आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ डिसेंबर १६५६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १६५६*
छत्रपती शिवराय-मुघल पत्रव्यवहार
सन १६४९ मधे छत्रपती शिवरायांनी दख्खनच्या मुघल सुभेदारला, म्हणजे शहजादा मुरादबक्षला काही पत्रे लिहीली होती. ह्यानंतर सन १६५६ पर्यंत त्याने मुघलांना काही लिहील्याचे पुरावे मिळत नाहीत. जुलै १६५६ मधे छत्रपती शिवरायांनी मुल्तफखान नावाच्या अहमदनगरच्या किल्लेदाराला पत्र लिहीले होते. हे पत्र आज उपलब्ध नाही पण ऑगस्ट १६५६ मधे औरंगजेबने मुल्तफखानला लिहीलेल्या पत्रात त्या पत्राचा संदर्भ येतो. २२ डिसेंबर १६५६ ला लिहीलेल्या औरंगजेबच्या दुसऱ्या पत्रातून असे लक्षात येते की छत्रपती शिवरायांनी मुघलांशी हा पत्रव्यवहार आदिलशाहीविरुद्ध त्याच्या आक्रमणांना पाठींबा मिळवण्यासाठी केला होता. ह्या पत्रात औरंगजेबने छत्रपती शिवाजी राजा व शाहजी राजाला लिहीलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे पण ती कुठलीच पत्रे आज उपलब्ध नाहीत. सन १६५७ मधे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला छत्रपती शिवरायांचा वकील औरंगजेबला भेटला होता. छत्रपती शिवरायांनी उत्तरादाखल दिलेले पत्र आज उपलब्ध नाही पण १५ मार्च १६५७ ला औरंगजेब ने मुल्कफखानला लिहीलेल्या पत्रात ही घटना दिला आहे. त्यानंतर औरंगजेबने छत्रपती शिवरायांना एक निशाण पाठविले व छत्रपती शिवरायांनी त्यालाही उत्तर दिले. ही दोन्ही पत्र आज उपलब्ध नाहीत पण २३ एप्रिल १६५७ ला औरंगजेबने छत्रपती शिवरायांना लिहीलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख आहे. ह्यातील शेवटच्या पत्राच्या एका आठवड्यानंतरच छत्रपती शिवरायांनी जुन्नर व अहमदनगर ही मुघलांची ठाणी लुटली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १६५७*
जावळीच्या दत्तक प्रकरणी मजहर
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.
या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते. महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की, कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने छत्रपती शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १६६५*
छत्रपती शिवराय गोकर्ण महाबळेश्वर येथील यात्रेत हजर.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १६८३*
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पोर्तुगीजानी सण १५८० पर्यंत भारतातील बराच भूभाग आपल्या ताब्यात आणला. शंभुराजेंच्या काळात मराठे आणि पोर्तुगीजामध्ये अंजदीव बेटाच्या मालकीवरून सुरू झालेला वाद पुढे पोर्तुगीजानी मुघल आरमाराला केलेल्या मदतीने आणखीनच चिघळला. त्यामुळे शंभुराजेंनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील उत्तर कोकण भागा बरोबरच दक्षिण कोकणातील साष्ट व बारदेशवरही हल्ला केला. स्वतः शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढाईत मराठ्यांनी एका महिन्यात साष्ट व बारदेश लुटून आणि जाळून फस्त करत इतर लुटीसोबत त्यांच्या ४६ तोफाही आपल्या ताब्यात घेतल्या. मोगल आपल्या मदतीस येतील या आशेवर असलेला पोर्तुगीज व्हाइसरॉय मराठ्यांना इतका घाबरला की त्याने आपली राजधानी पणजीहून हलवण्याची तयारी सुरू केली. पण शहजादा शहाआलम पोर्तुगीजांच्या मदतीस आल्याने शंभुराजेंना त्यांच्यासोबत तह करणे भाग पडले. याबाबत सुरतकर कारवारकर इंग्रजांना लिहितात, 'बहुतेक पोर्तुगीज व राजे यांचा तह होऊन तुमच्याकडील भागात पुन्हा शांतता नांदू लागली असेलच.इकडे बातमी होती की तहाच्या वाटाघाटी चालू आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १६९९*
२२ डिसेंबर रोजी विठोबा बाबर ह्यांना छत्रपती राजाराम महाराजांनी एक पत्र लिहिलं ज्यात त्यांच्या कमालीच्या उंचावलेल्या मनस्थितीचं दर्शन घडतं. त्या पत्रात छत्रपती राजाराम महाराज म्हणतात,
"आम्ही सिंहगडावर पोचलो आहोत, आणि बादशहाच्या सैन्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी पुढे निघणार आहोत. सेनापती धनाजी, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि इतर पुढार्यांनी ब्रह्मपुरी येथे तळ देऊन असलेल्या बादशहाच्या छावणीवर भयंकर हल्ला केला, त्यांनी बादशहाच्या मुलीला व इतर अनेक प्रमुख कुटुंबियांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी, दहा हजार बैलांचा एक तांडा पडकला. या बैलांवरून बादशाही सैन्याला रसद पुरवली जात होती. हे सैन्य साताऱ्याकडे निघाले आहे. गनिमाचे धैर्य गळाले आहे. त्यामुळे या सैन्याचा साताऱ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला आता या बादशहाच्या सामर्थ्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. ईश्वरकृपे आम्ही त्याला पार उखडून टाकू."
ह्यानंतर लगेच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी बादशाही छावणीवर हल्ला केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ डिसेंबर १७३८*
संभाजी आंग्रे यांनी मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी विजयदुर्गावर आपणच चढाई करावी असे ठरवून इंग्रजांनी २२ डिसेंबर रोजी कमांडर जॉर्ज बग्वेल याला विक्टरी, किंग जॉर्ज, प्रिन्सेस क्लोरीन आणि रेसोल्युशन ही जहाजे आणि तीन गलबते याशिवाय वाटण्यासाठी दोन हजार रुपये देऊन विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी पाठवले. आंग्र्यांचे आरमार बुडवणे याचा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे यात खूप फरक होता. इंग्रजांना आदल्या रात्री आंग्र्यांचे आरमार विजयदुर्गाच्या खाडीत दिसले तर दुसऱ्या दिवशी त्यातील एक जहाज दिसले आणि बाकीचे आरमार कधी आणि कुठे गेले याचा पत्ता इंग्रजांना लागला नाही. सिद्धीला विचारले तर त्याने आरमार दाभोळला आहे असे सांगितले. इंग्रजी आरमार तेथे पोहोचले तर आंग्रे यांचे आरमार कारवारला गेल्याचे समजले. या पळापळीत इंग्रजाच्या आरमाराची पुरती दमछाक झाली.
शेवटी अन्न आणि पाणी संपल्यावर सिद्धी पुढे इंग्रजांना हात पसरावे लागले. यानंतर इंग्रजांचे आरमार पुन्हा मुंबईला कुठल्याही प्रकारची लढाई न करता परतले. कमांडर बग्वेल यांनी या विषयी आपल्या वरिष्ठांना अहवाल दिला त्यात म्हटले की आपली मी अशी खातरजमा करतो की संभाजी आंग्रेच्या बंदरात आम्ही राहणे हे त्याला अपमानास्पद वाटते आणि म्हणून त्याची बंदर सोडून दूर जाणे मला भाग पडले. हे कळवण्यास दुःख होते आणि त्याचे कारण आपले सैन्य त्याच्या विरुद्ध लढण्या इतके सामर्थ्यवान नाही व त्याच्याशी लढा देण्यात आपले आरमार गुंतवून ठेवणे हे आपल्याला शक्य नाही. कारण तो जास्त बलवान असा शत्रू आहे. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला किंवा पुष्कळांना जी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. अशी खातरजमा करतो व वाचल्यावर आपली माझ्याप्रमाणे समजत होईल अशी आशा करतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४