४०० वर्षांपूर्वीची हाळी येथील गढी अखेरच्या घटका मोजतेय११ बुरुजांची मजबूत गढी होती
४०० वर्षांपूर्वीची हाळी येथील गढी अखेरच्या घटका मोजतेय
११ बुरुजांची मजबूत गढी होती
लातूर दि.2 (अभय मिरजकर)-
जिल्ह्यात चिरेबंदी वाडे, गढीचे वाडे भरपूर होते. हे वाडे म्हणजे वास्तु शास्ञाचा उत्तम नमुना असे. काळाच्या ओघात चिरेबंदी वाड्यांचे चिरे ढासाळले, गढीच्या बुरुजांना सुरुंग लागला . आता अनेक ठिकाणी केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत. लातूर जिल्ह्यात मौजे हाळी येथील कल्याण पाटील यांची गढी पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध होती. आता मात्र ही गढी अखेरच्या घटका मोजत आहे. पाटलांनी गढीचे असणारे अवशेष सांभाळत ती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.
उदगीर तालुक्यातील मौजे हाळी हे गाव म्हणजे संपूर्ण गावाला तटबंदी असणारे गाव म्हणून ओळखले जात होते . गावात प्रवेश करण्यासाठी केवळ दोनच प्रवेश द्वार होते व एक खिंड होती. या गावात पाटलांची गढी म्हणजे एक छोटेखानी भुईकोट किल्लाच म्हणा की. तब्बल ११ बुरुजांची ही मजबूत गढी. उत्तरेकडून वाड्यात प्रवेश केला तरी फिरुन पुर्व दिशेच्या दारामधूनच आत यावे लागायचे. या दारासमोर अश्व बांधण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. त्यांच्या समोरच्या बाजूला जनावरे बांधण्याची व्यवस्था होती. पुर्व दिशेच्या दाराजवळ असलेल्या श्री गणेशाला वंदन करून मध्ये आले की समोर आड होते. चोप चढून गेल्यावर उत्तर दिशेला असलेल्या दाराजवळ थांबणे क्रमप्राप्त होते.
आज सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतात पण तेंव्हा दगडाच्या बांधकामात ठेवलेल्या छिद्रामधून दारात थांबलेली व्यक्ती पाहूनच दार उघडले जाई. दाराला आगळं घातली की दरवाजा उघडणे सहज शक्य नसे. दाराला रखवालदार आणि तिथेच त्यांच्या थांबण्याची व्यवस्था. दाराजवळूच वर बुरुजावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या. बुरुजाच्या भिंती किमान सोळा फुटांची रुंदी असलेल्या होत्या. आणि त्यांमध्ये धान्य ठेवायची कोठारे होती.
प्रवेश द्वारापासून पुढे गेल्यावर ओसरी , बैठक व्यवस्था. मुख्य द्वारापासून थोडेदूर आणखी एक प्रवेशद्वार ज्याचा वापर महिलांच्या साठीच केला जायचा. एकूण सात दरवाजे गढीला होते असे कल्याण पाटील सांगत होते.
वाड्याच्या बांधकामाची पुर्ण माहिती कोणालाच नाही अशी कबुली त्यांनी दिली. हे बांधकाम समजण्या पलिकडे आहे. बुरुजाच्या भिंतीमध्ये केलेले बांधकाम कल्पने पलिकडचे होते. त्यामुळे त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही .
प्रवेश द्वारापासून आत आले की डाव्या बाजूला असलेल्या बुरुजाच्या भिंतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून एक छोटी वाट आहे . ती थेट समोरच्या आडात निघते . सध्या आड बुजवले आहे. पण तिथे जाणारी वाट माञ आहे.
थोडे पुढे गेल्यावर बुरुजाच्या भिंतीच्या मधूनच एक आणखी छोटी वाट आहे. तीथून तब्बल सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्ली आप्पांच्या मंदिरात निघते. त्यांच्या आजोबांनी तीनशे शेळ्या सोडलेल्या पण केवळ एकच शेळी मल्ली आप्पांच्या मंदिरात निघाली त्यामुळे या वाटेकडे कोणी नंतर पाहिलेच नाही .
या गढीमध्ये असलेल्या दुमजली वाड्यासाठी स्वतंत्र आड पाण्यासाठी केलेले आहे. वाड्याची उंचीच पन्नास फुटांपेक्षा अधिक आहे. आडाची खोली ४०-४५ फुट असेल. दगडी बांधकाम केलेले हे आड कधीच आटलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी यांचा वापर केला जात असे. सध्या माञ सांडपाण्यासाठी वापर होतो. शौचालय व्यवस्था ही त्यावेळी वाड्यात केलेली होती.
जवळपास चार एकरचा परिसर वाड्याचा होता. १२०० एकर जमीन होती. कुळ कायद्यामुळे जमिन कमी झाली. अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली. गढीच्या समोर चा भाग शिल्लक आहे. तो जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे . ज्या प्रमाणे किल्ल्याच्या सुरक्षीतते साठी उपाययोजना केल्या जातात त्या सर्व उपाययोजना इथे केलेल्या पाहण्यास मिळतात.
गावात शाळा बांधण्याचे ठरवण्यात आले. पण त्या साठी लागणारे साहित्य जमवण्याचा प्रश्न आला. तेव्हा शाळा दगडाची बांधण्याचे ठरविले. पाटलांच्या गढीच्या एका भिंतीचा वापर त्यासाठी करण्यात आला. एका भिंतीच्या दगडात पहिली ते बारावी पर्यंतची शाळा बांधण्यात आली असे कल्याण पाटील यांनी सांगितले.
जतन आणि संवर्धन करणे कठीण काम आहे.समोरच्या बुरुजाचा एक छोटासा भाग दुरुस्ती करण्यात आला. तब्बल चार महिने त्याला लागले. मोठा खर्च ही झाला. त्यामुळे नंतर समोरची बाजू जतन करून पडलेल्या वाड्याच्या भागात सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून घराचे बांधकाम केले गेले.
पांढऱ्या मातीचे बुरुज आहेत. मातीचे गोळे बनवून ते नदीच्या पाण्यात भिजवायचे जे विरघळले नाहीत ते गोळे बुरुजाच्या भिंतीच्या कामाला वापरायचे. त्यामुळे आजही काही बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.
Comments
Post a Comment