिल्हा नागपूर) येथे चौथ्या शतकातील विटांनी बांधलेले कुंड उपलब्ध झाले आहे. हे वाकाटककालीन असून वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन व दुसरा पृथिवीषेण यांचे ताम्रपट येथे मिळाले आहेत. कुंड या प्रकारात येणाऱ्या वास्तूंची उदाहरणे होइल, मुखेड, माहूर (जिल्हा नांदेड), पाली (जिल्हा बीड), त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) इ. ठिकाणी आहेत. मुद्दाम तयार केलेल्या जलाशयालगतसुध्दा प्रसंगी कुंडांची निर्मिती करण्यात येई.

2) विहीर :- 
एक प्रवेश असलेली वापी म्हणजे विहीर. याला पायविहीर असेही म्हणतात. यामध्ये वर्तुळ, अष्टकोन व चौरस असे आकार आढळतात. 

3) आड:- 
द्वारहीन जलाचा संग्रह म्हणजे कूप. यालाच आड असे म्हणता येईल. ही केवळ मर्यादित उपयोगासाठी बांधलेली वास्तू असून याला प्रवेश मार्ग नसतो. आडाचा आकार साधारणपणे एक मीटरपेक्षा कमी व्यासाचा असतो. यामध्ये प्रामुख्याने चौरस, अष्टकोनी आकार आढळतात. कंधार येथे अष्टकोनी आकारातील आड असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखादी टोपली विणावी त्याप्रमाण दगडी शिळांची रचना असलेला हा आड खालील बाजूस निमुळता होत जातो. मुखेड (जिल्हा नांदेड) येथील चालुक्यकालीन दाशरथेश्वर मंदिराजवळील चौरस आड 90 x 90 सें. मी. चा आहे. 

4) कल्लोळ :- 
कुंड या वास्तू प्रकारचे थोडं विकसित स्वरूप म्हणजे कल्लोळ प्रामुख्याने मंदिराच्या समोर किंवा प्राकारात बांधलेले असतात. याला बारवंसारखे प्रवेशमार्ग व टप्पे असतात, पण बारवेच्या तुलनेत आकार व विस्तार, लहान असतो. हतनूर (जिल्हा परभणी) येथील कल्लोळ हे यादवकालीन असून शके 1223 मध्ये या स्थानाचा जीर्णोध्दार केल्याचा लेख उपलब्ध आहे. 

5) पोखरणी:- 
पोखरणी हा शब्द यादव काळात पुष्करणी यासाठी रूढ होता. पोखरणी हे पुष्करणीचे प्राकृत रूप होय. लीळाचरित्रातूनही ही संज्ञा येते. बारवेपेक्षा विस्तीर्ण जलाशय म्हणजे पोखरणी. याचे स्थापत्य शास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे कमी खोलीवर विस्तीर्ण असा भाग तळाशी ठेऊन बांधकाम करतात. स्वाभाविकपणे यात टप्पे असत नाहीत. बारवेच्या तुलनेत कमी रुंदीचे बांधकाम असते. पोखरणीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे समतल भाग जास्तीतजास्त मोठे ठेऊन कमीतकमी टप्यात पूर्ण केलेले बांधकाम होय. अशा वास्तूचे वर्णन करताना कमलवेलीनी युक्त असलेला जलाशय म्हणजे पुष्करणी असेही म्हटले जाते. याच्या मध्यभागी काही वेळा मंडप उभारतात. विशेषतः दक्षिण भारतात अशा वास्तू आढळतात. मद्रास येथील कपिलेश्वर मंदिराजवळील जलाशय, तिरूपती व मदुराई येथील जलाशय उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ (जिल्हा परभणी), अंबड (जिल्हा जालना), त्र्यंबकेश्वर (जिल्हा) नाशिक), होट्टल (जिल्हा नांदेड)

5) तडाग :-
पोखरणीपेक्षा मोठ्या जलाशयाला तडाग-तळे किंवा तलाव म्हणतात. निसर्गतः उपलब्ध पाणलोट क्षेत्राची निवड करून योग्य ठिकाणी बंधारा बांधून निर्माण केलेला जलाशय म्हणजे तडाग, 

Ref:- 

1) अपराजितपृच्छा
2) बृहत्कल्पसूत्रभाष्य
3) Maharashtra gazatter 
4) G.B.Degulkar
5) A.V. Naik

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...