बाजीराव पेशव्यांचे शिंदे, होळकर आणि पवारांसह प्रमुख 46 सरदार. पैकी 32 मराठा, आठ ब्राह्मण, तीन मुसलमान, दोन धनगर. अस्सल संपूर्ण यादी ! - विश्वास पाटील
बाजीराव पेशव्यांचे शिंदे, होळकर आणि पवारांसह प्रमुख 46 सरदार. पैकी 32 मराठा, आठ ब्राह्मण, तीन मुसलमान, दोन धनगर. अस्सल संपूर्ण यादी !
- विश्वास पाटील
जातीने ब्राह्मण, वृत्तीने बेदरकार, कृतीने सर्वसमावेशक आणि अवघे जीवन रणांगणावर घालवलेल्या बाजीरावाने सातारकर शाहू महाराजांच्या आशीर्वादाखाली काम करताना निवडलेल्या सरदारांची यादी मोठी वेधक आणि आजही अनेकांना विचार करायला लावणारी आहे. मस्तानीच्या फिल्मी गोष्टी पल्याड ह्या योद्धाची जीवन कहानी आणि कर्तबगारी खूप उंच आहे.
तर पाहूयात बाजीराव साहेबांचे प्रमुख सरदार .
1 सुभेदार मल्हारराव होळकर_ सतराशे एकवीसमध्ये पेशवाईत प्रवेश. सन1725 मध्ये बाजीरावानी त्यांना 500 स्वारांची सरदारी पहिल्यांदा दिली. पुढे 1729 सप्टेंबर पासून माळवा प्रांतातल्या वसुलीचा 30 टक्के वाटा त्यांना देऊ केला.
2. राणोजी शिंदे __हे प्रथम बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे खाजगी सेवक खिजमतगार होते. नंतर त्यांना बारगिरी मिळाली. पुढे 1724 मध्ये बाजीराव पेशव्यांनी त्यांना सरदारी दिली. 1729 मध्ये त्यांना माळवा प्रांतातल्या वसुलीचा 30 टक्के वाटा मिळाला.
3. आनंदराव पवार (धार शाखा ) उदाजीराव पवारांना बाजीरावांनी माळवा प्रांताची मुखत्यारी दिली होती. त्यांच्याशी बीनसल्यावर 1732 मध्ये त्यांचे धाकटे बंधू आनंदरावांना बाजीरावांनी माळव्यामध्ये सरंजाम दिला.
4. यशवंतराव पवार (धार ) आनंदराव जून 1736 मध्ये वारल्यावर बाजीरावांनी त्यांचे पुत्र यशवंतरावांना ऑगस्टमध्ये त्यांच्या वडिलांचा सरंजाम दिला.
5 तुकोजी व जिवाजीराव पवार (देवास शाखा) पालखेडच्या लढाईत या दोघा पवार बंधूंनी तलवार गाजवली. 1731 मध्ये बाजीरावांनी त्यांना माळव्यातील वसुलाचा सात टक्के वाटा व सरंजाम दिला.
6. पिलाजीराव जाधव. बाळाजी विश्वनाथनाथाकडे ते
आरंभी शिलेदार होते. त्यांच्याच काळात त्यांना सरदारी मिळाली. बाजीराव त्यांना आदराने नेहमी काका असे म्हणत. शाहू महाराजांनी त्यांना वाघोली गावची जहागीरी व औरंगाबाद प्रांतातील दीड लाख रुपये उत्पन्नाचे नऊ मोकासे दिले होते.
7 आवजी कवडे. बाजीराव आणि चिमाजी आप्पांच्या पदरी असलेला अत्यंत साहसी सरदार. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा महिपतराव कवडे याला पेशव्यांनी सरदारी दिली.
8. खंडोजी मानकर . हे कोकणातील मूळचे खरबली गावचे मराठा धाडसी योद्धा. बाजीरावांच्या खास विश्वासातील भरवशाचा सरदार. पुढे यांनी चिमाजी आप्पांसोबत वसईची मोहीम गाजवली.
9. नागोजीराव पाटणकर. उपनाव साळुंखे. सातारा जिल्ह्यातील पाटणचे रामराव पाटणकरांचे सुपुत्र. जेव्हा बाळाजी विश्वनाथ सोळाशे सतराअठराच्या दरम्यान दिल्लीच्या स्वारीवर गेले होते. जेव्हा त्यांनी येसूबाई आणि दुर्गावती राणीसाहेब तसेच इतर राजस्त्रियांना सोडवून आणले. त्या मोहिमेत नागोजीराव सोबत होते.
10. मानाजी बिन कृष्णाजी पायगुडे. मूळचे अंगनेळचे देशमुख. सन1734 मध्ये मानाजी हे बाजीरावांच्या उत्तरेच्या मोहिमेवर होते. त्यांनी दिल्लीच्या बाजीरावांच्या स्वारीत शर्तीचा पराक्रम करून दाखवला होता.
11. सोनाजीराव भापकर. हे लोणी गावचे पाटील. बाजीरावांच्या बरोबरीचे मानी मराठा सरदार. पुढे पानिपतच्या युद्धात ते शहीद झाले.
12. बाजी भीमराव रेठरेकर. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे त्यांचे गाव. बाजीरावांना अनेक देशस्थ ब्राह्मण सरदार मंडळींचा विरोध असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणारे एक देशस्थ ब्राह्मण सरदार. 1736 मध्ये बुंदेलखंडात तलवार गाजवली.कोकणात पोर्तुगीजांकडून तारापूरचा किल्ला जिंकताना 24 जानेवारी 1739 मध्ये ते मृत्युमुखी पडले.
13. गंगाधर उर्फ गंगोबा तात्या चंद्रचूड. मूळचे खेड तालुक्यातील निंबगावचे. त्यांची हुशारी पाहून बाजीरावांनी त्यांना मल्हाररावांची फडणीशी सांगितली. पुढे ते होळकरांचे दिवाण सुद्धा झाले.
14.विठ्ठल शिवदेव विंचुरकर. यांना बाजीरावांनी शाहू महाराजांच्याकडून मागून घेतले. उत्तरेच्या मोहिमेवर 1727 मध्ये बाजीरावांनी त्यांना दहा हजाराची फौज धारण करण्याची सरदारी बहाल केली.
15. सरदार शितोळे अंकलीकर. हे घराणे मूळ शाहू महाराजांच्या पदरी होते. बाजीबा शितोळे वारल्यावर यांचे पुत्र सुलतानजी, आप्पाजी, खेत्रोजी आणि महादजी यांना घेऊन बाजीराव शाहू महाराजांपुढे दाखल झाले. त्यांना सरदारी मिळाली. सुलतानजी व अप्पाजी यांना शाहू महाराजांनी अर्धा मांजरी गाव दिला. 1725 मध्ये पूर्ण अंकली हा गाव या मंडळींना इनाम मिळाला. डब्इच्या लढाईत शितोळे दाभाडे यांच्या विरोधात व बाजीरावांच्या बाजूने लढले होते.
16. अंताजी माणकेश्वर गंधे. हे तत्कालीन निजाम प्रांतातील कामरगावचे कुलकर्णी. नंतर सासवडला राहायला आले. आरंभी शाहू महाराजांच्या सेवेत अंताजी होते. नंतर पेशव्यांच्या सेवेत. उत्तर हिंदुस्थानातील राजकारणात यांचा मोठा दबदबा होता.
शिवाय पेशवे दप्तर खंड 30 यादी क्रमांक 311 मध्ये बाजीरावांच्या सैन्यात असलेल्या ज्या सरदारांची नावे दिलेली आहेत. त्यातील उल्लेखनीय सरदार खालील प्रमाणे.
जावजी ढमढेरे
खंडोजी खोमणे
राणोजी भोसले
संभाजी गाढवे
महादजी गाढवे
शेख अहमद
मोहम्मद बेग
आप्पाजी माणकेश्वर
जानोजी भोसले
मानाजी वाघ
संताजी निंबाळकर
सटवोजी भोसले
संताजी चितळकर
संताजी धायबर
येदाजी सतकर
शिवाय पालखेडच्या लढाईत लढलेल्या बाजीरावांच्या सोबतच्या सरदारांची यादी खालील प्रमाणे
भिवजी काकडे, संताजी व महादजी नाईक निंबाळकर, काळोजी भोसले, महादजी घाटगे, शेख मोहम्मद शफी, रघोजी कदम, दौलतराव शिर्के, संताजी आठले, शिघोजी थोरात, दुर्गोजी भोईटे , निळकंठराव जाधव, दुर्गुजी महाडिक, पदाजी कारके, माणकोजी बंडगर.
श्रीमंत शाहू छत्रपती सातारकर यांच्या आशीर्वादाने बाजीरावांच्या कालखंडात मराठा साम्राज्याची वृद्धी झाली. ग्वाल्हेर, धार, बडोदा इंदोर असे मराठा साम्राज्य खूप दूरवर पसरले.
सतत युद्धभूमीवर व छावणीमध्ये जीवन घालवलेले बाजीराव यांचे व्यक्तिमत्व जितके करारी, शौर्यपूर्ण होते, तितकेच ते रांगडे होते. मराठा व बहुजन
समाजाच्या सरदार वर्गात त्यांना मांसाहारही आवडायचा. स्वभावात खोडकरपणाही खूप होता. त्यामुळे चिमाजीआप्पा चिडतात म्हणून त्यांच्यासमोरच आपल्या सेवकांना कोंबडीचा बंदोबस्त करा असे मुद्दाम ते आदेश देत असत.
बाजीरावांचे दुर्दैव असे की, त्यांच्या काळात श्रीवर्धनच्या कोकणस्थ भट घराण्यास पुण्याची पेशवाई मिळाली म्हणून घाटावरचा ब्राह्मणवर्ग सुद्धा त्यांचा खूप द्वेष करत असे. मस्तानी प्रकरणाचा या मंडळींनी फायदा घेऊन तिच्या नावे बाजीरावांचा मानसिक छळ सुद्धा खूप केला होता.
पुण्याच्या विस्तारा विकासामधील बाजीराव
पेशव्यांचे ऐतिहासिक काम हा एका स्वतंत्र निबंधाचा विषय आहे. माझे मित्र कादंबरीकार श्री काका विधाते यांनी बाजीरावांच्यावर “ देवयोद्धा” नावाची सुमारे तीन हजार पानांची बृहत अभ्यासपूर्ण कादंबरी लिहिली आहे. वाचकांनी ती जरूर वाचावी.
कर्तबगार राजकारणी पुरुष एकावेळी अनेक स्त्रियांच्या मोहात असतात.. किंवा अनेक फुलपाखरे अशा कर्तबगार भुंग्या भोवती फिरत राहतात. हे मौर्य काळापासून चालत आले आहे. आज सुद्धा भारतातील अनेक कर्तबगार राजकारण्यांची प्रकरणे लोकांना माहीत असतात. जनता बोलत नाही इतकेच. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून अनेकांनी इश्काच्या तळ्यामध्ये मनसोक्त विहार केला आहे. त्यामुळे केवळ मस्तानीच्या नावे बाजीरावांचे विशाल कर्तृत्व विसरणे योग्य वाटत नाही.
.... विश्वास पाटील
#VishwasPatil #authorvishwaspatil #BajiraoPeshwa #marathaempire #WarriorKing #peshwahistory #greatmaratha #MarathaGlory #PeshwaBajirao #historicalfacts #indianhistory #बाजीरावपेशवे #मराठेसाम्राज्य #पेशवाई #मराठायोद्धा #इतिहास #शौर्यगाथा
Comments
Post a Comment