मच्छिंद्रगड
मच्छिंद्रगड
सांगली वरून पलूस कुंडल मार्गे कराडला जाताना वाळवा कराड तालुक्याच्या शिवेवर किल्ले मच्छिंद्र हे ऐतिहासीक वारसा लाभलेलं गांव आहे . क्रांतिसिंह नाना साहेब पाटील यांच हे गाव . काही दिवसांपूर्वी येथील गडाला भेट देण्याचा योग आला .
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. “आपुला आपण करू कारभार “हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी १९४२ साली अंमलात आणली . प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात.क्रांतीविरांनी ईग्रजाना जेरीस आणले होते .
या गावीच मच्छिंद्रगड आहे .गडावर काही शिवकालीन स्मृती आहेत व हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळ्कटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली,पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी याचा किल्लेदार होता देवीसिंग.१२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला,तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला,त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला.औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला.
पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पक्क्या बांधलेल्या पायर्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येवून पोहोचतो.येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेवून जाते. मंदीरापर्यंत चारचाकी जाणेसाठीही पक्कारस्ता आहे . मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. भाविकांचा नेहमी राबता असतो.येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे,नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात. मंदीरासमोर काही जुन्या तोफा व भग्न शीळा पडलेल्या आहेत . मंदीरात दर रविवारी व ईतर सणवारी महाप्रसाद असतो व तो संपूर्ण गावात वाटला जातो.
मच्छिन्द्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते,गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुध्दा आता जुजबी स्वरूपत उरलेली आहे. गडांवर बेताचीच झाडे असून सिताफळांची मुबलक झाडे आहेत त्यामुळं हंगामामध्ये चांगल्या सिताफळांची ऊपलब्धता असते.
गडाच्या माथ्यावरून चारी दिशांना नजर फिरवतां येते . एका बाजूला कृष्णा सहकारी साखर कारखाना दिसतो. सुर्योदय व सुर्यास्ताचं विहंगम दृश्य पहायला मिळतं. वेळ काढून जरूर या किल्यावर जा , एक वेगळा अनुभव गाठीशी बांधला जाईल .
Comments
Post a Comment