होयासळा राजवांशाची स्थापना व त्याचे प्रतीक
होयासळा राजवांशाची स्थापना व त्याचे प्रतीक -
बेलूर येथील चेन्न केशव मंदिरातील शिलालेखांमध्ये असलेल्या तपशिलांवरून होयसला राजघराणे स्थापने बाबतची एक रोचक कथा समोर येते.
इसवी सनाच्या 10व्या शतकात जैन धर्म आपल्या शिखरावर होता आणि कर्नाटक प्रदेशात त्याची भरभराट होत होती. त्यावेळी चिक्कमंगळूर जिल्ह्यातील अंगडी या गावात एक घटना घडली. या गावाला पूर्वी सोसेयुरू किंवा शशाकापुरा म्हणूनही संबोधले जात होते. हे गाव डोंगर आणि घनदाट जंगलाने वेढलेले होते.
'सोसेयुरू' गावात वासंतीका मंदिराजवळ एक जैन साधू श्री. सौदत्तमुनी हे एक गुरुकुल शिक्षण व्यवस्था चालवीत असे.
एके दिवशी गुरुकुलाच्या आवारात शेजारच्या जंगलातून एक वाघ डरकाळ्या फोडत आला. वाघाला पाहून सर्व शिष्यांनी धूम ठोकली. पण एक धाडसी तरुण मुलगा ज्याचे नाव सळा/साला होते, जो सौदत्त साधूचा एक शिष्य होता, तो आपल्या गुरूंना वाचवण्यासाठी रिकाम्या हाताने वाघाच्या दिशेला धाडसाने धावला. त्यावेळी
'गुरु'ने सालाकडे एक लांब काठी फेकली आणि त्याला "पोय-साला" "पोय - साला"(साला मार) असे आदेश दिले. त्यानुसार. सालाने हिंमतीने त्या वाघाला ठार मारले.
यामुळे प्रसन्न होऊन जैन मुनींनी शूर बालक साला याला आशीर्वाद दिला की तो नजीकच्या भविष्यात या परिसराचा सार्वभौम होईल. त्यानुसार अल्पावधीतच गुरूंचे भाकीत खरे ठरले. त्या संताच्या आशीर्वादाने आणि वासंतिका देवीच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या समर्थकांच्या मदतीने. साला एक छोटी फौज गोळा करून सरदार बनला. पुढे, त्याने नवीन राजेशाही स्थापन केली. अशातऱ्हेने सला/ सळा 'होयसाला राजवंश'चा संस्थापक बनला.
आणि 'साला' सिंहांशी लढतानाचे चित्र होयसला राज्याचे प्रतीक बनले. आजही आपण बेलूर मंदिराच्या दरवाजांच्या दोन्ही बाजूंना आणि इतर काही होयसाळ मंदिरातही होयासला साम्राज्याचे हे प्रतीक आपण पाहू शकतो. होयसाळा घराण्याने इ.स. 970 ते 1343 या काळात राज्य केले.
सालाने वाघाला मारल्यानंतर वाघाऐवजी सिहांचे प्रतीक करण्यामागे ही एक घटना आहे.
इ. स. अकराशे सोळा मध्ये होयसल राजा विष्णुवर्धन याने ग्रेट चोला साम्राज्याचा पराभव केला. आणि याच विजयाच्या स्मरणार्थ राजा विष्णुवर्धन यांनी बेलूर येथे श्री चेन्नकेशव मंदिर बांधायला सुरुवात केली.(सदरचे मंदिर बांधायला 103 वर्षाचा कालावधी लागला) चोला साम्राज्य यांचे प्रतीक सिंह हे होते. त्या विजयाची आठवण म्हणा किंवा चोला लोकांना कमी दर्शवण्यासाठी सिंहाची शिकार करत असल्याचे प्रतीक होयसल शासकांनी निर्माण केले.
Comments
Post a Comment