३जून दिन विशेष
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जून १६७३*
छत्रपती शिवाजी महाराज व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कुणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जून १६७४*
छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जून १६७८*
मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराजांची सनद
छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला निघायच्या अगोदर म्हणजे १६७६ ला पाटगांवला जाऊन श्रीमौनीमहाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते.
मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराज आणि पुढचे इतर छत्रपतींनी वेळोवेळी सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद सनद शिवरायांनी ३ जून १६७८ रोजी दिली आहे.
मुळ सनदचे भाषांतर :
स्वस्ती राज्याभिषेक शके ४ कालयुक्त संवत्सरे वैशाख बहुल
सप्तमी भूगुवारसे क्षत्रीयकुलावंतस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री गणो राम देशाधिकारी ता. कुडाळ यासी आज्ञा केली यैसी जे मौनीबाबा पाटगावी असतात त्याचे दर्शनास अतीत अभ्यागत आगांतुक बहुत येत असताती त्याला एकदा आन आवावे म्हणजे संतुष्ट होऊन जात जातील म्हणून तुरु(त)गिरी बाबाचा शिष्य याने सांगितले त्यावरून अतीत अभ्यागताबद्दल प्रतिवर्षी एक हजार माणसांची सामग्री ठेवली आहे. दर माणसास तांदुल वजन सडीक कणीक वजन दली वजन तूप वजन मीठ वजन
एकूण पाऊणे च्यारी सर नवटाक रास याप्रमाणे हाजारा माणसांची बेरीज होईल ते आवक साल सन तिसा सबैना पासन देणे खर्च लिहिणे मुजरा होईल.
तुम्ही हे सामग्री त्याचेथे तुरु (त) गीरीपासी वर्षामध्ये एकदा येक देत जाणे तो आल्या गेल्यास तैसे देत जाईल. तुम्ही काही त्याचे खर्चात मन न घालणे लेखनालंकार (मर्यादेय विराजते)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जून १७३३*
सरखेल सेखोजी आंग्रेंचं बाजीराव पेशव्यांना पत्रं
दि. ३ जून १७३३ चं सरखेल सेखोजी आंग्रे यांचं बाजीराव पेशव्यांना पत्रं! या पत्रात बाजीरावांची आणि सेखोजींची अनेक राजकारणं आपल्याला दिसून येतात. मुख्य म्हणजे थळच्या किल्ल्याला मोर्चे लावून तो हस्तगत करण्याविषयी बाजीरावांनी आंग्र्यांना सांगितले, पण पावसाने अचानक हजेरी लावल्याने कामात थोडा उशीर होत आहे हे सेखोजी बाजीरावांना सांगत आहेत.
यानंतर सेखोजी आपण तयारी कशी केली आहे ते सगळं सांगतात, उदाहरणार्थ उरणच्या बंदरात गलबते तयार ठेवली आहेत, लहानमोठ्या महागिऱ्या (नौकेचा प्रकार) सुद्धा आहेत. या बळावर उरणाहून उतरून पेण मारावे असा विचार त्यांचा होता. त्यापुढे जाऊन थळहून चौलाही मारायचे होते. याच कारण म्हणजे जंजिरेकर सिद्दी आक्षी-नागाव इथे येऊन तिथल्या ब्राह्मणांना पकडून भ्रष्ट करणार (म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर) अशी खबर मिळाली होती. आंग्र्यांच्या फौजेचा सिद्दीशी सामना होताच सिद्दी पुन्हा उंदेरीला पळाला. सेखोजी वैतागून म्हणतात, "मोठा हरामजादा हबसी! संपूर्ण प्रांतास दंडास आणिले होते". सिद्दीचा यावेळचा उद्देश काय होता? तर "उंदेरी आणि उरणहून मुलुख मारावा, ब्राम्हण पकडून न्यावे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जून १८१८*
बाजीराव रघुनाथराव इंग्रजांना शरण
दि. ३ जून १८१८ या दिवशी सकाळी दहा वाजता खानदेशात अशिरगडाजवळ 'धुळकोट बारी' या
ठिकाणी बाजीराव पेशवे (दुसरे) माल्कमला शरण आले. माल्कमने मोठ्या औदार्याने आणि प्रेमाने त्यांचे स्वागत केले. जनरल माल्कमने गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जची समजूत काढून त्याची संमती मिळवली आणि बाजीरावांना (दुसरे) सालीना आठ लक्ष रु. तनखा देण्याचे मान्य करून कायमचं कानपूरच्या उत्तरेस सुमारे पाच कोसांवर असणाऱ्या बिठूर उर्फ ब्रह्मावर्त या ठिकाणी
राहण्याची व्यवस्था केली. बाजीराव पेशवे (दुसरे) आपल्या लवाजम्यासह आपले राज्य, सुख, समाधान, रयत, पुण्याचा वाडा अन् आपली जिवाभावाची माणसं अशीच मागे ठेवून कायमचे नर्मदापार निघाले. पुन्हा कधीच न परतण्याच्या मार्गाने. ते आता 'महाराष्ट्राचे पेशवे' राहिले नव्हते... शंभर वर्षांची पेशवाई आता संपली होती... सूर्यास्त झाला होता...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment