#श्री_नारायणेश्वर_मंदिर
#श्री_नारायणेश्वर_मंदिर
पुण्यातून साताऱ्याकडे जाताना पुरंदर आणि वज्रगड या किल्यांच्या पायथ्याशी नारायणपूर या नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात एक सुंदर यादवकालीन आणि पंचक्रोशीमध्ये #श्री_नारायणेश्वर_मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. सदर पश्चिमाभिमुख मंदिर हे किमान ८०० / ८५० वर्ष जुने आहे. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. पाठीमागचा पुरंदर किल्ला आणि संत चांगदेवांचे वास्तव्य या साठी हे ठिकाण पूर्वी प्रसिद्ध होत. सध्या मात्र नारायणपूर गावात अलीकडेच नव्याने उभारलेले एकमुखी दत्तमंदिर अधिक प्रसिद्ध आहे.
नारायणेश्वर मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिराभोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंचीची तटबंदी आहे. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत प्रशस्त असून आवारात असलेल्या एका पारामध्ये एक मोठा दगडी रांजण पुरून ठेवलेला आहे. तो रांजण नाणेघाट किंवा शिरवळ इथे असलेल्या रांजणांशी मिळताजुळता आहे. मंदिराच्या आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणाची ६/६.५ फुटाची मारुतीची मूर्ती आहे.
यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम केलेले आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची यांची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर हे २० खांबांवर उभे केले आहे. मंदिरामध्ये तीन शिलालेख आहेत.पहिला लेख रंगमंडपाच्या डाव्या दर्शनी भिंतीतील खांबाच्या मध्यभागी आहे. चांगा वटेश्वराच असे त्याचे वाचन आहे. दुसरा लेख रंगमंडपात शिरताच डावीकडील दुसऱ्या म्हणजे कोपऱ्यातील खांबावर आतील बाजूच्या तळाशी आहे. चांगा वटेश्वराचा श्रीधर जोगी असे त्याचे वाचन आहे. तिसरा लेख रंगमंडपाच्या उत्तरेकडील द्वारभुजेच्या म्हणजे चौकटीच्या उजव्या खांबावर आहे. अच्यतधज असे त्याचे वाचन आहे. यातील पहिले दोन शिलालेख हे १३ व्या शतकातील म्हणजे यादव काळातील आहेत तर तिसरा शिलालेख हा त्यापेक्षा प्राचीन आहे. मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाजावर गणेशपट्टी आहे. गाभाऱ्याच्या बाहेर गणपतीची मूर्ती आहे.पायऱ्या उतरून आत गाभाऱ्यात गेल्यावर लाकडी खांबांवर उभी असलेली महिरप दिसते. त्यामध्ये एका मोठ्या काचेखाली वर्तुळात जमिनीमध्ये तीन स्वयंभू पिंडी दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते. त्यांतील मोठी असलेली पिंड म्हणजेच #नारायणेश्वर. ती पिंड कायमस्वरूपी पाण्यात असते. केदारगंगा पुरंदर किल्ल्यावरून उगम पावून पुढे वाहताना तेथून जाते अशी श्रद्धा आहे. मागच्या कोनाड्यात भग्नावस्थेतील पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराला उत्तर बाजूसदेखील एक मोठा दरवाजा आहे. त्या दरवाज्याच्या द्वारपट्टीवरसुद्धा सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दरवाज्यातून बाहेर पडल्यावर धनकेश्वराचे देऊळ दिसते. मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस असलेल्या दारातून बाहेर पडल्यावर एक तलाव दिसतो. तो पंचगंगा नावाने ओळखला जातो.
या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे जे मिळतात त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णू मंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे. या मंदिरामध्ये विष्णूची रूपातील एक मूर्ती होती जी सध्या मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच सध्याच्या छत्रपती राजा शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात आहे. याच ऐतिहासिक मंदिराच्या आवारात सुट्या शिळेवर शके १२०७ म्हणजे इ.स. १२८५ या सालामधील रामचंद्र यादवाचा शिलालेख असलेला गद्धेगळ होता. तो गद्धेगळ आज भारत इतिहास संशोधक मंडळात जपून ठेवला आहे.
संदर्भ:
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या – प्र.के.घाणेकर
भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची – सुशील दुधाणे
Comments
Post a Comment