योगिनी एकादशी.■ ज्येष्ठ वद्य ११,शके १९४४.________________
■ योगिनी एकादशी.
■ ज्येष्ठ वद्य ११,शके १९४४.
________________
पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतींचे तुका म्हणे ॥३॥
■
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
■
शब्दार्थ:
कल्पांतींचे-कल्पाचा अंत होण्याच्या वेळचे.
■
अर्थः माझ्या कुळामध्ये चालत आलेली पंढरपूरची वारी आहे यामुळे मी कोणतेच इतर व्रत करीत नाही तीर्थयात्राही करीत नाही.॥१॥
एकादशी व्रत करून त्या दिवशी उपास करतो आणि रात्रंदिवस मुखाने श्रीहरीचे नाम मी गातो.॥२॥
तुकोबा म्हणतात, कल्पाचा अंत होण्याच्या वेळचे शिल्लक राहणारे विठ्ठलाचे नाम मी वाणीने सतत घेत असतो.॥३॥
■ विवरण :
◆ या अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्या कुळात कोणकोणते दैवत महत्त्वाचे व कोणती प्रथा प्रमख यांचा निर्देश केला आहे. तुकोबांच्या कुळाचे दैवत श्रीविठ्ठल व कुलाचार म्हणजे एकादशी व्रत.
◆ मुखाने अखंडपणे नामस्मरण करणाऱ्या श्रीहरीच्या भक्तीचे हे रोप, तुकोबांच्या घरात त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यांनी रोविले. स्वत:च्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी पंढरीची वारी पत्करली . कार्तिकापासून ज्येष्ठापर्यंत त्यांनी पंढरपुराच्या दर एकादशीस याप्रमाणे सोळा वाऱ्या केल्या.
◆ मार्गशीर्ष महिन्याच्या अष्टमीस रात्री विश्वंभरबुवांच्या स्वप्नात श्रीविठ्ठल आले व त्यांनी ' आपणच देहूस येतो' असे सांगितले, आंबियाच्या वनात त्यांनी त्याप्रमाणे शोध घेतला. बुक्का व तुळशी यांचा सुवास जेथे सुटला होता ती जागा शस्त्र न लावता त्यांनी खणायला सुरुवात केली त्यावेळी बुक्का व तुळशी अधिकच निघू लागल्या. शेवटी त्यांना श्रीपांडुरंग व रुक्मिणी यांच्या सुबक मूर्ती येथे सापडल्या. या मूर्तीची यथाविधी स्थापना झाली व तिच्यापुढे भजनकीर्तन सुरू झाले. अशा रीतीने कुळात पूर्वीपासून चालत आलेल्या वारीतून भगवंताचे निवासस्थान देहूत निर्माण झाले.
जयजय राम कृष्ण हरी.
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे,
काय म्या पामरे जाणावे हे
– संत तुकाराम
.....................................................
महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष श्री जगतगुरू संत तुकाराम महाराज
यांना विनम्र प्रणाम !
बोला पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.....
पंढरीनाथ महाराज की जय.....
.....................................................
http://tukaram.com/marathi/gatha/default.htm
Comments
Post a Comment