गुरुदेव दत्त आरतीची रचना

मी तू पणाची झाली बोळवण!

एकनाथ महाराजांनी रचना केलेली दत्ताची आरती पूर्ण जगभरातील दत्त भक्तांच्या जिभेवर आहे. वरवर दिसायला अतिशय सोपी व गेय! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तोंडपाठ. एकनाथ महाराजांचे गुरु तर जनार्दन महाराज. औरंगाबाद जवळ दौलताबाद परिसरात. नाथ महाराज गोदाकाठी प्रतिष्ठान म्हणजे पैठण क्षेत्रात. नाथ महाराज नंतर गुरू जनार्दन महाराज व त्यानंतर दत्तात्रेय. म्हणजे तीन स्टेप्स, पायऱ्या. म्हणजे द्वेत आलं. जोपर्यंत या तीन पायऱ्या एकमेकांत मिसळून एकच पायरी म्हणजे पीठ, प्रतिष्ठान होत नाही तोपर्यंत द्वैत जाणार नाही. एकच पायरी म्हणजे अद्वैत.
शिष्य-गुरू- आराध्य, उपास्य दैवत जोपर्यंत एकमेकांत विरघळून जात नाही तोपर्यंत द्वैत तसेच राहणार. दुसरी आणि तिसरी पायरी म्हणजे गुरू आणि आराध्य, उपास्य दैवत तर पहिल्या पायरीत विरघळून जाण्यासाठी आसुसलेले आहेत पण शिष्य म्हणजे पहिली पायरी ते पचविण्यासाठी अजून तयार नाही. कारण आराध्य दैवत, उपास्य दैवत याबद्दल बरंच काही तरी ऐकून, वाचून शिष्याच्या मनात दैवताची एक वेगळीच इमेज, छबी तयार झालेली. तो वेगळं काही दिसणारं पण वास्तव स्विकारायला तयार नाही म्हणजे विरघळून जाण्यात अडथळा. तो कसा दूर करायचा? मग स्वतःहून संधी चालून आली. नाथांनी गुरू जनार्दनाकडे हट्ट धरला की मला दत्त दर्शन पाहिजे. गुरू म्हणाले की ठिक आहे, योग्य वेळी सांगतो. एका रात्री गुरू म्हणाले चल माझ्या सोबत. गुरू शिष्य शुलीभंजन डोंगरावर आले. गुरुंनी नाथांना सांगितले की सावध राहा, ओळखण्यात कमी पडू नकोस. चालता चालता समोरून एक मलंग आला. दोन्ही हातात उलट्या कोंबड्या पकडून ठेवलेल्या.
गुरुंनी नमस्कार झाला व मलंगाने कोंबड्या गुरुंच्या दिशेने फेकल्या आणि स्वयंपाक कर म्हणे याचा. गुरुंनी आज्ञाधारक पणे तीन दगडं गोळा करून चूल पेटवली, कोंबड्या कापल्या, त्या शिजवल्या, मलंग व गुरुंनी गप्पा मारत मारत त्या रिचवल्या व पात्रात हात धूवून लांबवरुन हा सर्व प्रकार पहात असलेल्या एकनाथांसमोर ते हात धुतलेल्या पाण्याचं उष्टे पात्र धरले व पिऊन टाक म्हणाले. अर्थात नाथांकडून ते झाले नाही. मलंग गुरुंचा निरोप घेऊन अंधारात आल्या वाटेने निघून गेला. गुरू शिष्याला म्हणाले चल आता माघारी परतू. सर्व प्रकाराने स्तब्ध झालेले नाथ गुरुंच्या मागुन परत फिरले. मनात एकच विचार की गुरूंनी तर कबुल केले होते की दत्त दर्शन देतो मग मध्येच हा कोण भेटला व काय तो मांसाहार आणि दत्त दर्शन तर झालेच नाही. काही अंतर गेल्यावर हळूच गुरुंना आठवण करून दिली की दत्त दर्शन करवणार होते आपण? गुरू म्हणाले की तुला उच्छिष्ट प्रसाद जे देत होते ते कोण होते मग?

नाथांचं असं तर आपलं काय? चित्रांमध्ये, कॅलेंडरमधील रंगवलेल्या व्यक्तीरेखा पाहून लहानपणापासून आपल्या मनात दत्ताचं एक अदृश्य चित्र उभं असतं. मग प्रत्यक्षात तसा दिसला तरच तो दत्त. नाहीतर ऊं हूॅं....हे असले दत्त? नाथांच्या मनातील हेच द्वैत गुरुंनी अनुभूती देऊन घालवलं कारण नाथांना विश्वासाठी भविष्यात काम करायचे होते. द्वैत निरसन झाल्यावर नाथांनी मोजक्या शब्दात जे लिहिले आहे त्याच्या तोडीचं अद्याप कुणी लिहू शकलेला नाही. नाथ लिहितात...

१) नेती नेती शब्द न ये अनुमाना - दत्त हा असा नाही, तसा नाही अश्या वर्णनातून समजत नाही, त्याचा अंदाज लावता येत नाही. (म्हणून दत्त समजण्यासाठी समर्थ सतगुरू पाहिजे)

२) सुर वर योगीजन समाधी न ये ध्याना - दत्त हा ध्याना पलिकडील आहे म्हणजे तो गुरुकृपेने अनुभवायचा आहे. अगदी देव, योगी जरी त्यासाठी समाधी लावून बसले तरी तो ध्यानात येत नाही.

३) सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त - दत्त आतून बाहेरून व्यापून आहे.

४) अभ्याग्यासी कैसी कळेल ही मात- मात म्हणजे चाल, युक्ती. 
दत्त हा अशी मात देतो की तो समोर आला तरी ओळखू येत नाही, असे आपण अभागी आहोत, आणि आपल्या या अभाग्याचे कारण आपण स्वतःच आहोत. आपण कमी पडतो, गुरू द्यायला कमी पडत नाही.

५) परा ही परतली तेथे कैसा हा हेत - चार वाणी म्हणजे वाचा, बोलण्याचे प्रकार आहे वैखरी (ओठांतून), मध्यमा (घशातून पुसटशे), पश्यंती (अंतःकरणातून) आणि परा (नाभीतून). परा हे सर्वोच्च माध्यम देखील दत्ताचं वर्णन करायला सक्षम नाही. तेथे मी काय बोलणार!

६) जन्म मरणाचा फेरा चुकविला - पूर्वी गावांकडील यात्रांमध्ये खेळण्यात पिळ दिलेल्या तारेवर एक माकड असायचं, ती तार उभी धरली की ते माकड तारेला गिरक्या घेत खाली खाली यायचे, परत तार उलटून धरली की माकडाचं गिरक्या घेत खाली येणं सुरु. या माकडात आणि आपण माणसांत काहीच फरक नाही. एका एका जन्माची तार आपण धरतो आणि स्वतःच्याच नादात गिरक्या घेत घेत आपण मृत्यूच्या दिशेने अखंड वाटचाल करत असतो. हे थांबवायचं असेल तर एकच उपाय.... दत्तगुरु!

७) दत्त दत्त ऐसे लागले ध्यान - किती सोपे आहे ना! ना बिजमंत्र, ना माळा, ना तो मेरुमणी न ओलांडायची काळजी, ना किचकट संस्कृत. दत्त दत्त म्हणता म्हणता तार लागायला पाहिजे साखरेच्या पाकासारखी.

८) हरपले मन, झाले उन्मन - मन माणसाला उड्या मारायला लावते ते मन दत्त भक्तीत नुसतं हरवणार नाही तर हरपून जाईल व उन्मनी अवस्था सहजसाध्य होईल.

९) मी तू पणाची झाली बोळवण - सर्व रचनेचे, दत्त भक्तीचे सार म्हणजे मी तू पणाची झाली बोळवण, मी वेगळा आणि तो दत्त वेगळा असं काही द्वैत आता राहिले नाही, आता तिन्ही पायऱ्या एकच झाल्या आहेत. 

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज, पिठापूर एका प्रसन्न सकाळी आश्रमातील रुम बाहेर उघड्या आकाशाखाली खुर्चीवर चरण दुमडून बसले होते. मी सेवेत बाबांच्या डाव्या बाजूला खाली जमिनीवर मांडी घालून बसलो होतो. बाकी कुणी नव्हते. बाबांनी त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी आकाशाकडे करत "वो मालीक" म्हणत तर्जनी स्वतःच्या हृदयावर ठेवून "मैं नोकर" म्हणाले. नंतर ती तर्जनी थोडी उचलून परत स्वतःच्या हृदयावर ठेवून "मैं मालीक" म्हणत ती तर्जनी माझ्याकडे दाखवून "तू नोकर" म्हणाले.
इथेही तीन पायऱ्या होत्या. आकाशात अदृश्य पायरीवर दत्त, मधील पायरीवर बाबा म्हणजे गुरू आणि खालच्या म्हणजे तिसऱ्या पायरीवर, भुमी वर बसलेला म्हणजे जडत्वाला चिकटून बसलेला शिष्य म्हणजे तिसरी पायरी. लगोलग वरच्या पायरीवरील दत्त गुरुच्या पायरीत मिसळला. आता जडत्वातील शिष्याची जवाबदारी ना, की सारे भ्रम, इल्युजन, कन्फ्युजन दूर सारून या गुरूच्या पायरीत मिसळून जाणे!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४