खर्ड्याची लढाई 🚩
खर्ड्यात जी लढाई झाली होती त्यामध्ये केवळ अग्निबाणच नाही तर मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा वापर करण्यात आला होता.
'मराठ्यांना खंडणी का द्यावी त्यापेक्षा हा पैसा आपण युद्धावर खर्च करू' असं म्हणणारा निजामाचा पंतप्रधान लढाईत पराभूतच नाही तर बंदिवान देखील झाला.
11 मार्च 1795 ला झालेल्या ही लढाई मराठा साम्राज्याची शेवटची यशस्वी लढाई म्हणून ओळखली जाते.
या लढाईची पार्श्वभूमी काय?
11 मार्च 1795 रोजी ही लढाई निजाम अली खान असफजाह दुसरे आणि पेशवे सवाई माधवराव यांच्या फौजांमध्ये झाली होती. या लढाईत मराठ्यांनी निजामांच्या फौजांचा धुव्वा उडवला होता.
1761 ला मराठ्यांचा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराभव झाला होता. या पराभवानंतर तत्कालीन पेशवे नानासाहेब खचले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले.
मराठा साम्राज्याची जबाबदारी थोरले माधवराव पेशवे यांच्यावर आली. मराठा साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा माधवराव पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले.
मराठा साम्राज्याचा पुन्हा विस्तार करण्यासाठी मोहिमांचा धडाकाच त्यांच्या काळात सुरू झाला. माधवराव पेशवे यांचे सरदार महादजी शिंदे यांचा उत्तर भारतात दबदबा वाढला होता.
उत्तरेत महादजी शिंदे तर पुण्यात नाना फडणवीस मराठा साम्राज्याच्या वृद्धीसाठी कार्य करू लागले.
नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्या साहाय्याने थोरल्या माधवरावांनी मराठा साम्राज्याची घडी पुन्हा नीट बसवली होती.
पण माधवराव अल्पायुषी ठरले. 9 वर्षं पेशवेपद सांभाळल्यानंतर 1772 मध्ये त्यांचे निधन झाले.
अल्पकाळ नारायणराव पेशवे यांच्याकडे पेशवेपदाची सूत्रं आली. नारायणराव पेशवे आनंदीबाई आणि रघुनाथराव यांच्या कटकारस्थानांना बळी पडले आणि त्यानंतर सवाई माधवराव हे पेशवे बनले. 1774 ते 1795 या काळात ते पेशवेपदाच्या गादीवर होते.
सवाई माधवराव यांचा जन्म 1774 साली झाला होता आणि त्याच वर्षी ते पेशवे झाले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने सर्व कारभार नाना फडणवीस आणि महादजी शिंदे हेच पाहात.
महादजी शिंदे आणि नाना फडणवीस हे दोघेही कर्तृत्ववान होते आणि त्यांच्या जीवावरच मराठा साम्राज्याचा डोलारा उभा राहिला होता पण या दोघांमध्ये अनेक कुरबुऱ्या सुरू झाल्या होत्या.
महादजी शिंदे पुण्यापासून कसे जास्तीत जास्त कसे दूर राहतील याचा प्रयत्न नाना फडणवीस करत.
महादजी शिंदेंनी या गोष्टीकडे संधी म्हणून पाहिलं. दरबारी राजकारण करण्यापेक्षा त्यांचा जोर युद्ध गाजवण्यावरच होता. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले. पूर्ण उत्तर भारतच त्यांनी काबिज केला.
1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. या काळात अनेक मुघल बादशाह झाले पण त्यांचा प्रभाव कमीकमी होत गेला. इतका कमी झाला की शाह आलम द्वितीय याला इंग्रजांनी अलाहाबादेत नजरकैदेत ठेवले.
सहा वर्षं इंग्रजांकडे राहिल्यावर 1772 मध्ये महादजींनी त्याला सोडवून आणले आणि पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. त्यानंतर मुघल बादशाह हा केवळ नामधारी बादशाह राहिला. त्याच्या वतीने सर्व कारभार महादजी शिंदेच बघत होते.
औरंगजेब याचे चित्र
फोटो स्रोत,PENGUIN INDIA
फोटो कॅप्शन,
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा दरारा पूर्वीसारखा राहिला नव्हता.
महादजी शिंदे सर्व कारभार ग्वाल्हेरमधून पाहत असत. शाह आलम द्वितीयला महादजी शिंदेंचा पाठिंबा असला तरी त्याच्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांची कमी नव्हती.
1788 मध्ये गुलाम कादिर या रोहिला सरदारासोबत मिळून महमूद शाह बहादूरने शाह आलमला हटवले आणि स्वतःलाच दिल्लीचा बादशाह घोषित केले.
महादजी शिंदेना कळताच त्यांनी दिल्ली गाठले. रोहिल्यांचे बंड मोडून काढले आणि पुन्हा शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवले. तेव्हापासून मराठा साम्राज्याला आव्हान देणारा भारतात कुणीच उरला नाही.
महादजी शिंदेंना 'वकील उल मुतलक' म्हणजेच बादशाहचे कारभारी ही पदवी देण्यात आली होती, त्यामुळे महादजी शिंदे हे त्यावेळचे भारतातील सर्वांत मोठ्या सरदारांपैकी एक म्हणून नावारूपाला आले.
चौथाई देण्यास टाळाटाळ
उत्तरेत महादजींचा दबदबा होता पण त्यांना थेट आव्हान न देता स्वतःचे हित साधणाऱ्यांची देखील काही कमी नव्हती. अशा संस्थानिकांपैकी एक होता हैदराबादचा निजाम अली खान असफ जाह द्वितीय.
दक्षिणेत मुघलांच्या वतीने निजाम कारभार पाहत असे. निजामाचा प्रदेश मराठ्यांच्या प्रदेशाला लागून होता.
राज्यावर आक्रमण करू नये म्हणून मांडलिकाने उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग देणे बंधनकारक होते. त्याला चौथाई म्हटले जात असे.
बाजीराव पेशव्यांच्या काळापासून ते माधवराव पेशव्यांच्या निधनापर्यंत निजामाने कुरबूर न करता मराठ्यांना चौथाई दिली
1772 मध्ये माधवरावांचे निधन झाले. त्यानंतर मराठा साम्राज्यात अनेक स्थित्यंतरं झाली. मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा आणि संघर्षाचा फायदा उचलण्याचा निजामाने प्रयत्न केला. त्यामुळेच 1774 ते 1782 या काळात निजामाने चौथाईच दिली नाही.
1782 मध्ये संधी झाली. तेव्हा काही वर्षं तणाव निवळलेला दिसला पण चौथाई देण्याचा विषय निजामाने पूर्णतः टाळला होता. मराठ्यांना दूर ठेवण्यासाठी निजाम इंग्रजांच्या जवळ जाऊ लागला होता.
महादजी शिंदे उत्तरेतून पुण्याला 1792 मध्ये आले. अनेक वर्षांनंतर ते पुण्यात आले होते. महादजी शिंदे आणि त्यांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्यानंतर नाना फडणवीसांचा आत्मविश्वास वाढला.
निजामांकडून चौथाई वसूल करण्यासाठी पुन्हा जोर लावला.
महादजी शिंदेंची ताकद निजाम ओळखून होता. त्याने एक दोन वर्षं टाळाटाळ केली. तोपर्यंत ही रक्कम तीन कोटी रुपयांच्या वर गेली.
याच बरोबर बीड जिल्ह्याचा भागसुद्धा निजामाने मराठ्यांच्या हवाली करावा अशी मागणी नाना फडणवीसांनी केली. या भागाचं उत्पन्न 33 लाख रुपये इतकं होतं.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून निजामाने इंग्रजांची मदत मागितली. हा तंटा इंग्रजांनी सोडवावा असं त्याला वाटत होतं. पण इंग्रजांना मराठ्यांची नाराजी परवडणारी नव्हती.
गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर यांनी निजामाची मागणी अमान्य केली आणि तटस्थ राहण्याची भूमिका निवडली.
महादजी शिंदेंचा मृत्यू
जर महादजी शिंदेंचा फेब्रुवारी 1794 मध्ये मृत्यू झाला नसता तर कदाचित खर्ड्याची लढाई झाली नसती. कारण ती होण्याचं काही कारण देखील नव्हतं.
ते असते तर निजामाला मराठ्यांची चौथाई द्यावीच लागली असती पण महादजींच्या मृत्यूनंतर निजामाने वाटाघाटीच बंद केल्या आणि चौथाई देणारच नाही असं ठणकावलं.
नाना फडणवीस यांना हा अपमान जिव्हारी लागला. त्यांनी निजामाकडून थकबाकी वसूल केली जाईल असं सांगितलं.
निजामाचा दिवाण (पंतप्रधान) अझीम उल उमरा (मुशीर-उल-मुल्क) याने निजामाला म्हटले की इतकी खंडणी देण्यापेक्षा हा पैसा आपण आपल्या फौजांवर खर्च करू. जिंकलो तर आपल्याला पैसाही द्यावा लागणार नाही आणि वर जी लूट होईल ती देखील आपली राहील
लढाईची तयारी
डिसेंबर 1794 पासून या लढाईची तयारी सुरू झाली. निजामाचं सैन्य कोणत्या वाटेनी येणार याची माहिती मराठ्यांनी गुप्तहेरांच्या मदतीने काढली.
या लढाईत मराठ्यांकडे घोडेस्वार- 73,600, पायदळ- 38,000 पायदळ आणि तोफा - 192 होत्या. या तोफांपैकी 98 तोफा एकट्या दौलतराव शिंदेंच्या (महादजींचे पुतणे आणि शिंदे घराण्याचे वंशज) होत्या
.
Comments
Post a Comment