आजचे शिव कालीन दिन विशेष
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*८ ऑगस्ट १६४८*
छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं.
अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ?
पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.
राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.
हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.
मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*८ आॅगस्ट १६७६*
छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र.
ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*८ ऑगस्ट १६८३*
संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला.
सकाळी मराठ्यांनी चौलवर हल्ला केला. मोठमोठ्या शिड्या लावून किल्ल्याच्या तटावर चढून जाण्याचा प्रयत्न केला. हे कळताच पोर्तुगिजांनी मोठा भोंगा वाजवून आवाज काढला. त्यावेळी शहरातील लोक धावत येऊन त्यांनी शिड्या फेकून दिल्या. मराठ्यांनी इ. स. १६८३ मध्ये चौलच्या तोंडाशी असलेला कोरलाई हा लहानसा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मराठ्यांनी किल्ल्याचे तट चढून जाण्यासाठी ६ गुप्तहेर पाठविले. ते तटबंदी चढून किल्यावर गेले तेव्हा त्यांना लगेच पकडून पोर्तुगिजांनी त्यांचा अनन्वित छळ करून त्यांच्या येण्याचा उद्देश त्यांच्याकडून वदवून घेतला आणि त्यांना कंठस्नान घातले.
चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*८ ऑगस्ट १८०३*
इंग्रजांनी आपल्याला मराठ्यांशी युद्ध करावे लागणार हे गृहीत धरूनच जोराची तयारी चालविली होती. दक्षिणेत जनरल वेलस्लीच्या हाताखाली ३६ हजार सैन्य होते. जनरल वेलस्लीला दक्षिणेतील फौजांचा सरसेनापती म्हणून जाहीर केले होते. कृष्णा-तुंगभद्रा दुआबात जनरल स्टुअर्ट आपल्या ८,००० सैन्यासह युद्धाच्या तयारीने तळ देऊन होता. आजुबाजूचे पाळेगार, बंडखोर, यांना ताब्यात ठेऊन जनरल वेलस्लीला लागेल त्यावेळी मदत करण्याचे त्यास हुकूम दिले होते. ७ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल
वेलस्ली बरोबर ९ हजार सैन्य घेऊन आणि कर्नल स्टीव्हेन्सन ह्याचे ८ हजार सैनिक ही दोन्ही सैन्ये अहमदनगरच्या किल्याजवळ येऊन थडकली. निजामाचे १५ हजार सैन्य, अप्पा देसाई निपाणकर यांजकडील ८ हजार सैन्य आणि बापू गोखले यांनी जनरल वेलस्लीला मदत करावयाची असे हुकूम गव्हर्नर जनरलने दिले होते. सुरतजवळ कॅप्टन मरे आपल्या ८ हजार सैन्यानिशी दक्षिणेत निघण्याच्या तयारीत होता. जनरल लेकला उत्तरेतील सैन्याचे अधिपत्य देऊन कानपूर व लखनौ येथील सैन्यास शिंद्यांवर हल्ला करण्यासाठी ठेवले होते. शिंदे दक्षिणेत पुण्याच्या दिशेने येत होते, त्यास अडवून धरण्यासाठी त्यांच्या ताब्यातील अहमदनगरचा किल्ला काबिज करण्याचा बनाव वेलस्लीने ८ ऑगस्ट १८०३ घडवून आणला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*८ ऑगस्ट १८३१*
उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment