महादजींचे दुःखद निधन व हिंदुस्थानातील इतिहासकारांच्या प्रतिक्रिया
महादजींचे दुःखद निधन व हिंदुस्थानातील इतिहासकारांच्या प्रतिक्रिया
जेष्ठ इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचा अभिप्राय
यदुनाथ सरकार यांचा अभिप्राय हा त्यांच्या हिंदुस्थानच्या अर्धशतकाच्या इतिहासाच्या अभ्यासानंतर बनलेला असून तो अत्यंत मार्मिक आहे. आपल्या टिपणीमध्ये ते म्हणतात की उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणात महादजी शिंद्यांचे प्रचंड सामर्थ्य प्रखरपणे झळकताना दिसते. या कामात त्याना भीषण संकटे अनुभवावी लागली. तथापि स्वतःची हिम्मत व परमेश्वरावर हवाला ठेऊन त्यांनी हा उद्योग केला आणि त्यांमध्ये यश मिळवले. स्वतःकडील उपजत अशी व्यवहारचातुर्यता वापरून त्यांनी अनेक लायक माणसे हाताशी धरली आणि मोठमोठाली कामे धूर्ततेने उरकली. पानिपतचे अपयश धुवून त्यांनी दिल्लीच्या बादशहाची व्यवस्था लावून दिली. महादजींनी पेशव्यांकरिता मोठमोठे मानमतराब मिळवले. ते पुण्यास पोचायला सात वर्षे लागली. उत्तर पेशवाईत हा एकच अलौकिक पुरुष इतर सर्वांवर छाप पाडणारा दिसतो. अमुक एक पक्षास न मिळता त्याने सातत्याने सत्याचा व न्यायाचा पुरस्कार केला. एकंदरीत
महादजींची योग्यता अलौकिक मानण्याजोगी आहे.
महादजींच्या भक्ती मार्गाबद्दल पुढे ते म्हणतात की भगवंताच्या भक्तीचा उमाळा त्याच्या अंतःकरणात सदैव उचंबळत असे. भजनपूजनात आपल्या सांसारिक विवंचना ते पार विसरून जात असत किंबहुना संकटकाळात हाच त्यांचा एकमेव आधार होता. श्रावणमासात ते भागवत ग्रंथाचे पारायण करीत आणि स्वतः भक्तिपर पदे रचून ती गात असत. साधूपुरुषावर त्यांची निःस्सीम भक्ती व श्रद्धा असून त्यांत हिंदू मुसलमान भेद अजिबात नव्हता. त्यांचा मुख्य गुरु बीड येथील मन्सूरशहा म्हणून होता. त्याच्याच कृपेने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त झाले अशी त्याची श्रद्धा होती. उज्जनीचा एक साधूपुरुष दत्तनाथ म्हणून होता. त्याच्यावर पण महादजीची श्रद्धा होती. दत्तनाथ साधू कैक वर्षे महादजीबरोबर स्वारीत असे. कवी, ज्योतिषी, सत्पुरुष हे कोठेही आढळले तर ते त्यांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला चुकत नसत. मन्सूरशहाच्या वास्तव्याचे गांव म्हणजे बीड हे निझामाच्या ताब्यात होते. हे गांव आपल्या ताब्यात असावे ही महादजीची तीव्र इच्छा होती. पण ती त्यांच्या जीवनांतापर्यंत पूर्ण झाली नाही.
महादजीच्या अंगी कोणताही दुराचार असल्याचा उल्लेख नाही. एव्हढेच नव्हे तर , तर उगाच खोटा प्रवाद ही ऐकिवात नाही. उत्तर हिंदुस्थान म्हणजे नैतिक गलिच्छतेचे माहेरघर. याठिकाणी उणेपुरे आयुष्य खर्च करणारे महादजी विदुरासमान निर्मळ राहिले. अप्पाजीसारखा कोकणस्थ ब्राम्हण, जीवबादादा व लखबादादासारखे निधड्या छातीचे सारस्वत वीर, अंबुजी इंगळे वगैरे शेकडो नामांकित मराठे सरदार, राणेखान भाईसारखे सर्वास सांभाळून नेणारे चतुर मुसलमान व डी बॉयन (De Boyan) सारखे परदेशस्थ सेनानायक अशा नानाविध पुरुषांचे प्रेम व आदर पन्नास वर्षाहून अधिक महादजी टिकवू शकले. असे महादजी स्वतः किती योग्यतेचे असले पाहिजेत याचा विचार केल्यावर त्यांच्याबद्दलचा आपला आदर द्विगुणित होतो.
इंग्लिश रेकॉर्डस् ऑफ मराठा हिस्टरीच्या प्रस्तावनेत सर यदुनाथ सरकार यांनी महादजीबद्दलचे जे गौरवोद्गार काढले आहेत, ते तत्कालीन इतिहासाला धरूनच आहेत. पुस्तकाच्या या भागात ब्रिटिशसत्तेचा उदयहोण्याआधी मोंगल आणि मराठे यांच्यातील सत्तासंघर्षावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या ठिकाणी सर यदुनाथ सरकार यांनी असे म्हंटले आहे की मे १७८२च्या सालबाईच्या तहानंतर मराठी सत्तेचा गुरुत्वमध्य हा उत्तरहिंदुस्तानात म्हणजे महादजी शिंदे यांच्याकडे सरकला होता. संपूर्ण भारताच्या इतिहासातील घडामोडीवर वर्चस्व राखणारा पुरुष म्हणजे महादजी शिंदे होत. आणि पुण्यातील मंत्रीमंडळ हे काही अंशी तेजोहीन झाले होते. त्याकाळात पुण्यातील सत्ताधाऱ्यानी नाही म्हंटले तरी १७८६ सालची टिपूविरुद्ध मोहिम चालवली, १७९० ते १७९२सालात कॉर्नवालिसला म्हैसूरच्या लढाईत साथ दिली, आणि १७९५मध्ये निझामविरुद्ध लहानशी कामगिरी केली. पण मराठासत्तेचे प्रभुत्व उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणात महादजी शिंदेमुळे वाढतच गेले आणि त्याची परिणीती म्हणजे दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या पदराखाली घेतले गेले(१७८८). सत्तेचा लंबक महादजीकडे झुकला होता.सालबाईच्या तहाच्या १६व्या कलमात ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे या दोघांनी ही महादजी शिंदे याना तहातील कलमांची अंमलबजावणी करण्याची हमी घेण्याची जबाबदारी दिली होती. यावरून महादजींचे राजकारणातील वाढते प्रभुत्व दिसून येते. १७८५ ते १७९४ या कालखंडातील दिल्लीचा कारभार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सांभाळणारा एकमेव पुरुष म्हणजे महादजी शिंदे होत.
(सर यदुनाथ सरकार यांच्या संदर्भ पुस्तकातील इंग्रजीतील टिपणीचा स्वैर अनुवाद)
(आपल्या महादजी शिंदे यांच्यावरील आगामी ग्रंथातून घेतलेला उतारा.
८ फेब्रुवारी २०२३)
With thanks
Pramod Karajagi
Comments
Post a Comment