सातारा जिल्हा किल्ले ब्लॉग नंबर 24 किल्ले सुभानमंगळ
आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल. महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला.
पहाण्याची ठिकाणे
नीरा नदीकाठी सुभानमंगळ किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सुभानमंगळ किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघाने किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. किल्ल्याची निशाणी असलेला एकमेव बुरुज आज षिल्लक आहे. बुरुजाजवळ असलेल्या दुर्गा देवीचे मुख पूर्वेला आहे. बुरुजावर भगवा झेंडा आहे. आपण किल्ल्यावर दुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला दोन वीरगळी पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पायवाट असून फेरी मारल्यास नीरा नदीचे विहंगम दृश्य पाहता येते. किल्ल्यावर असलेल्या दाट झुडूपानमूळे किल्ल्याचा परिसर झाकला गेला आहे. ऐतिहासिक शिरवळ हे धार्मिक स्थान असावे केदारेश्वर मंदिर, अंबिका मंदिर, भैरवनाथ मंदिर, मंडाईदेवी मंदिर आणि रामेश्वर मंदिर अशी वैविध्याने नटलेली मंदिरे पाहायला मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा
पुण्याहून स्वारगेट एस. टी. स्थानकातून कराड- साताराला जाणार्या एस. टी. ने शिरवळला पोहचता येते. बसने शिरवळ बस स्थानकात उतरून पुण्याच्या दिशेने १ किलोमीटर चालत गेल्यास डाव्या बाजूला केदारेश्वर मंदिर आणि उजव्या बाजूला शिरवळचा राजा मंदिर पाहून ब्राह्मण गल्लीतून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. वाट गावाच्या मध्य भागातून आणि बाजारपेठेतून जाते. किल्ल्याच्या समोरच प्रगती मुलींची शाळा आहे.
राहाण्याची सोय
राहण्याची सोय शिरवळ मधील हॉटेल मध्ये होऊ शकते.
जेवणाची सोय
जेवण्याची सोय आपण स्वतः करावी.
Comments
Post a Comment