राजर्षी शाहू छत्रपती महाराज *युवकांनी आदर्श घ्यावा असा महापुरुष.. लोकराजा_____________________

~~~~~●◆■◆●~~~~~

*राजर्षी शाहू छत्रपती महाराज *
युवकांनी आदर्श घ्यावा असा महापुरुष.. लोकराजा
_____________________

आपल्या व्यक्तिमत्वाला प्रयत्नांची पराकाष्ठा करत पैलू पाडण्यात महापुरुष यशस्वी होतात म्हणूनच त्यांचं आयुष्य एखाद्या हिऱ्यासारखं अनमोल होतं. राजर्षी शाहू छत्रपती हे सुध्दा असेच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक सद्गुणांचा संचय केलेले महापुरुष. कोल्हापूर राज्याला आणि बहुजन समाजाला सर्वच क्षेत्रात अग्रभागी आणण्यासाठी झटलेल्या या राजानं एवढं प्रचंड कार्य करुन ठेवलंय की, आजही समाजातील सर्वच घटकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करायला हवी. विशेषतः आजच्या युवापिढीनं शाहू महाराजांच्या काही सद्गुणांचा स्विकार करायलाच हवा.

या सद्गुणांपैकीच एक महत्त्वाचा गुण म्हणजे नियमित व्यायामाने घडवलेली  बलदंड आणि सुदृढ शरीरसंपदा. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील युवापिढी सुदृढ व्हावी, त्यांना व्यायामाची आवड लागावी यासाठी आपल्या राज्यात अनेक तालमी स्थापन केल्या. या तालमीत व्यायाम करणाऱ्या मल्लांना राजाश्रय देऊन त्यांच्या खुराकाची, जेवणाची, निवासाची सारी व्यवस्था महाराजांनी केली. या पैलवानांना कुस्तीचे धडे देणारे वस्ताद, खुराक तयार करणारे, जेवण बनवणारे सवळकरी, मालीश करणारे लोक अशा सर्वांच्याच उदरनिर्वाहाची सोय महाराजांनी लावून दिली. कोल्हापूरच्या पेठा-पेठात आणि आजूबाजूच्या खेडेगावात तरण्याबांड पोरांचे शड्डू घूमू लागले. कोल्हापूरची एक अख्खी पिढीच्या पिढी शारीरिकदृष्ट्या संपन्न बनली, बरेच नामवंत मल्ल कोल्हापूरात तयार झाले आणि कोल्हापूरची ख्याती 'कुस्तीची पंढरी' म्हणून संपूर्ण भारतात पसरली.

'पहिली शरीर-संपत्ती, दुसरी पुत्र-संपत्ती आणि तिसरी धन-संपत्ती असेल तोच पुण्यवान.' हा शाहू महाराजांनी स्वतःच्या हाताने मोतीबाग तालमीवर लावलेला फलक त्यांच्या आयुष्यातील व्यायामाचे महत्त्वच जणू विशद करत होता.
शाहू महाराज हे स्वतः एक कसलेले मल्ल होते. दत्तोबा शिंदे, बालेखान वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सरावाने त्यांनी कमावलेली धिप्पाड शरीरयष्टी बघून समोरच्या व्यक्तीवर प्रथमदर्शनीच शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडे.

'राजाने कुस्तीच्या फंदात पडू नये. कुस्तीसारखे खेळ म्हणजे गरीबांची कामं. तेव्हा घराण्याला काळीमा फासणारे असे डोंबारी खेळ महाराजांनी करु नयेत.' असे महाराजांच्या काही आप्तेष्टांचे मत होते. महाराजांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर हे त्यापैकीच एक. मामासाहेबांच्या या विरोधाला उत्तर देताना महाराज त्यांना म्हणाले, 'राजाची जागा म्हणजे सुळावरची पोळी. त्यात मी पडलो 'छत्रपती' ! छत्रपतीला शत्रू फार. स्वकीय तसेच परकीय. ते केंव्हा काय करतील याचा नेम नाही. आमचे दत्तक पिताजी शिवाजी महाराज यांना वेडा ठरवून सार्जंट ग्रीन या नरपशूने दाबून, कुचलून, गुद्दे लगावून त्यांस ठार केले; तेंव्हा कोणत्या राज्यकर्त्यावर केंव्हा कसा प्रसंग येईल याचा काय नेम ? म्हणूनच  मी तालीम करतो. पैलवानांबरोबर लढत देतो. कारण एकच, एका ग्रीनसारखे चारदोन नरपशू जरी माझ्या अंगावर आले तरी त्यांचा चुरा करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी यावे. मैदानी व मर्दानी खेळांची आवड मी प्रजेमध्ये सुरू करत आहे. कोणी सांगावे आपल्यावर परचक्र केंव्हा येईल ते ! '
या महाराजांच्या उत्तरावरुनच महाराजांच्या बलोपासनेचा हेतू कसा योग्य होता हे सहज समजून येते.

शरीरसंपदेबरोबरच मनुष्याला प्रगती साधायची असेल तर शिक्षित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे याची महाराजांना जाणीव होती. आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी शिक्षणाची गंगा समाजाच्या तळागाळापर्यंत नेली. कोल्हापूरात वसतीगृहांची श्रृंखला उभारुन महाराजांनी कोल्हापूरला 'वसतीगृहांची जननी' बनवले. या वसतीगृहांना भरघोस देणगी, जमिनी देऊन महाराजांनी त्यांचे आर्थिक गणित जुळवून दिले. आसपासच्या खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे या वसतीगृहांनी उघडून दिली. या वसतीगृहातून घडलेले अनेक तरुण आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचले. शिक्षणाचे महत्त्व विशद करताना आपल्या एका भाषणात शाहू महाराज म्हणतात, 'शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बूडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.'
रयतेच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे शाहू महाराज स्वतः मात्र सुरवातीच्या शालेय जीवनात अत्यंत लाजाळू असून त्यांची शालेय प्रगती मंदगतीने होत असल्याचा निष्कर्ष महाराजांच्या तत्कालीन शिक्षकांनी काढला होता. पण महाराजांनी विशेष परिश्रम घेऊन लक्षणीय प्रगती करत आपले शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 
आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी आपल्या विरोधकांना दिलेली धोबीपछाड म्हणजे शरीरसंपदे इतकेच परिश्रम महाराजांनी बौध्दिक प्रगती साधण्यासाठी केले होते याची जणू साक्षच आहे.

रांगडी देहबोली आणि बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे महाराजांच्या विद्वत्तेविषयी लोकांचा चुकीचा समज होत असे. समोरचा माणूस जर स्वतःच्या सुशिक्षितपणाचा गर्व बाळगणारा असेल तर महाराज गावंढळ बोलण्याचं नाटक जाणूनबुजून करत पण त्यांची बुध्दी कुशाग्र होती. वाचनही प्रचंड होतं. त्यांच्या या चौफेर वाचनाची प्रचिती एकदा प्रबोधनकार ठाकरे यांना आली. प्रबोधनकार आणि महाराज बोलत बसले असताना प्रबोधनकार 'भिक्षुकशाहीचे बंड' हे पुस्तक लिहीत असल्याचं महाराजांना समजलं. या लेखनासाठी संदर्भ म्हणून महाराजांनी विदेशातील बर्‍याच पुस्तकांची नावे त्यांना सुचवली. त्या पुस्तकांमध्ये नेमका काय आशय आहे हे सुध्दा ते तळमळीने सांगत होते. या पुस्तकांमधील  काही परिच्छेद तर महाराजांनी पाठ असल्यासारखे म्हणून दाखवले. महाराजांच हे एक वेगळं रुप बघून प्रबोधनकारही आश्चर्यचकीत झाले.

शाहू महाराज एका संस्थानाचे अधिपती होते. सुखसमृध्दी त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. पण ते ज्या राज्याचे उत्तराधिकारी होते ते राज्य शिवछत्रपती आणि ताराराणींच होतं याची महाराजांना जाणिव होती. 'शिवाजी महाराजांच्या नावाला आणि गादीला बट्टा लागेल असे वर्तन माझ्याकडून कदापि घडणार नाही.' असे ते म्हणत. आणि म्हणूनच इतर अनेक संस्थानिक आपले शौक जोपासत विलासी जीवन जगत असताना राजर्षी शाहू महाराज मात्र प्रजेचा 'उपभोगशून्य स्वामी' होऊन त्यांच्या कल्याणासाठी झटत होते. राजर्षी शाहू महाराज आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणत्याही व्यसनाच्या अधीन गेले नाहीत. पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारु यापैकी एकही व्यसन त्यांना न्हवते. दारुविषयी आणि दारु पिणार्‍यांविषयी तर त्यांना प्रचंड चिड होती. दारुचे व्यसन असणाऱ्यांना तर ते जाणूनबुजून आपल्यापासून दूर ठेवत. महाराज एकदा चिंचली भागात शिकारीला गेले असताना त्यांना अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करत असताना महाराजांचा अशक्तपणा कमी व्हावा व थोडी ताकद येण्यासाठी औषधात थोडी दारु उत्तेजक म्हणून घ्यावयास दिली. महाराजांना वासानेच यात दारु असल्याचा संशय आला. त्यांनी डॉक्टरांना विचारले, दारु असल्याचे समजताच तो औषधाचा पेला लगेच दूर केला आणि म्हणाले,'एवढीशी जरी पोटात गेली तरी त्याची चट लागेल आणि माझ्या आयुष्याचे मातेरे होईल.'

राजर्षी शाहू महाराजांनी तरुण वयात व्यसनांना दूर ठेऊन, नियमित व्यायाम करत परिश्रमपूर्वक शिक्षण घेतले, वाचनाची आवड जोपासत स्वतःचे व्यक्तीमत्व घडवले आणि रयतेच्या कल्याणाचे व्रत स्विकारुन इतिहास घडवला. म्हणूनच छत्रपती शाहू महाराज लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे "लोकराजा" ठरले. आजच्या युवापिढीने सुध्दा शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वातील हे गुण अंगिकारुन आपले मन, मनगट आणि मस्तक सशक्त केले तर शाहू महाराजांना अभिप्रेत असलेली देशाची उन्नती निश्चितपणे होऊ शकेल.

- इंद्रजीत माने

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...