आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ फेब्रुवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६१६*
सन १६१५ व १६१६ मधे ह्या मोहिमेतील महत्वाची युद्धे झाली. निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याने डिसेंबर १६१५ मधे जालन्याजवळ दोन्ही सैन्य एकत्र केली. मुघलांकडून असफखान, शाहनवाझखान, मानसिंह व इतर मातब्बर सरदार होते. जालन्याजवळच्या रोशनगाव इथे हे युद्ध झाले.
४ फेब्रुवारी १६१६ ला तुंबळ युद्ध झाले. दख्खनी सैन्याला माघार घ्यावी लागली. मुघलांनी खडकी पर्यंत, म्हणजे आजच्या औरंगाबाद पर्यंत धडक मारली. सगळे गाव व बाजूचा परिसर लुटून फस्त केला. मिळालेल्या लुटीसमवेत मग ते बालापूरच्या किल्ल्याकडे वळाले. त्या वेळी निजामशाहीची राजधानी देवगिरीला होती कारण अहमदनगरही मुघलांकडे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६६१*
कोकणातील दाभोळ बंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६७०*
नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिन
अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६७५*
छत्रपती शंभूराजांचे रायगडावर उपनयन (मुंज) झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६७७*
छत्रपती शिवाजी महाराज, कुतुबशाहची भेट
छत्रपती शिवाजी महाराज हैद्राबाद ला येताच मादाण्णा आणि अक्काण्णा व पातशाहाने महाराजांचे यथोचित स्वागत केली. हैद्राबादमध्ये छत्रपती शिवरायांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती. हैदराबादमधील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना पहावयास आतुर झालेला होता; कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे, सर्वांनी पराक्रम ऐकले होते (अफजल वध, शास्ताखानाची फजिती, जौहरचा वेढा, आग्राभेट व सुटका, शिवराज्याभिषेक). त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, कुतुबशाहीच्या राजवाड्यात आले, शाही नियमानुसार महाराजांचे योग्य आदरातिथ्य, पातशहाने केले. पुढे १ प्रहर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान अब्दुल हसन तानाशहा (कुतुबशहा) यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत, "दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधीशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे", असे धोरण निश्चित झाले. आणि इतर काही महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. हैद्राबादला महाराज १ महिन्याहून, अधिककाळ (४ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७) राहिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६८०*
छत्रपती राजारामाचे रायगडावर मौजीबंधन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १६८२*
औरंगजेबाचे दोन हजार घोडदळ आणि पंधरा हजार पायदळासह नबाब हसन अलिखान याचे मोगल सैन्य ४ फेब्रुवारी १६८२ रोजी कोकणात येऊन थडकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १७०३*
११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १७३५*
सेखोजीच्या मृत्यूनंतर वडीलकीच्या मानाप्रमाण सरखेलीचा हक्क संभाजींकडे आला असता मानाजींने सरखेली आपणास मिळावी म्हणून खटपट चालविली. संभाजी स्वभावाने तापट होता. त्याच्या वागण्याचा शांत स्वभावी मानाजींस राग येऊन त्यांनी आपणास सरखेली मिळण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले. आणि त्याकरीता पोर्तुगीज व इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांनीही चालून आलेली संधी सुवर्ण संधी मानून त्यांनी मानाजींच्या सहाय्यास इंचबर्ड यास चेऊलास डिसेंबर १७३४ मध्ये पाठविले. इतकेच नव्हे तर इंचवर्डला इंग्रजांनी सूचना दिल्या की, मानाजीला द्रव्यसहाय्य, मनुष्यबळ व इतर लढाऊ साहित्य हवे असल्यास देणे व त्यांस संभाजींविरुद्ध फितविणे. मानाजींने आपला हस्तक बाजीरावांच्या भेटीस पाठवून त्यांस ताबडतोब आपल्या मदतीस बोलविले. बाजीरावांनी कुलाब्यास तारीख ४ फेब्रुवारी १७३५ ते ३ एप्रिल १७३५ पर्यंत आपला मुक्काम ठेऊन आंग्रे बंधुचा तंटा मिटविण्याची तोड काढली. मानाजींने कुलाब्यास राहावे व संभाजींनी सुवर्णदुर्गास राहून त्यांना दोन भाग करून दिलेल्या प्रदेशाची त्यांनी वहिवाट करावी. संभाजींना सरखेलपद दिले व मानाजीनस वजारतमाब पद दिले. मानाजींची स्थापना कुलाब्यास झालेली इंग्रजांच्या पथ्यावर पडली. कारण मानाजी हे समंजस व पेशव्यांचे तंत्राने चालणारे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १७६८*
मराठा लाइट इन्फंट्री
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात 'मराठा'ची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट (विद्युतवेगाने काम करणारी) बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचवेळी सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १८०८*
सिधोजीराव निंबाळकर देसाई उर्फ आप्पासाहेब निपाणकर यांचे आणि कोल्हापूर राज्याचे संबंध १८०७ साली अधिकच बिघडले. सावंतवाडीच्या लक्ष्मीबाई भोसले यांनी छत्रपतींच्या विरुद्ध आप्पासाहेब निपाणकराकडे मदत मागितली. निपाणकर हे पेशव्यांचे जहागिरदार. तेव्हा पेशव्यांचा रुकार त्यांनी मिळविला आणि कोल्हापूरवर प्रचंड फौज घेऊन स. १८०७ च्या मे मध्ये स्वारी केली. हे युद्ध पुढे सहा महिने चालले. ४ फेब्रुवारी १८०८ रोजी कोल्हापूरच्या फौजेवर जोराचा हल्ला करून महाराजांच्या फौजेची दाणादाण उडविली. कोल्हापूरकरांचा दारुण पराभव झाला. सिधोजीराव निंबाळकरांचा जय झाला. त्यांनी चिकोडी, मनोली हे तालुके आपल्या ताब्यात घेतले आणि महाराजांच्या मुलीशी जून १८०८ मध्ये लग्न केले. एवढे करूनही निपाणकर स्वस्थ बसले नाहीत. रत्नाकरपंत राजाज्ञा यांची सेवानिवृत्ती व तदनंतर सेनापती प्रीतीराव घोरपडे यांचे देहावंसान हे पाहून निपाणीकरांनी पुन्हा कोल्हापूर राज्यास उपद्रव देण्याचा कार्यक्रम पूर्ववत चालू केला. त्यांच्याजवळ फार मोठी फौज होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १८१८*
सन १८१८ मध्ये जनरल कीर याने निवती किल्ला ४ फेब्रुवारी रोजी जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ फेब्रुवारी १९४४*
चलो दिल्ली...
’चलो दिल्ली’चा नारा देत नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली 'आझाद हिन्द सेने'चे जपानहून दिल्लीकडे कूच.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...