गुरू दत्तात्रेयांनी देखील २४ गोष्टींना गुरू मानले होते. गुरू हे अनेक प्रकारचे असतात. आपल्याला लौकीक विद्या शिकवणारे शिक्षक हेही आपले गुरूच असतात; मात्र जो अविद्येला दूर करून मुक्त करणाऱ्या विद्येचे ज्ञान करून देतो तोच खरा सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरुंचे स्थान हे आई वडीलांपेक्षाही वरच्या स्थानावरील आहे. सद्गुरूंना म्हणूनच परब्रह्म म्हटलेले आहे.
आज #गुरूपौर्णिमा. ही पौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणूनही आपण साजरी करतो. व्यास ह्या शब्दातच व्यासांचे थोरपण आहे. बुद्धीवंतांमधील सर्वात बुद्धीमान अशी व्यासांची ओळख आहे. व्यासांनी जी रचना केली त्या रचनेपलिकडे जगात दुसरे काहीही नाही. म्हणून व्यासोच्छिष्ठ जगत्सर्वं (हे सर्व जग व्यासांचे उच्छिष्ट आहे) असे म्हटले जाते.
मनुष्य कितीही बुद्धीमान असला तरीही त्याला आत्मज्ञान गुरुंशिवाय प्राप्त होत नाही. गुरू दत्तात्रेयांनी देखील २४ गोष्टींना गुरू मानले होते. गुरू हे अनेक प्रकारचे असतात. आपल्याला लौकीक विद्या शिकवणारे शिक्षक हेही आपले गुरूच असतात; मात्र जो अविद्येला दूर करून मुक्त करणाऱ्या विद्येचे ज्ञान करून देतो तोच खरा सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरुंचे स्थान हे आई वडीलांपेक्षाही वरच्या स्थानावरील आहे. सद्गुरूंना म्हणूनच परब्रह्म म्हटलेले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी व अनुभवामृत ह्या ग्रंथात त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथांची तोंडभरून स्तुती केलेली आहे. संत तुकोबांना त्यांचे गुरू बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात येऊन अनुग्रहित केले होते. तुकाराम गाथेत तुकोबांनी त्यांच्यावर झालेल्या गुरूकृपेचे वर्णन करणारे अभंगही रचलेले आहेत.
उपनिषदे ही आत्मविद्येचे मूळ स्रोत आहेत. उपनिषदांचा अर्थ गुरूंजवळ बसून ग्रहण केलेली विद्या असा आहे. उपनिषदे ही आत्मज्ञानी लोकांचे शब्दबद्ध केलेले अनुभव आहेत. आपण उपनिषदे अभ्यासली तर आपल्या लक्षात येते की, आत्मविद्या ही गुरूंकडून शिष्यांकडे गेली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत श्रीगुरू निवृत्तीनाथांची केलेली स्तुती मनाला अत्यंत भावणारी आहे. ह्या गुरूस्तवनाच्या ओव्या कितीही वेळेस वाचल्या तरी पुनःपुन्हा वाचाव्या वाटतात. म्हणून त्या खाली देत आहे.
माऊली निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात -
आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकियाते अंगिकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधु होडा ।।
(हे गुरू ! आपल्या स्नेहरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्या मनुष्याचा अंगिकार केला तर तो मुका मनुष्य देखील बृहस्पतीसोबत प्रबंध निर्मितीच्या पैजा लावू लागतो.)
हे असो दिठी जयावरी झळके । की पद्मकरू माथा पारूखे । तो जीवचि परि तुके । महेशेसी ।।
(हेही राहू द्या. आपली दृष्टी ज्याच्यावर पडते किंवा आपला पद्मरुपी हात ज्याच्या डोक्याला लागतो तो जीव असला तरी साक्षात शिवाच्या तुलनेला उतरतो.)
एवढे जिये महिमेचे करणें । तें वाचाबळे वाणू मी कवणे । का सूर्याचिया अंगा उटणे । लागत असे ।।
(एवढी अगाध ज्याची महिमा आहे त्याचे वर्णन मी वाणीने कसे करावे ? अहो सूर्याच्या अंगाला कधी उटणे लावता येत असते का ?)
केऊता कल्पतरूवरी फूलौरा । कायसेनि पाहुणेरू क्षीरसागरा । कवणे वासी कापूरा । सुवासु देवो ।।
(कल्पतरुवर आणखी कोणता फुलोरा फुलवणार ? क्षीरसागराचा पाहुणचार कोणत्या पद्धतीने करणार ? किंवा कापूराला सुवास देण्यासाठी कोणता वास वापरणार ?)
चंदनाते कायसेनि चर्चावे । अमृतातें केऊते रांधावे । गगनावरी उभवावे । घडे केवी ।।
(चंदनाला कशाने सुगंध द्यावा ? अमृताचे मंथन कसे करावे ? किंवा आकाशावर घडे कसे रचावे ?)
तैसे श्रीगुरुंचे महिमान । आकळिता के असे साधन । हे जाणोनि मिया नमन । निवांत केले ।।
(त्याप्रमाणे श्रीगुरूंचा महिमा वर्णन करण्यासाठी कोणतेही साधन नसल्याचे माझ्या लक्षात आले म्हणून मी गप्प बसून श्रीगुरुंना मनापासून नमस्कार केला.)
जरि प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरुसामर्थ्या रूप करू म्हणे । तरि ते मोतिया भिंग देणे । तैसे होईल ।।
(प्रज्ञेच्या जोरावर श्रीगुरुंच्या सामर्थ्याला शब्दांचे रूप देऊ म्हटले तर ते मोत्यांना भिंग देण्यासारखे होईल.)
।राम कृष्ण हरि।
तस्मै श्री गुरवे नमः
तुका म्हणे
Comments
Post a Comment