मराठा साम्राज्याचे अखेरचे सरसेनानी श्रीमंत राजे चतुसिंग राजे भोसले ( वावीकर ) यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩🚩
🚩🚩 मराठा साम्राज्याचे अखेरचे सरसेनानी श्रीमंत राजे चतुसिंग राजे भोसले ( वावीकर ) यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩🚩
महाड तालुक्यातील कांगोरी किल्ल्यावर (मंगळगड) १५ एप्रिल १८१८ मध्ये एका राजकुलीन, धाडसी, मातब्बर योद्ध्याचा कैदेत मृत्यू झाला.कोण होते ते वीर पुरुष ?
आपल्या बंधुंच्या सिंहासनाला वाचवणारा हा राजपुरुष,...इंग्रज आणि फितुर मराठे सरदार यांच्या कुटनितीमुळे बळी गेला.
ती व्यक्ती म्हणजे "चतुरसिंगराजे"...त्यांनी केलेला पराक्रम,धैर्य दाखवलेले शौर्य अगदी त्रोटक स्वरुपात इतिहासात नोंदवले गेले आहे.
कोण होते चतुरसिंग राजे?
मालोजी व विठोजी या सुप्रसिद्ध भोसले बंधुंपैकी विठोजी यांना आठ मुले....
यापैकी एक म्हणजे वावीकर राजेभोसले. या शाखेतील त्रिंबकजी यांना तीन मुले झाली.
* विठोजी
* परशुराम आणि
* चतुरसिंग.
यातील मोठा मुलगा विठोजी हे छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचे दत्तक पुत्र सातारकर छत्रपती राजाराम महाराज यांना इ सन १७७७ मध्ये दत्तक गेले.१७७७ ला राज्याभिषेक करुन त्यांचे नाव बदलुन "धाकटा शाहु" आसे ठेवण्यात आले.त्यांचे धाकटे बंधु चतुरसिंग राजे हे सातारा येथे त्यांच्या सोबत रहात होते. परशुराम हे वावी येथे होते.सध्या त्यांचें वंशज वावी (तालुका सिन्नर जिल्हा नाशिक) येथे राहतात.
छ. धाकट्या शाहुंची चतुर्थ पत्नी शिर्के कन्या आनंदीबाई या कर्तबगार होत्या.१८८६ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन पुत्र झाले.
* प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब
* रामचंद्र उर्फ भाऊसाहेब
* शहाजी उर्फ आप्पासाहेब
चतुरसिंग यांचा विवाह--
छत्रपती धाकटे शाहुं यांच्या प्रथम पत्नी लक्ष्मीबाई नारायणराव मोहिते यांच्या कन्या .... त्यांच्याच धाकट्या बहिण बबईसाहेब यांच्याशी २६ नोव्हेंबर १७८९ ला चतुरसिंगराजेंचा विवाह झाला.पुढे बबईसाहेब १८ जुलै १७९८ ला या दांपत्याला मुलगा झाला. ज्यांचें नाव बळवंतराव. हेच बळवंतराव उर्फ बाळासाहेब... छत्रपती प्रतापसिंह यांनी त्यांना आपले सेनापती नेमले होते.
छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांच्या प्रथम पत्नी माईसाहेबांचे भाऊ खंडेराव मामा शिर्के आणि शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजरांचे वंशज रघुनाथराव यांनी नेहमीच चतुरसिंग यांना साथ दिली.
चतुरसिंग यांची अस्वस्थता
नाना फडणीस आणि पेशवे यांच्यामुळे छत्रपतींना बरेचदा त्रास सहन करावा लागला.सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यावर बाजीरावाने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. छत्रपतींवर चौकी पहारे बसवले.आपल्याच मुलखात छत्रपती नजरकैद झाले. पेशवाईतले घोटाळे वाढले. पेशव्यांविरुद्ध राजमंडळी असे स्वरुप झाले यात छत्रपतींचा पाडाव झाला. शाहु छत्रपतींची सर्व भिस्त चतुरसिंग यांच्यावर होती. चतुरसिंग अस्वस्थ झाले.
चतुरसिंग आणि सहकारी
चतुरसिंग यांना सातारा व करवीर राजमंडळे यांचा पाठिंबा होता. व्यासराव गोपाळ डबीर, बापु कान्हो फडणीस, मल्हार रामराव चिटणिस, मुंगीकर मालोजीराजे , भवानजी राजेशिर्के, रघुनाथ गुजर आणि मंडळी चतुरसिंग यांच्यासह रानोमाळ फिरु लागले. यावेळी चतुरसिंग यांना केवळ सातारा गादीच्या सुरक्षिततेची चिंता होती. काही सरदारांनी(सर्जेराव घाटगे) त्यांना सरदारी करुन आपला स्वार्थ पहावा असे सुचवले परंतु चतुरसिंग राजे बधले नाहीत. त्यावेळच्या पावसाळ्यात चतुरसिंग पुण्यात चार महिने राहिले. परंतु दुसऱ्रेबाजीराव यांच्या वर्तनामुळे पुणे सोडुन ते विजापुरला गेले.
बाजीराव पेशव्यांनी चालवलेली गैरकृत्ये -
बाजीराव पेशवे नी छत्रपतीःवर बंधने आणली.त्यांचा वाढता मुजोरपणा बघुन यशवंतराव होळकर पुण्यावर चालुन गेले.यावेळी पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि यशवंतराव होळकरांविरौद्ध उभे राहिले. बाजीरावाच्या या कृत्यामुळे सातारा राजघराण्याची अवस्था बिकट झाली. तोंड दाबुन बुक्क्याःचा मार अशी अवस्था झाली.
चतुरसिंग यांचे प्रयत्न --
सन १८०३ च्या उन्हाळ्यात चतुरसिंग यांनी या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी निश्चय केला.आणि आपले बंधु छ. छाकटे शाहु यांच्या छत्रछायेत आपली पत्नी व मुलास ठेवुन ते इतर मराठा सरदारांच्या भेटीसाठी निघाले.
जगदेवराव जाधवराव यांची भेट --
चतुरसिंग शिंदे यांना भेटण्यासाठी निघाले. शिंदे बुर्हाणपुरला होते. तिकडे जात असताना वाटेत चृतुरसिंग यांनी सिंदखेड येथिल जिजाबाईंच्या वंशातील प्रतिष्ठित सरदार जगदेवराव जाधवराव यांची गाठ घेतली. तत्कालीन परिस्थितीवर चर्चा केली.
१० आॕगस्ट १८०३ --अजिंठाच्या घाटात दौलतराव शिंदे व सर्जेराव घाटगे यांची चतुरसिंग यांनी भेट घेतली. दौलतराव हे चतुरसिंग राजेंच्या भेटीला स्वतःहुन आले. दरम्यान इंग्रजांनी शिंदेंच्या विरुद्ध युद्ध पुकारले होते. आईसआडगावात शिंदेंसोबत चतुरसिंग यांनी स्वतः हुन भाग घेतला.या युद्धात पेशव्यांनी ब्रिटिशांना मदत केली. इंग्रजांचा विजय झाला.
करवीर आणि सातारा राजघराणे तसेच इतर घरंदाज मात्तबर मंडळींना या युद्धातील पराभवामुळे प्रचंड यातना झाल्या. या युद्धात चतुरसिंगराजे हे
होळकर ,शिंदे यांच्या बाजुने उभे राहिल्याने त्यांना बंडखोर ठरवण्यात आले.
नागपुरच्या रघुजी यांची भेट --
युद्ध शांत झाल्यावर चतुरसिंगराजे नागपुरला रघुजी भोसलें यांच्या कडे गेले. मराठेशाही आणि सातारा छत्रपतींच्या बाजुने विचार करणारे चतुरसिंग यांचे नागपुरच्या भोसल्यांकडुन स्वागत झाले.भोसले घराण्याने त्यांना सन्मानाने वागवले.चतुरसिंग यांना पंधरा हजाराची नेमणुक मिळाली. ते नागपुरातदहा महिने राहिले.परंतु चतुरसिंगराजे यांना छत्रपतींना बाजीरावांच्या नजरकैदेतुन सोडवायचा ध्यास होता.ते तिथे याच उद्देशाने गेले होते.
निश्चयी चतुरसिंगराजे--
दौलतराव शिंदें यांनी चतुरसिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले,नागपुर वरुन दोन हजार लोकांची फौज घेऊन जबलपुर सागर वरुन पुढे चंबळ नदीकाठी सबाळगडावर दौलतरावजी शिंदे व यशवंतरावजी होळकर यांचा मुक्काम एकत्र होता. सन १८०५ मध्ये चतुरसिंग तिथे पोहचले यावेळी सर्जेराव घाटगे हे देखिल होते. छत्रपतींंशी शिंदे घाटगे यांनी केलेल्या करारांची आठवण करुन देत चतुरसिंग यांनी दोघांना शाब्दिक फटकारे दिले.तिघांमध्ये काही बोलणी झाली पुढे ते अजमेरला गेले.
चतुरसिंग यावेळी भरतपुरला जाट राजास भेटले.नंतर दिल्ली ला माल्कन आणि सेनापती लाॕर्ड लेक यांनाही भेटले.
चतुरसिंग यांची स्वामीनिष्ठा---
लेक व माल्कन यांना दिल्लीला भेटल्यावर चतुरसिंग यांना ब्रिटीशांशी हात मिळवणी करुन ...ब्रिटीशांकडुन बक्षिशी ,सरदारकी मिळवता आली असती.तसे पहता कोणासाठीही ही एक संधी ठरली असती.परंतू चतुरसिंगराजे स्वाभिमानी होते. त्यांना बक्षिशी वा सरदारकीचा मोह नव्हता.त्यांना सातारा गादीच्या छत्रपतींच्या बाजुने भक्कम पाठिंबा मिळवायचा होता.
जोधपुर-जयपुर-उदयपुर- मंदसोर- बडोदा प्रवास ----
सातारा छत्रपतींच्या बाजुने उभे राहण्यासाठी अनेकांना भेटुन चतुरसिंग राजे प्रवास करीत राहिले.जुलै १८०६ मध्ये चतुरसिंग पुष्कर येथे यशवंतराव होळकर यांना भेटले.पुढे जोधपुरला मानसिंग रारेस भेटुन दिल्लीला परत आले.१८०६ डिसेंबर मध्ये जयपुरला जगतसिंह यांची भेट तर उदयपुरला राणा यांची भेट घेतली.
बडोद्याचे गायकवाड --
बडोद्याला गायकवाड घराण्याकडुन काही सहकार्य मिळेल या अपेक्षेने ते कान्होजी गायकवाडांना भेटले.परंतु गायकवाड घराण्यातील राजमंडळी आधीच इंग्रजांच्या आधीन झालेली असल्याने निराशा झाली.तेथुन ते मंदसोरला गेले.दरम्यान उज्जयनीला असताना चतुरसिंग यांना छ.धाकटे शाहु यांच्या निधनाची बातमी मिळाली.
छत्रपती धाकटे शाहुंचे निधन --
आपले बंधु छत्रपती शाहुंच्या निधन झाल्याचे कळताच चतुरसिंगराजे यांना दुःख आवेगाने धक्का बसला.. ज्यांच्याकरता वणवण केली तेच बंधु राहिले नाहीत या विचाराने चतुरसिंगराजे खचुन गेले. या संधीचा फायदा घेऊन बाजीरावाने चतुरसिंग यांच्या पत्नी व चिरंजीवास (बळवंतराव) याना कैदेत ठेवले.आणि घाई घाईने प्रतापसिंह राजेंचा राज्याभिषेक उरकला.
या परिस्थिती नंतर (१८०९) चतुरसिंगराजे यशवंतराव होळकरांना भेटण्यासाठी गेले आसता यशवंतरावांना वेड लागलेले पाहुन अधिक कष्टी झाले. इकडे दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती प्रतापसिंह यांची मर्जी संपादन केली.परंतु त्याने राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला.
चतुरसिंग, त्यांचे साथीदार आणि धार मुक्काम ---
चतुरसिंगांबरोबर बापु कान्हो, व्यासराव डबीर,,मल्हारराव चिटणीस, वैगरे साथीदार त्यांच्यासोबत सुरवातीपासुन सर्व प्रवासात होते. ही सगळी मंडळी (१८०९ ) जुलैमध्ये धारला गेली.इथे धामधुम असल्याने दोन वर्षे तिथेच गेली.
बाजीराव पेशव्यांची कुटनिती--
बाजीरावांनी त्र्यंबक डेंगळे यांना चतुरसिंग यांचेकडे पाठवले. सावध चतुरसिंग सोनगड वाटेने खानदेशात आले. तरी बाजीराव यांना चतुरसिंग यांच्याबद्दल तक्रार नाही उलट ते हितचिंतकच आहेत असा डेंगळेनी निरोप दिला. डेःगळेःनी बेलभंडारा उधळुन शपथ घेतली. आणि त्याच्यावर विश्वास ठेवुन चतुरसिंग डेंगळेच्या भेटीला गेले. रात्री बैठक झाली.
चतुरसिंगराजे, रघुनाथ गुजर,बापु फडणीस,आप्पाजी इंगळे,हे चौघे तसेच गोपाळराव न्यायाधिश, आपाभट पुणतांबेकर,त्यांचे दोन बंधु बाबाजी केशव पाडाळीकर, लाडेखान जमादार व हवालदार खिजमतगार असे एकुण अकरा जणणाःना एकाएकी वेढा घालुन कैद करण्यात आले.
सर्वांना मालेगावच्या किल्लात ठेवण्यात आले.बाजीराव नाशिकला आल्यावर चतुरसिंगराजेंना बेड्या घालुन रायगडावर रवाना करण्यात आले.(मे १८११)
चतुरसिंग राजे यांचा अखेर--
१५ एप्रिल १८१८ रोजी कैदेत असलेल्या चतुरसिंग राजेंचा कांगोरी किल्ल्यावर कैदेत मृत्यू झाला.
चतुरसिंगराजेंच्या अस्थी प्रथम वाई नंतर सातारा येथे आणुन त्यांचे उत्तर कार्य करण्यात आले.
चतुरसिंग यांचे पुत्र बळवंतराव --
चतुरसिंगाच्या पश्चात् त्यांचे पुत्र बळवंतराव राजेभोसले उर्फ बाळासाहेब सेनापती. बळवंतराव उर्फ बाळासाहेब राजेभोसले म्हणजे छत्रपती प्रतापसिंहांचे सेनापती हे देखील त्यांच्या स्वामीनिष्ठेसाठी ओळखले जातात.
चतुरसिंग राजेभोसले वावीकर यांच्या स्मृतीस अभिवादन ! चतुरसिंग यांच्या सोबत असणारे सहकारी यशवंतराव व विठाजी होळकर,अमीरखान, सर्जेराव घाटगे,धोंडजी वाघ यां सर्वांना अभिवादन ...
संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत -८
Comments
Post a Comment