कर्मवीर धर्मवीर अनंत दिघे


ठाण्यात ज्याचे भरत होते दरबार काळानुरूप ठाणे बदलले आणि नेतेही....आज ही आनंद दिघे हे आजही त्याच जनमान्यता असलेले नाव महाराष्ट्र आजही विसरला नाही.

ठाण्यात ज्याचे त्याचे दरबार ;काळानुरूप ठाणे बदलले आणि नेतेही

ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील ती गर्दी…बाहेर असणारा चपलांचा ढीग, पहाटे 4 वाजेपर्यंतची लोकांची वर्दळ आणि गोरगरिबांना मिळणारा न्याय..  हे चित्र आता दिसेनासे झाले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर आता ‘आनंद आश्रमा’त सन्नाटा पसरलेला असतो. आनंद दिघे हयात असताना दररोज पायघड्या घालणारे पदाधिकारी, नगरसेवक आणि नेतेमंडळी त्यांच्या मृत्यूनंतर क्वचितच फिरकताना दिसतात. त्यामुळे ‘आनंद आश्रम’ ओस पडला आहे.

दिघेंच्या अपघाती मृत्यूनंतर ठाण्यात आता प्रत्येकाचा स्वत:चा दरबार भरू लागला आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेत आनंद दिघे यांचे वास्तव्य असलेल्या त्यांच्या निवासस्थानी, टेंभीनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी झाली होती. मात्र या गर्दीत आनंद दिघेंना भेटायला आणि गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला येणारा सर्वसामान्य शिवसैनिक दुर्मिळ होता. त्यामुळे आनंद दिघेंचा दरबार बंद झाल्यानंतर आता केवळ गुरुपौर्णिमेची औपचारिकताच उरल्याची खंत ठाण्यातील जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.

26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला. आनंद दिघे यांच्या मृत्यूविषयी आजही तर्कवितर्क लढवले जात असले तरी त्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र हळहळला होता. या घटनेला आता 17 वर्षे उलटली. मात्र शिवसैनिकांच्याच नव्हे तर ठाणेकरांच्या मनात त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आनंद दिघे या पाच अक्षरी नावाने ठाण्यातच नव्हे तर राज्यात एक दबदबा निर्माण केला होता. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील ‘आनंद आश्रम’ हा केवळ शिवसैनिकांसाठी नव्हे, तर सर्वसामान्य ठाणेकरांसाठीही न्यायमंदिर होते. त्यामुळे कोणतीही समस्या घेऊन आनंद आश्रमात आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य उमटूनच ते बाहेर पडत. आता मात्र हे सगळं चित्र लुप्त झाले आहे.

आनंद आश्रमात आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके निष्ठावान शिवसैनिकच हजेरी लावताना दिसतात. आनंद दिघेंनी ठाणे जिल्ह्यात अनेक शिष्य घडविले, ते पुढे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झालेत. सर्वसामान्य ठाणेकरांनी दिघेंना देव्हार्‍यात बसवले. पण पक्षातील नेतेमंडळींना त्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आनंद आश्रमात नेते अभावानेच दिसतात. त्यामुळे आनंद आश्रम ओस पडला आहे.  निवडणुका आल्या की, दिघेंच्या नावाचा वापर करून, बॅनरवर त्यांचा फोटो लावला जातो, असा आरोप नेहमीच केला जातो. त्यामुळे दिघेप्रेमींमध्ये आजही नाराजीची भावना आहे. दिघे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असत, ते उपक्रमही बंद झाले आहेत.

ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आणि त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’ आणि ठाण्याची ‘शिवसेना’अशी या शहराची राजकीय ओळख निर्माण झाली. यात दिघेंचा वाटा मोठा आहे. ठाणे जिल्ह्यात 90 च्या दशकात शिवसेना तळागाळात रुजवण्याचे काम दिघे यांनी केले. या शहरावर दिघेंची निर्विवाद हुकूमत होती. ज्या टेंभीनाक्यावरून दिघेंनी सर्वसामान्य माणसांना शिवसेनेकडे आकर्षित केले,  त्या आनंद आश्रमाकडे मात्र सर्वांनीच पाठ फिरवल्याची खंत ज्येष्ठ शिवसैनिकांनी बोलून दाखवली.

बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांच्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही. दिघे साहेबांची जयंती असो, पुण्यतिथी असो, त्यांनी सुरू केलेले उत्सव, टेंभी नाक्यावरील कार्यक्रमाला प्रत्येकजण हजेरी लावतोच. एकनाथ शिंदे यांना जेवढा वेळ जाता येईल, तेवढा वेळ ते देत असतात. पूर्वीचे ठाणे आताचे ठाणे यात बदल झालाय. पूर्वी एक आमदार होता. आता चार आमदार आहेत. ठाणे जिल्ह्याला एक खासदार होता. आता ठाणे-पालघर जिल्ह्याचे चार खासदार झाले. त्यामुळे प्रत्येकाचे स्वतंत्र कार्यालय असल्याने तेथे लोक भेटायला येतात. काळानुरूप ठाणे बदलले आणि नेतेही बदलले. त्यांची कार्यक्रम करण्याची पध्दतही बदलली. टेंभीनाक्यावर जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा जात असतो. त्यामुळे दुर्लक्ष झालं अस म्हणता येणार नाही असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या संदर्भात एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. मात्र त्यांंच्या कार्यालयातून आठवड्यातून शिंदे साहेब दोन-तिनदा आनंद आश्रमात जातात. लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी सोडवतात, असे सांगण्यात आले.

मंत्री झाल्यानंतर वेळ मिळेना आठवड्यातून दोन ते तीन वेळा जातात

एकनाथ शिंदे हे मंत्री नसताना आनंद दिघे यांच्या दरबारात रोज दुपारी 2.30 ते 6 आणि रात्री 11 ते 2 या वेळेत यायचे. पण मंत्री झाल्यामुळे त्यांना व्यस्त वेळापत्रकामुळे रोज येता येत नाही. मात्र वेळात वेळ काढून ते आताही येण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती आनंद आश्रमात काम करणार्‍या व्यक्तीने दिली.

दर रविवारी जातो, पक्षाच्या बैठका तेथेच होतात

आनंद दिघेसाहेबांविषयीचे प्रेम,सर्वांच्या मनात कायमच आहे. मी दर रविवारी जातो. पक्षाच्या बैठका तेथेच होतात. प्रत्येकाची वॉर्डावॉर्डात स्वतंत्र कार्यालये आहेत. त्यामुळे स्वतंत्र दरबार भरतो असे म्हणता येणार नाही.                           – नरेश म्हस्के

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४