१६ जुलै १६७७दक्षिण दिग्विजय मोहीमेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे तंजावर यांची भेट.आणि त्यामागील राजकारण

१६ जुलै १६७७
दक्षिण दिग्विजय मोहीम


 छत्रपती शिवराय आणि त्यांचे 
सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची तंजावर येथे भेट झाली.


दख्खनी मुस्लिम शासक विजयनगर हिंदू साम्राज्याच्या अस्ताला जबाबदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमागे हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना करणे हीच कल्पना आणि इच्छा होती, हे सर्वज्ञात आहे. विजयनगरचे सम्राट श्रीरंग (तिसरे) यांचे दोन चिरंजीव हे असहाय आणि दारिद्र्यात असल्याचे त्यांना समजल्यावर ते दुःखी झाले होते. त्यामुळे शिवाजी महाराज यांनी त्यांना आणि सम्राट श्रीरंग तिसरे यांच्या पत्नीला मोठी मदत देऊ केली होती. विजयनगर साम्राज्याचे अवशेष उरले असताना त्या अवशेषांवरच हिंदवी साम्राज्याची स्थापना करण्याची शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा नुकत्याच उजेडात आलेल्या त्यांच्या नाण्यावरूनही स्पष्ट होते. काही जुने इतिहासतज्ज्ञ असे म्हणतात, की शिवाजी महाराज त्यांचे धाकटे बंधू व्यंकोजीराजे यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या बंगळूर आणि तंजावर इथल्या जहागिरीतील हिश्श्यावर दावा करण्यासाठी दक्षिणेत आले होते. शिवाजी महाराज अकरा वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांनी पुण्याची जहागीर दिली होती. शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉंसाहेब यांनी त्यानंतर बंगळूर सोडले होते आणि ते कायस्वरूपी पुण्यामध्ये राहण्यास आले होते. बंगळूरची जहागीर ही व्यंकोजीराजे यांच्यासाठीच होती आणि ते त्यांच्या मातुःश्री तुकाबाई यांच्यासह आणि नागोजी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहत होते. व्यंकोजीराजे यांनी तंजावरमध्ये स्वतंत्र राजवट स्थापन करेपर्यंत नागोजी त्यांच्याबरोबर बंगळूरमध्येच राहत होते आणि व्यंकोजीराजे यांच्यासमवेत तंजावरला आले होते. नंतरच्या काळात शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे यांच्यातील पत्रव्यवहार पाहिला, तर असे लक्षात येते, की मराठा राजवट दक्षिणेतही विस्तारण्यासाठी आपल्या बंधूंनी आपल्यासमवेत यावे, अशीच महाराजांची इच्छा होती.
व्यंकोजीराजे यांनी संकुचित विचार न करू नये आणि मराठा आणि हिंदू यांना संपवण्यासाठी टपलेल्या शेजारील मुस्लिम शासकांवर विश्वास ठेवू नये,’ असे मार्गदर्शन शिवाजी महाराज यांनी केले होते. एवढेच नव्हे, तर विस्ताराची कोणतीही योजना असल्यास आपण मदत करू आणि संरक्षण देऊ, असेही त्यांनी सुचवले होते. त्या काळात शिवाजी महाराज यांना तंजावर जिंकणे अवघड नव्हते. अगदी कमी काळात त्यांना तंजावर आणि व्यंकोजीराजे यांच्यावर विजय मिळवता आला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही आणि तंजावर ताब्यात घ्यावे अशी त्यांची इच्छाही नव्हती. महाराजांना हेही माहीत होते, की व्यंकोजीराजे त्यांच्या वडिलांचीच जहागीर असलेल्या पुण्याबाबतचाही वाटा देण्याची मागणी भावाकडे करणार नाहीत. दक्षिण दिग्विजय मोहिमेबाबता शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी फ्रेंच गव्हर्नर बॅरोन-डेला-हाय यांच्याशी चर्चा केल्याची शक्यता आहे. बॅरोन यांनी पॅरिसला २१ डिसेंबर १६७६ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शिवाजी महाराजांचे मंत्री त्यांना भेटले होते आणि मुघलसम्राट औरंगजेब उत्तरेत गुंतला असताना आणि गोवळकोंडाचे राज्यकर्ते थनाशा यांचे महाराजांशी मैत्रीपूर्ण संबंध असताना, कर्नाटकावर स्वारी करून दख्खनच्या सुलतानांना जेरबंद करण्याची योजना त्या मंत्र्यांनी सांगितली होती. फ्रेंचांकडून लष्करी सामग्री, दारुगोळा मिळण्यासाठी शिवाजी महाराजांना बॅरोन यांच्याकडून मदत हवी होती.व्यापक, विशाल उद्दिष्टसरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासात म्हटले आहे, की शिवाजी महाराजांनी कर्नाटकमधील जहागिरीवर दावा केला असता, तर व्यंकोजीराजे यांनीही पुण्याच्या आणि महाराष्ट्रात नव्याने मिळवलेल्या प्रांतांवर दावा केला असता. ‘हिस्टरी ऑफ जिंजी, मैसूर व्हॉल्युम २’मध्ये विल्केज यांनी म्हटले आहे, की शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट हे जास्त विशाल, व्यापक होते. त्यांनी बागानगर (हैदराबाद) इथून मुधोळचे मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रातून हे स्पष्ट होते. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ‘दख्खनी पातशाही पठाणांच्या हाती असणे योग्य नाही. ती दख्खनी मराठ्यांच्याच ताब्यात असली पाहिजे आणि आदिलशाली राजवट फार तग धरू शकणार नसल्याने मालोजीराजे आणि त्यांच्या अनुयायांनी आपल्याकडे यावे.’ शहाजीराजे विजापूरचे प्रमुख होते, तेव्हा मालोजीराजे यांचे वडील बाजीराजे घोरपडे यांच्यासह अनेक मराठ्यांना त्यांनी महत्त्व, प्रतिष्ठा मिळवून दिली होती, अशीही आठवण शिवाजी महाराजांनी करून दिली आहे.शिवाजी महाराजांनी तीस हजार घोडेस्वार आणि चाळीस हजारांचे पायदळ यांच्यासह दक्षिणेवर जोरदार स्वारी केली, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र ते तंजावूर या मार्गातील सर्व शासकांना आपल्या अधिपत्याखाली आणले. तंजावरमधील त्यांचे प्रयत्न हे त्यांच्या बंधूंनी साम्राज्यविस्तारात त्यांच्याबरोबर यावे या दृष्टीने होते. जमीन मिळवणे हा संकुचित उद्देश त्यामागे नव्हता, तर महत्त्वाकांक्षी मुघलसम्राट औरंगजेबाला रोखणे आणि विजयनगर साम्राज्याचा खरा वारसदार म्हणून सिद्ध करणे हे त्यांचे उद्देश होते. मुस्लिम सल्लागारांच्या प्रभावामुळे व्यंकोजीराजे यांनी बंधूंबरोबर संयुक्त कामगिरीचा हा प्रस्ताव नाकारला आणि त्यांची सत्ता सिद्ध करण्यासाठीची सुवर्णसंधी गमावली. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या वारसदारांना नंतर तंजावरवरील आक्रमणांचा सामना एकट्यानेच करावा लागला.शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील त्यांची स्वारी सुरू केली, तेव्हा त्यांनी मोठी सामग्री बरोबर घेतली होती आणि उत्तरेशी संवादही काळजीपूर्वक सुरू ठेवला होता. त्यांनी नव्याने पादाक्रांत केलेली साम्राज्ये बळकट करण्यासाठी ते पुढे जिंजी, वेल्लोरला गेले होते. तंजावरला परतण्यापूर्वी त्यांनी कन्या अंबिकाबाईसाहेब यांचे पती हरीजीराजे महाडिक यांच्याकडे दक्षिणेची जबाबदारी सोपवली. अंबिकाबाई यांनी नंतर जिंजीच्या आणि शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तमीळ प्रांतातील काही भागांच्या प्रशासनावर अमीट मुद्रा उमटवली.शिवाजी महाराजांनी हरीजीराजे महाडिक यांना मद्रास ते चिदंबरम या भागात पसरलेल्या प्रदेशाचे प्रमुख नेमले, जिंजीला राजधानी बनवले आणि हरीजीराजे यांच्या साह्यासाठी रघुनाथ पंत यांची प्रधान म्हणून आणि संताजी यांची सरनौबत म्हणून नेमणूक केली. जिंजीहून निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी तटबंदी मजबूत केल्या आणि तटबंदीवर तोफा बसवल्या. सर्व अरेबिक आणि पर्शियन प्रशासकीय शब्दांच्या जागी संस्कृत शब्द समाविष्ट करण्याची आज्ञा दिली, महाराष्ट्रात रुढ असलेली महसुली यंत्रणाही तिथे सुरू करण्यात आली. नंतर औरंगजेब त्यांच्या उत्तरेकडील प्रांतांकडे आगेकूच करत आहे, हे समजल्यावर वेल्लोर किल्ला ताब्यात यायच्या आधीच ते महाराष्ट्रात परतले. प्रा. रानडे ‘हिस्टरी ऑफ मराठाज’ या पुस्तकात म्हणतात, गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था असावी असा उद्देश दक्षिण दिग्विजय मोहिमेमागे होता. मात्र, शिवाजी महाराज हा विस्तार आणि तेथे सुरू असलेली कामे फार पाहू शकले नाहीत आणि रायगड येथे या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची देहरूपी अखेर झाली. मात्र, महाराज किती द्रष्टे होते हे नंतरच्या घटनांवरून लक्षात येते. त्यांचे दुसरे चिरंजीव राजाराम महाराज यांना रायगड सोडावा लागला, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये आश्रय घेतला.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४