तुकोबा म्हणतात, सगळ्या समस्यांना उपाय असतो मात्र ह्या दुष्टासमोर काहीही उपाय चालत नाही. म्हणून त्याची संगत न करणे हेच खरे हिताचे असते. ।।४।।
दुष्टांचे चिंतन भिन्ने अंतरी । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातले जीवन । न धरिच जाण तेही त्याला ।।१।।
जन्मा येऊनि तेणे पतनचि साधिले । तमोगुणे व्यापिले जया नरा । जळो जळो हे ज्याचे जियालेपण । कासया हे आले संवसारा ।।२।।
पाषाण जीवनी असता कल्पवरी । पाहता अंतरी कोरडा तो । कुचर मूग न येचि पाका । पाहता सारिखा होता तैसा ।।३।।
तुका म्हणे असे उपाय सकळा । न चले या खळा प्रयत्न काही । म्हणउनि संग न करिता भला । धरिता अबोला सर्व हित ।।४।।
अर्थ -
दुष्ट माणसांचे वर्तन वरवर वेगळे असते आणि त्यांच्या मनात दुसरे चालू असते. अशा दुष्ट माणसाला आयुष्यभर जरी उपदेश केला तरी तो व्यर्थ असतो जसे पालथ्या घागरीवर पाणी ओतले तरी ते घागरीत जात नाही. ।।१।।
ज्या मनुष्याला तमोगुणाने व्यापले आहे त्याने जन्माला येऊन पतनच साधलेले असते. त्याच्या जिवंतपणाला आग लागो. असे लोक संसारात जन्म तरी का घेतात ? ।।२।।
दगड कितीही वर्षे पाण्यात असला तरी आत कोरडाच असतो किंवा कूचर असलेला मूग कितीही शिजवला तरी शिजत नाही. ।।३।।
तुकोबा म्हणतात, सगळ्या समस्यांना उपाय असतो मात्र ह्या दुष्टासमोर काहीही उपाय चालत नाही. म्हणून त्याची संगत न करणे हेच खरे हिताचे असते. ।।४।।
।राम कृष्ण हरि।
#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय
Comments
Post a Comment