श्री शिवछत्रपतींचे सरदार पाटणकरांना लिहिलेले पत्र 🚩

श्री शिवछत्रपतींचे सरदार पाटणकरांना लिहिलेले पत्र 🚩

सन १६५९ सालीच अफझलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी वाई -प्रतापगडापासून कोल्हापूर-पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश हिंदवी स्वराज्यात सामील करून घेतला, त्यावेळीच पाटण खोरे व तेथील वतनदार पाटणकर देशमुख स्वराज्यात रुजू झाले असणार. तथापि आपणास या कालातील पाटणकरांची कागदपत्रे मिळत नाहीत. महाराजांचे पाटणकरांना लिहिलेले सन १६७८ सालचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यावरून पाटणकर घराण्यातील यशवंतराव, बाळाजीराव व चांदजीराव पाटणकर अशा तीन पुरुषांची नावे आपणास ज्ञात होतात. पैकी यशवंतराव 'झगडियात' म्हणजे लढाईत मारला गेला, म्हणून महाराजांनी बाळाजीराव व चांदजीराव यांचे सांत्वन करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. ही लढाई केव्हा, कुठे किंवा कुणाशी झाली, हे समजून येत नाही. पण ज्या अर्थी महाराजांनी आस्थेने सांत्वनपर पत्र पाठवले आहे, त्या अर्थी ही लढाई स्वराज्य रक्षणासाठी अथवा कर्नाटक ( दक्षिणदिग्विजय ) मोहिमेतील स्वराज्यवृद्धीसाठी घडून आली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे.

● छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातील शब्द 

पत्रात महाराज म्हणतात, " ऐसीयास तुम्ही मानाचे धणी वतनी लोक आहा. तुम्हावरी स्वामीची कृपा आहे. झगडीयात येसवंतराऊ पडला. तरी त्याची आयुष्य मर्यादाच तितकी. त्यास काय करावे ? तुम्ही त्याच्या मुलांचा समाचार घेत जाणे. त्यांचे जित्रब त्याचे मुलास करार करून पूर्वीची पत्रे पाठविली आहेती व राा अनाजी पंतापासी असतील. समाचार घेउन त्याप्रमाणे चालवणे आपले समाधान असो देणे. येविशी राा अनाजी पंतास पत्र लिहिले असे."

पत्राची भाषा प्रशासकीय नाही, ती ममतेची आहे. "तुम्ही मानाचे धणी, वतनी लोक आहा' या महाराजांच्या उद्गारावरून पाटणकरांची स्वराज्यातील वतनदार देशमुख म्हणून केवढी प्रतिष्ठा होती, हे ध्यानात येते. तसेच असा एखादा एकनिष्ठ वतनदार स्वराज्याच्या सेवेत खर्ची पडला, तर महाराज त्याच्या आप्तांची व कुटुंबियांची कशी काळजी घेत हेही येथे दिसून येते.

●संदर्भ :- सरदार पाटणकर घराण्यावरील पुस्तक 
             प्रस्तावना ( डाॅ.जयसिंगराव पवार )

●पत्र संदर्भ :- शिवकालीन कागदपत्र पृ.१७३ 
               संपादक - व्ही.जी.खोबरेकर
               मुंबई पुराभिलेख विभाग
               (मुंबई)


लेखन - सिध्देश पवार 


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४