मातृदिनाची..मातृवंदनाची* *आज पिठोरी अमावस्य
*मातृदिनाची..मातृवंदनाची*
*आज पिठोरी अमावस्य
*आजवर जगात कित्येक संस्कृती आल्या आणि काळाच्या उदरात गडप झाल्या. पण सनातन भारतीय संस्कृती अबाधीत आहे आणि राहणार आहे. याचे कारण या संस्कृतीत असलेली 'मातृदेवो भव' भावना. आई मग ती कुणाचीही असो मनात पवित्र भावना निर्माण होतात*
*आज मातृदिन. आज सर्व प्रथम वंदन त्या वाघाचे दात मोजणाऱ्या पराक्रमी भरताला जन्म देणाऱ्या शकुंतला मातेला. या भरतामुळेच या देशाची ओळख 'भारत' म्हणून आहे.*
*सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त आहे तो मातेला.. तो तिच्या अपूर्व त्यागामुळेच. बाळाला जन्म देताना जिवघेण्या कळा.. कोंडलेला श्वास यामुळे तिचा पुनर्जन्म ठरतो. पण तरीही बाळावर आनंदाश्रूंचा अभिषेक करणारी ही जगन्माता. मुलांच्या सुखात स्वसुख मानणारी.. क्षमाशील, पराकोटीच्या त्यागाने जन्म खर्चिणे ही या मातेची मनोवृत्ती. पहिल्या गुरुचा सन्मान मातेचाच. ती आई झाली की देवकी असो वा यशोदा, मायेचे स्वरुप मात्र तेच असते.*
*आईचे उपकार एका जन्मात फेडणेच अशक्य. जगात विकत न घेता येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम. जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणे अशक्यच. या भारतात आईच्या कर्तुत्वाला तोडच नाही. वीरमाता जिजाबाई.. राणी लक्ष्मीबाई अश्या किती मातांची थोरवी वर्णावी.. तिच्या संस्कारानेच देशात सर्वांना शांततामय.. सुखाचे.. आनंदी जीवन लाभते.*
*आज माता आपल्या पाल्यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून कुठे व्रत करतात तर कुठे पाल्यांना औक्षण केले जाते. कुठे पिठाचे दिवे लावून चौसष्ट योगीनींची पूजा केली जाते.*
*परमेश्वरी रुपात घरोघरी असणाऱ्या समस्त मातांना मातृदिनी वंदन.. साष्टांग दंडवत.*
Comments
Post a Comment