शस्त्रचित्रं'

🛑 शस्त्रचित्रं'

            भारतीय मूर्तीशास्त्रामध्ये विविध देवी-देवता, अन्य पौराणिक संकल्पना यांसाठीची ‘शिल्पलक्षणे’ सांगितलेली आहेत. म्हणजेच, एखादी विशिष्ट मूर्ती घडवताना ती कशाप्रकारे बनवावी? याचे ‘criteria’ सांगितलेले आहेत. त्यामुळे परंपरागत लक्षणशास्त्रानुसार अशा मूर्ती आपल्याला सहज ओळखता येतात. ज्याप्रमाणे या मूर्त्यांची एक परंपरागत ‘symbology’ तयार झालेली आहेत, अगदी तशीच symbology परंपरागत घडण, वापर, धारणा यांमधून भारतीय शस्त्रांचीही तयार झालेली आहे. उदाहरणार्थ, ‘तलवार’ म्हटल्यावर लांब-वक्र पाते, एक मूठ, ‘कट्यार’ म्हटल्यावर त्रिकोणी दुधारी पाते, उभट पकड याच रचना नजरेसमोर येतात. शतकानुशतकांच्या मौखिक, लिखित आणि उपायोजित (applied, प्रत्यक्ष वापरातून) स्रोतांमधून शस्त्रांच्या रचनांचे, आकारांचे हे निकष दृढ होत आलेले आहेत. अमुक एका शस्त्राला ‘तलवारच’ का म्हणतात? किंवा हे शस्त्र ‘तलवार’च कशामुळे आहे? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्राचीन, मध्ययुगीन लिखित संदर्भांमधील शस्त्रवर्णने, शस्त्रांची विविध प्रांतांमध्ये असलेली मौखिक ओळख (पारंपरिक युद्धकला, शस्त्र बनविणारे कारागीर यांच्याकडील मौखिक माहिती), परकीयांनी केलेल्या नोंदी अशा अनेक संदर्भांचा आधार घेतला जातो. याच संदर्भांमध्ये उपलब्ध मध्ययुगीन शस्त्रचित्रांचाही (म्हणजे ज्यामध्ये शस्त्रांची चित्रणे आहेत - युद्धचित्रे, संदर्भग्रंथ, हस्तलिखिते) आधार घेतला जातो.
          भारतीय शस्त्रांच्या अभ्यासातली सगळ्यात मोठी दोन आव्हानं म्हणजे - विस्तृत लिखित संदर्भ उपलब्ध नसणं आणि उपलब्ध संदर्भांमध्ये शस्त्रांची वर्णने, रेखाचित्रे (illustrations) नसणं. आपल्याकडच्या प्राचीन ग्रंथांमध्ये शस्त्रांची नावे तर सापडतात, पण त्यांची विस्तृत वर्णने मात्र फार क्वचित आढळून येतात. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये शस्त्रांच्या चित्रांचे प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळे हे ग्रंथ संदर्भांसाठी अभ्यासताना उपलब्ध शस्त्रांशी त्यांची सांगड घालणे, त्यांना ‘relate’ करणे अवघड होऊन बसते. मध्ययुगीन भारतातल्या ‘ऐन-इ-अकबरी’ सारख्या तुरळक ग्रंथांचे अपवाद वगळल्यास समकालीन ग्रंथांमध्ये शस्त्रांची चित्रणे दिसून येत नाहीत. शस्त्रांची मध्ययुगीन चित्रणे सापडल्यास त्यांची समकालीन नावे, रचना, प्रकार, प्रकारांचे निकष (आकार, रचना, वापर) अशा अनेक महत्वपूर्ण पैलूंचा अभ्यास करता येतो. असेच एक उदाहरण राजस्थानमधील हस्तलिखिताचे देता येईल .     
          पोस्टसोबत जोडलेले चित्र हे सतराव्या शतकाअखेरच्या राजस्थानमध्ये लिहिल्या गेलेल्या हस्तलिखितामधील आहे. या हस्तलिखिताचे अन्य तपशील ज्ञात नसले तरीही त्यामधील रेखाचित्रांचे हे पान रोचक आहे. या पानावर दोन भागांमध्ये मध्ययुगीन भारतात प्रचलित असलेल्या विविध शस्त्रांची तसेच अस्त्रांची रेखाचित्रे काढलेली असून त्यावर त्यांच्या नावांचीही नोंद केलेली आहे. समकालीन असलेले हस्तलिखितातील हे पान अनेकार्थांनी महत्वपूर्ण आहे. या पानावर शस्त्रांच्या चित्रांसोबत त्यांची नावेही दिलेली असल्याने उपलब्ध शस्त्रांच्या ‘verification’ साठी अशा स्रोताचा वापर करता येऊ शकतो. काही वेळेस, काही शस्त्रांचे आकारातील ‘variants’ उपलब्ध असले तरीही संदर्भांअभावी त्या सर्व शस्त्रांची गणना एकाच category करावी लागते. उदाहरणार्थ, या चित्रामध्ये ‘कुऱ्हाड’ या एकाच शस्त्राचे तबर, कतनी, फरसी, गंडासी असे विविध प्रकार सचित्र दाखवलेले आहेत. यावरून एखाद्या शस्त्राचे उपप्रकार लक्षात येतातच, पण ते प्रकार कोणत्या निकषांवर वेगळे केलेले होते याचीही माहिती समजते. कुऱ्हाडींचे हे उपप्रकार पात्यांच्या आकारावरून classify केले होते असे प्रथमदर्शनी या चित्रांवरून वाटते. 
         दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रांमध्ये डाव्या बाजूला सर्वात खाली ‘बाण’ अस्त्राची नोंद केलेली आहे. मध्ययुगीन भारतातील स्वदेशी अस्त्रांचा एक उत्तम नमुना म्हणजे ‘बाण’ होते. हे बाण म्हणजे धनुष्यासोबत वापरण्याचे नसून ‘अग्निबाण’ प्रकारचे असत. काठीला जोडलेल्या रिकाम्या नळकांड्यामध्ये बारूद भरून हे बाण प्रक्षेपित केले जात. भारतीय आग्नेयास्त्रांच्या (firearms) वर्गातील हा प्रभावी तरीही दुर्लक्षित अस्त्रप्रकार आहे. मध्ययुगातील समकालीन हस्तलिखितामध्ये या बाणाची केलेली सचित्र नोंद त्याचा मध्ययुगीन युद्धामध्ये होणारा प्रत्यक्ष वापर आणि प्रसिद्धी दर्शविणारा आहे.        
         भारतीय शस्त्रअभ्यासात आजही काही शस्त्रांची नेमकी वर्णने आणि रेखाचित्रे उपलब्ध नसल्याने त्या शस्त्रांच्या नेमक्या स्वरूपाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल मोठ्या प्रमाणात मतमतांतरे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘जमदाड’ म्हणजे नेमके कोणते शस्त्र?, ‘पंजा’ म्हणजे नेमके शस्त्र याबद्दल आजही बरीच मतमतांतरे आहेत. उपरोक्त चित्रित हस्तलिखिताप्रमाणे एखादे मध्ययुगीन शस्त्रांशी संबंधित विस्तृत हस्तलिखित हाती लागल्यास भारतीय शस्त्रांच्या अनेक अप्रकाशित पैलूंचा उलगडा होऊ शकतो. या सर्व अभ्यासासाठी भारतातले आणि भारताबाहेरचे पुराभिलेखागार (archives) अधिक कसोशीने तपासायला हवेत! भारतीय शस्त्रक्षेत्रातल्या या अभ्यासाच्या त्रुटी आणि अभाव लक्षात घेऊन नवीन पिढीने शस्त्रांचा अभ्यास करताना, त्यांच्या नोंदी, लिखाण हे सचित्र करण्याची सवय लावून घेणेही अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून सचित्र संदर्भांचा अभाव येत्या काळात कमी होत जाईल! 

सदर manuscript UK मधील खासगी संग्रहातील आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४