आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ ऑक्टोबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१८ ऑक्टोबर १६७९*
१८ ऑक्टोबरच्या सकाळी मराठ्यांचे सुमारे ५० गुराबांचे एक पथक वेगाने वल्ही मारत इंग्रजी आरमाराच्या रोखाने येऊ लागले. समुद्राला भरती होती आणि वारा पूर्व दिशेने वाहत होता. इंग्रजी आरमार थळ आणि खांदेरीच्या मध्ये नांगर टाकून उभे होते. वाऱ्याच्या अनुकुलतेचा फायदा घेत मराठ्यांनी इंग्रजी आरमारावर तोफांची सरबत्ती सुरु केली. केग्विनला मुंबई कौन्सिलने आदेश दिला होता की मराठ्यांनी हल्ला केल्यास प्रथम त्यांना सामोपचाराने समजावून सांगावे पण या करिता केग्विनला वेळच मिळाला नाही ! त्याच्यावर थेट हल्ला झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंग्रजी आरमार गोंधळात पडले. मराठ्यांनी केलेला हल्ला हा नावांच्या नाळेच्या दिशेने होता. जहाजावरील तोफा ह्या नाळेच्या काटकोनात असत त्यामुळे इंग्रजांना त्यांची गलबते फिरवून हल्ला करावा लागणार होता. फ्रिगेट व काही शिबाडांवर पिछाडीस असणाऱ्या एक दोन तोफांनी प्रतिहल्ला सुरु केला.हल्ल्यातून वाचण्यासाठी इंग्रजी आरमाराने नांगर कापून टाकले आणि शिडे सोडून मिळेल त्या वाऱ्याच्या दिशेने ते सैरावैरा भटकू लागले. बरीचशी जहाजे दक्षिणेच्या वळणावर लागली जाणाऱ्या जहाजांमध्ये रिव्हेंज ही फ्रिगेट आणि डव्ह ही गुराब सगळ्यात शेवटी होत्या. मराठ्यांच्या वल्हवणाऱ्या होड्यांनी आता डव्हला वेढले. डव्ह वेधली गेलीये पाहताच काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या. डव्ह चा कर्णधार होता फ्रांसिस मोलीव्हेयार त्याने डव्ह संकटात पाहताच रिव्हेंज कडे मदत मागितली. रिव्हेन्ज्ला वारा अनुकूल नव्हता तसेच हालचाल करण्याकरिता पुरेशी जागाही नव्हती आणि त्यामुळे रिव्हेंज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वाढली. त्यामुळे रिव्हेंज स्वतःचा बचाव करू लागली. या दरम्यान डव्ह जवळून सार्जंट डकट आणि सार्जंट फुलर यांचे मचवे गेले पण ते मदतीस आले नाहीत. मराठे जवळ येऊ लागले तसे डव्ह वरील ‘Union Jack’ आणि शिड उतरली; हे शरणागतीचे निशान होते. डव्ह चा खलाशी जॉन नेलर याचा मराठ्यांशी पूर्वी संबंध आला असे दिसते कारण त्याने इतरांना सांगितले
“शस्त्र खाली ठेवल्यास मराठी हल्ला करणार नाहीत व कैद करतील अथवा ते जहाजावर कब्जा करून सर्वांना कापून काढतील”
आणि त्याप्रमाणे सर्वांनी शस्त्र टाकले. मराठे डव्ह वर आले आणि त्यांनी डव्ह ताब्यात घेतली. मराठे पुढे निघाले, आता त्यांनी आपला मोर्चा रिव्हेंज कडे वळवला. मराठ्यांच्या गुराबा येताना दिसताच रिव्हेंज वर असणारे कॅप्टन रिचर्ड केग्वीन आणि कॅप्टन मिन्चीन यांनी रिव्हेंजवरील शिबंदीला भरोसा दिला व सांगितले की – “ख्रिस्ती लोकांनी काफिरांचे कैदी होणे हे नामुष्कीचे असून त्यापेक्षा लढण्यात धन्यता माना”. असे सांगून त्यांनी एक डाव रचला आणि शिड पाडली. शरणागतीचे चिन्ह समजून मराठ्यांच्या गुराबा वेढू लागताच रिव्हेंज वरून जोरदार प्रतिकार झाला आणि तोफा, बंदुकी यांचा एकच मारा मराठ्यांवर झाला. मराठे आता कोंडीत अडकले. इंग्रजांचा डाव त्यांना कळला आणि ते माघार घेवून नागावच्या खाडीकडे वळू लागले. परतीच्या वाटेवर असताना इंग्रजांनी मराठ्यांच्या पिछाडीवर काही मचवे पाठवले आणि भरपूर तोफगोळे उडवले. या धुमश्चक्रीत मराठ्यांच्या काही गुराबांचे नुकसान झाले आणि अंदाजे तीन गुराबा बुडाल्या असे इंग्रज नोंदींवरून कळते. मराठ्यांच्या काही गुरबा नागावच्या खाडीत गेल्या व काही गुरबा डव्ह समवेत खांदेरीकडे गेल्या. मराठ्यांनी कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेयर सह सुमारे २५ युरोपियन लोक पकडले आणि सागरगडावर कैदेत रवाना केले. केग्विनने मुंबईला रवाना केलेल्या वृत्तानुसार त्याच्या नाविक दलाने मराठ्यांचे सुमारे २०० लोक मारले व १०० जखमी केले होते. या प्रसंगादरम्यान रिव्हेंज व्यतिरिक्त इतर जहाजावरील इंग्रजांची वागणूक अत्यंत भेकड आणि पळपुटी होती. याची तक्रार केग्वीनने मुंबईला केली. मराठ्यांनी कैद केलेल्या इंग्रजांना मुंबईशी पत्रव्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे काही दिवसांनी फ्रांसिस मौलीव्हेयर याने मुंबईला पत्र पाठवून काही अन्न धान्य व औषधे मागितली जी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेहून परवानगी मिळताच पुरवलेली आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१८ ऑक्टॉबर १७५३*
समशेर बहाद्दुरचा द्वितीय विवाह
श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर बहाद्दर यांचा जन्म २८ जानेवारी १७३४ ला झाला, त्याचे मूळ नाव कृष्णसिंह, पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले.
नियतीने आई-वडिलांचे छत्र वयाच्या सहाव्या वर्षी हिरावून घेतले. पण, आई वडिलांच्या प्रेमामुळे जे वादळ उठले होते, त्याचा थोडाही परिणाम या मुलाला वाढवण्यात झाला नाही. पेशवाईतील प्रत्येकांने विशेषतः राधा बाई, नाना साहेबांनी जातीने लक्ष घालुन त्यांना वाढवले. प्रेम, जिव्हाळा देण्यात पेशवाईतील कोणीही हात आखडता घेतला नाही. त्या मुळेच इतर मुला प्रमाणे समशेर शनिवार वाड्यात लहानाचा मोठा झाला. इतर मुलाप्रमाणे मराठी, मोडी भाषेमध्ये शिक्षण झाले बरोबरीने फारसी शिकले. हिंदु आणि बरोबरीने मुस्लिम चालीरीती शिकवल्या. शनिवार वाड्यात वाढत असताना सदाशिव भाऊ आणि समशेर मध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. एकमेकांवर खुपच जीव होता. भाऊच्या सहवासात राहुन समशेर दरबारी आणि युद्ध कला दोन्ही आघाडयांवर तरबेज झाले होते.
नानासाहेब पेशव्यांनी १८ ऑक्टॉबर १७५३ ला समशेर चा दुसरा विवाह मेहेरबाईशी लावुन दिला. त्यांच्या वडिलांचे नाव गुलाब हैदर निंबगिरीकर. पुढे जाऊन १७५८ ला त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अली बहाद्दर...!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment