आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ जुलै १६५८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ जुलै १६५८*
औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन
गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ जुलै १६६२*
देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन ! 
विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवांची सुटका करणे इंग्रजांना शक्य नव्हते, परंतु तरी देखील त्यांनी आपल्या योजनेनुसार २१ जुलै १६६२ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये पुढील ठराव केला:-
"कंपनीच्या नोकरांचा बंदीवास आणि त्यांच्या स्वतःच्या व आमच्या मालकांच्या [म्हणजे कंपनीच्याच] दख्खनमधील मालमत्तेचे झालेले नुकसान या विषयांवर आम्ही विचार केला. शिवाजी आणि दख्खनचा बादशहा [ म्हणजे आदिलशहा ] या दोघांनाही पत्रे लिहून आम्ही कंपनीच्या नोकरांच्या सुटकेकरिता प्रयत्न केला. तरीही ते आता सतरा महिने बंधनात आहेत आणि मोठी खंडणी दिल्यावाचून त्यांच्या सुटकेची आशा नाही. सर्व वाजवी मार्गाचा यापूर्वीच अवलंब करण्यात आला आहे आणि त्यांचा उपयोग झालेला नाही म्हणून त्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांची व आमच्या मालकांची मालमत्ता बळाने परत मिळवणे योग्य आहे आणि ते आमचे कर्तव्य आहे असे आम्हास न्यायपणे वाटते.
त्याकरिता आम्ही या वेळी जमून आणि विचारविनिमय करून अशा निर्णयाला आलो की त्यांची [ म्हणजे शिवाजी महाराज व आदिलशहा यांची ] जहाजे ती मोख्याहून परत येत असता पकडणे हा त्यांच्या [म्हणजे कैदेत असलेल्या इंग्रजांचा ] सुटकेचा सर्वात परिणामकारक व व्यवहार्य उपाय आहे. कारण उपर्युक्त दोन्ही जहाजे [रॉयल वेलकम व होपवेल ] त्या किनाऱ्यावर असतील अशी आम्हास अपेक्षा आहे. त्याकरिता आम्ही आता दोन तातडीची पत्रे आणि सोबत दोन्ही जहाजांच्या कमांडरांकरिता अशी अधिकारपत्रे पाठवली आहेत की त्यांनी ती मिळताच किंवा हवामान अनुकूल होताच बंदराबाहेर पडावे आणि, दख्खनची राणी [म्हणजे बडी साहेबीण ] मोख्याहून परतताना तिच्यावर छापा घालण्याकरिता, होपवेलने राजापूर व खारेपाटण समोर रहावे आणि रॉयल वेल्कमने वेंगुर्ला, दाभोळ व आसपासच्या बंदरासमोर राहावे. ती [ बडी साहेबीण ] राजापूर येथे उतरेल अशी अपेक्षा आहे. या कामगिरीकरीत त्यांना २० सप्टेंबरची मुदत घातली आहे .... त्यानंतर त्यांनी कारवारला परतायचे आहे."
इ.स. १६६१ च्या मार्च महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली आणि तिथल्या काही इंग्रजांना कैद केले. हे इंग्रज पुढीलप्रमाणे होते :-
१) हेन्री रेव्हिंग्टन
२) रँडॉल्फ टेलर
३) रॉबर्ट फेर्रान्ड
४) रिचर्ड नेपियर
५) रिचर्ड टेलर
६) फिलिप गिफर्ड
७) रॉबर्ट वार्ड नावाचा एक सर्जन
८) विल्यम मिंघम
या आठ जणांपैकी पहिले सात लोक ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि आठव्याला ( विल्यम मिंघम ) या सात जणांनी आपल्या खाजगीतून पगार देऊन कामावर ठेवले होते . शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या कैदेत असताना या महाभागांनी ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी न घेता इंग्रजी निशाणाखाली गडावर तोफा डागण्याचा जो 'उद्योग ' केला होता त्याचीच शिक्षा म्हणून महाराजांनी या सर्वाना कैद केले होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ जुलै १६७२*
"अब्राहम लेफेबर" हा डच वकील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांसमोर हजर.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ जुलै सन १७२९*
सेखोजी आंग्रेंना सरखेल किताब
४ जुलै सन १७२९ रोजी कोकण किनारपट्टीवरील अनभिषिक्त राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांना दिनांक २१ जुलै सन १७२९ रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी सरखेलीचा कारभार सांगितला.
अल्पकालीन कारकिर्दीत राजनिष्ठ, शुर, सचोटी, इमान या गुणांच्या जोरावर सरखेल सेखोजींनी श्रीमंत चिमाजी अप्पांच्या साह्याने कोकणकिनारपट्टीवरील यवनांना उखडून काढले. बाणकोटची खाडी ते रेवंदंडा येथपर्यंतचा मुलुख मोकळा झाला. दरम्यान खुद्द पेशवा श्रीमंत बाजीराव राजापूरीवर चालून गेल्याने सेखोजींस बळ चढले सिद्दीचे मोठे आरमार सेखोजींनी धरून आणले. पोर्तुगीजांनी हबशी सिद्दी याची मदत केली म्हणून सेखोजींनी त्यांच्याकडील चौल हे महत्वपूर्ण बंदर घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचे रोझ नावाचे जहाजाचा पाडाव करून ७६०३ रूपये मुंबईकर इंग्रजांकडून दंड वसूल केला व जहाज परत केले. या प्रकाराने इंग्रजांना सेखोजींची जबरदस्त दहशत बसली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२१ जुलै १७८३*
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध ‘पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि. २१ जुलै १७८३).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४