राहुल साखवळकरांची पोस्टइतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांची आज जयंती (२७ नोव्हेंबर १८७०) , विनम्र अभिवादन

राहुल साखवळकरांची पोस्ट
इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांची आज जयंती (२७ नोव्हेंबर १८७०) , विनम्र अभिवादन

पारसनीस, दत्तात्रेय बळवंत 
इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक. जन्म बोरगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे. आईचे नाव बयाबाई. पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मलवडीचे. बळवंतराव महसूल खात्यातील नोकरीनिमित्त सातार्या स आले व तेथेच हे कुटुंब स्थायिक झाले. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई. त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.
पारसनीसांनी १८८७ मध्ये महाराष्ट्र कोकिळ हे मासिक सुरू केले.

त्यातून मराठेशाहीतील पराक्रमी प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२ पर्यंत हे मासिक चालू होते. किर्तीमंदिर (१८९०) व झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४) ही दोन पुस्तके त्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे लिहून प्रसिद्ध केली. ऐतिहासिक साधनांचे संशोधन आणि संग्रह करीत असतानाच त्यांतील निवडक व महत्त्वाची कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत, म्हणून त्यांनी ह. ना. आपटे यांच्या सहकार्याने भारतवर्ष (१८९९-१९००) व पुढे स्वतंत्र रीत्या इतिहास संग्रह (१९०८-१६) ही नियतकालिके चालविली. यांतून सहा हजारांहून अधिक अस्सल कागदपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली.

लेखन संशोधनाच्या कार्यामुळे पारसनीसांचा अनेक संस्थानिकांशी घनिष्ठ संबंध आला. कोल्हापूरच्या छ. शाहुंबरोबर इंग्लंडला जाण्याची संधी त्यांना १९०२ साली लाभली. या प्रवासात यूरोपातील वस्तुसंग्रहालयांतील अनेक महत्त्वाच्या चित्रांची छायाचित्रे त्यांनी घेतली होती. तसेच ब्रिटिश सनदी अधिकार्यांतशीही त्यांचे निकटचे संबंध होते. त्यामुळे पेशवेकालीन दप्तर पाहण्याची संधी त्यांना लाभली होती. त्यांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले. उर्वरित खाजगी संग्रह १९७५ साली मराठवाडा विद्यापीठास विकण्यात आला. पारसनीसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. ऐतिहासिक- पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही विपुल संग्रह त्यांनी केला.

पारसनीसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. त्यांच्या मराठीग्रंथांतील ए. ओ. ह्यूम (१८९३), झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४), महापुरूष ब्रम्हेंद्रस्वामी यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००), दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२), बायजाबाई शिंदे यांचे चरित्र (१९०२), मराठ्यांचे आरमार (१९०४), महादजी शिंदे याजकडील राजकारणे, खंड ५ (१९१५) इ. ग्रंथ ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून उल्लेखनीय आहेत. त्यांनी इंग्रजीत लिहिलेली सातारा (१९०९), महाबळेश्वर (१९१६), द सांगली स्टेट (१९१७), पुना इन बायगॉन डेज (१९२१), हिस्टरी ऑफ द मराठा पिपल, ३ खंड (सहलेखक सी. ए. किंकेड १९१२-२२) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. अखेरचे पुस्तक वगळता उरलेली पुस्तके विविध ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणारी आहेत. विशेषतः ब्रिटिश सनदी अधिकार्यांऐना उद्देशून ती लिहिलेली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादूर हा किताब दिला.

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय प्रबोधनाचे जे युग अवतरले, त्यात इतिहास-संशोधन हे महत्त्वाचे क्षेत्र होते. हे काम करणार्यां त पारसनीसांचे स्थान महत्त्वाचे आहे. आधुनिक इतिहासकारांना आवश्यक असलेला मीमांसक दृष्टीकोन त्यांच्या लेखनात कमी असला, तरी इतिहाससाधनांचे त्यांनी केलेले संशोधन-संग्रहकार्य मोलाचे आहे.

लेखक-देशपांडे, सु. र.
(माहिती इंटरनेट वरुन साभार)
कॉपी पेस्ट

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४